ऑर्कुट प्रोफाईल ला गाणे कसे जोडाल!?

र्कुटवर फिरत असताना, आपला मित्र जेंव्हा आपल्या फोटोवर क्लिक करुन आपल्या प्रोफाईलवर येईल, आणि ती वाचू लागेल, त्याच वेळी त्याला जर आपल्या आवडीचे किंवा आपला सध्याचा मूड आहे, असे एखादे गाणे ऐकू येऊ लागले तर!? हा त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी.. असा दोघांसाठीही खरंच एक चांगला अनुभव ठरेल. आज आपण नेमकी हीच गोष्ट पाहणार आहोत! आणि ती म्हणजे, आपल्या ऑर्कुट प्रोफाईलला एखादे गाणे कसे जोडता येईल!? त्यासाठी काय करावं लागेल!? खाली मी एक एक करुन त्याबाबतच्या पायर्‍या सांगत आहे. ऑर्कुट प्रोफाईलला गाणं जोडणं हे अगदी फार सोपं आहे, आणि आपल्यालादेखील हे सारं काही अगदी सहजतेनं आणि अतिशय कमी वेळात करता येईल.

ऑर्कुट प्रोफाईल वर गाणे कसे जोडायचे?
१. प्रथम आपल्या ऑर्कुट खात्यात लॉग इन व्हा! आपण जर जुने ऑर्कुट वापरत असाल, तर नवीन ऑर्कुट वापरायला सुरुवात करा.
२. आता इंटरनेटवर शोध घेऊन आपल्या आवडीच्या अशा कोणत्याही एका गाण्याची लिंक निवडा ज्याचे एक्सटेंन्शन .mp3 ने पूर्ण होते. उदा.
http://sound18.mp3pk.com/indian/breakkebaad/breakkebaad01(www.songs.pk).mp3 
उदाहरणादाखल दिलेल्या लिंकचा अंत हा .mp3 या एक्सटेंन्शनने होतो. आपल्या आवडीच्या गाण्याची अशीच एखादी लिंक आपल्याला शोधायची आहे!

अवघड आहे!? काही काळजी करु नका! मला वाटतं आपण इंटरनेटवर मोफत गाणी डाऊनलोड करत असालच. अशावेळी आपण ती कशी करता!? हवं ते गाणं मोफत डाऊनलोड करत असताना डाऊनलोड लिंकच्या आसपास अशी स्पष्ट सुचना दिलेली असते की, डाऊनलोड लिंक वर राईट क्लिक करुन ‘Save link as’ किंवा ‘Save target as’ या पर्यायाची निवड करा. .mp3 या एक्सटेंन्शनने अंत होणार्‍या फाईलचा शोध घेत असताना आपल्या सर्वकाही वरच्याप्रमाणेच करायचं आहे. फक्त यावेळी माऊसवर राईट क्लिक करुन ‘Save link as’ ऐवजी ‘Copy link address’ हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.

अशाप्रकारे आपण आपल्या आवडत्या गाण्याची लिंक (जिचा अंत .mp3 एक्सटेंन्शनने होतो) माऊसच्या सहाय्याने कॉपी केलेली आहे.

३. आता आपल्याकडे गाण्याची लिंक आहे! पण तेव्हढं असून भागत नाही. आपल्याला त्या गाण्याचा html कोड हवा आहे. तो मिळविण्यासाठी मी देत असलेल्या लिंक वर जा.

४. तिथे असलेल्या लेखामधील Step 3 मध्ये एक वेजेट दिलेले आपल्याला दिसून येईल. त्यावर Paste mp3 source address in below box असं लिहिलेलं आहे. त्याखाली असलेल्या एका ओळीच्या लहान आयातात आपण कॉपी केलेला, गाण्याचा पत्ता (लिंक) पेस्ट करा. आणि त्यानंतर Click here to generate final code या बटणावर क्लिक करा. खाली दिलेल्या मोठ्या आयातात आपल्याला आपल्या गाण्याचा html कोड दिसून येईल. तो माऊसच्या सहाय्याने कॉपी करा.

५. आता पुन्हा एखादा आपल्या ऑर्कुट खात्याकडे वळा आणि प्रोफाईलवर जाऊन त्यावर क्लिक करा. असं केल्याने आपली ऑर्कुट प्रोफाईल एडिट मोड मध्ये येईल.

ऑर्कुट प्रोफाईल वर असलेला html एडिटिंगचा पर्याय

६. वर चित्रात दाखवल्याप्रमाणे html editor वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला त्या भागात बरेच कोड्स दिसून येतील. त्या सर्व कोड्सच्या खाली रिकाम्या जागेत आपण मघाशी पायरी क्रमांक ४ मध्ये कॉपी केलेला html कोड पेस्ट करा. आणि शेवटी सेव्ह या बटणावर क्लिक करा.

७. सर्व पायर्‍या पूर्ण झालेल्या आहेत. आता जेंव्हा कधीही आपण किंवा आपला मित्र आपल्या ऑर्कुट प्रोफाईलवर येईल, त्यांना आपले गाणे ऐकू येईल. ठराविक कालावधीनंतर आपल्या मूड प्रमाणे किंवा आवडीप्रमाणे आपण ऑर्कुट प्रोफाईलवरील गाणे बदलू शकतो. त्यासाठी केवळ हव्या त्या नवीन गाण्याची लिंक घेऊन वर सांगितल्या आहेत, त्याच पायर्‍या पूर्ण करायच्या आहेत.

अशाप्रकारे आता आपण ऑर्कुटवर आणखी एक नवीन गोष्ट करु शकणार आहात.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.