गुगल मागील प्रतिमा बदला, गुगलची बॅकग्राऊंड इमेज बदला

गुगलच्या मुख्य पानावर झालेला छोटासा बदल कदाचीत तुमच्या दृष्टीपथात आलाच असेल. गुगलच्या मुख्य पानावर खालच्या बाजूला डावीकडे, एका नवीन पर्यायाचा समावेश झाला आहे. अजून पाहिला नाही!? तर मग गुगल.कॉम वर जा आणि पाहून या. जेंव्हापासून एम.एस.एन. चे बिंग सर्च इंजिन सुरु झाले आहे, तुम्ही बिंगच्या सर्च बॉक्सच्या पाठीमागे काही निरनिराळ्या प्रतिमा पाहू शकत आहात. मला वाटतं त्यांनी दिलेल्या ठराविक प्रतिमांच्या पलिकडे आपण बिंगच्या पानात फारसा काही बदल करु शकत नाही. पण गुगलने मात्र यावेळी (खरं तर नेहमीप्रमाणे) बिंगच्या एक पाऊल पुढे टाकत आपलं वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. गुगलने आपल्या मुख्य पानावर आपल्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

Change Background Image असं त्या नवीन पर्यायाचं नाव आहे. याने काय होईल!? तर या पर्यायाचा उपयोग केल्याने गुगलचे मुख्य पान तुमच्या आवडीच्या प्रतिमेने सुशोभीत होईल. मनाला अल्हाददायक वाटेल असं कोणतंही चित्र तुम्ही त्या तिथे लावू शकता. काही लोक निरनिराळे मनाचे प्रयोग करत असतात. त्यांच्यासाठी देखील ही नवीन सुविधा उपयोगी ठरेल. कारण गुगलचे मुख्य पान नेहमीच आपल्या दृष्टीपथात पडत राहते.

प्रतिमा बदला, इमेज बदला, चित्र बदला

बाकी आता आपल्या गुगलच्या अकाऊंटला लॉग इन व्हा. म्हणजे तुम्ही निवडत असलेली प्रतिमा तुमच्या अकाऊंटसाठी सेव्ह होईल, कायमस्वरुपी साठवली जाईल.

Change Background Image या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक विंडो, खिडकी उघडली जाईल. तिथे प्रतिमा निवडण्यासाठीचे एकंदरीत चार पर्याय आपल्यासमोर ठेवण्यात आले आहेत. 

१. संगणकावरुन प्रतिमा घ्या : आपल्या संगणकावर जर आपल्या आवडीची प्रतिमा असेल, तर आपण ती “From my computer” या पर्यायाद्वारे ब्राऊस करुन अपलोड करु शकतो. आपण अपलोड करत असलेली प्रतिमा आपण निवडलेल्या पिकासा वेब अल्बममध्ये आपोआप समाविष्ट केली जाईल. शक्यतो आपण घेत असलेल्या प्रतिमेचा आकार हा गुगलच्या मुख्य पानासम असावा याची काळजी घ्यावी.

२. पिकासा वेब अल्बम मधून प्रतिमा घ्या : ‘पिकासा वेब अल्बम’ हा दुसरा पर्याय आपल्या समोर ठेवण्यात आला आहे. आपली आवडती इमेज, प्रतिमा जर आधीपासूनच आपल्या पिकासा वेब अल्बममध्ये समाविष्ट असेल, तर गुगलच्या मागे लावण्यासासाठी आपण ती “My Picasa Web Photos” या दुसर्‍या पर्यायाद्वारे अगदी सहजगत्या घेऊ शकतो. गुगलच्या मुख्य पानावार बसेल अशाच आकाराच्या प्रतिमेला परवानगी दिली जाईल.

३. पब्लिक गॅलरी मधून प्रतिमा घ्या : Change Background Image या पर्यायावर क्लिक केल्यानंतर उघडली जाणारी विंडो, खिडकी तुम्हाला प्रथम याच पर्यायावर घेऊन येईल. इथे लोकांच्या संग्रहातील प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. या संग्रहातूनच आपण आपल्याला भावणारी सुंदरशी प्रतिमा गुगलच्या पानाचे बॅकग्राऊंड म्हणून निवडू शकतो.

४. एडिटरज्‌ पिक मधून प्रतिमा घ्या : या विभागात एडिटर्सनी निवडलेल्या प्रतिमांचा समावेश होतो. इथेही सुंदर सुंदर प्रतिमांचा चांगला संग्रह आहे. यातून आपल्याला चैतन्यदायी ठरेल अशी कोणतीही प्रतिमा आपण निवडू शकतो.

आपल्या आवडत्या प्रतिमेवर माऊसचा कर्सर आणून ती सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्या विंडोच्या खाली दिलेल्या Select या पर्यायावर क्लिक करा. गुगलच्या मुख्य पानाच्या मागील बाजूस (बॅकग्राऊंड) आपल्याला
आपल्या आवडीची प्रतिमा दिसून येईल.
तर हे झालं गुगल मागील प्रतिमा बदल्याण्याबाबत, किंवा गुगल मागे प्रतिमा लावण्याबाबत.

आता जर तुम्हाला कोणतीही प्रतिमा नको असेल! आणि गुगलचे पान पूर्ववत हवे असेल, तर!?
त्यासाठी केवळ पुनःश्च मुख्य पानावरील Change Background Image या पर्यायावर क्लिक करा. लगेच बॅकग्राऊंड इमेज हटवली जाईल. आणि आता परत एकदा त्याच पर्यायावर क्लिक केल्यानंतर, मगाचीच प्रतिमा निवडण्यासाठीची खिडकी उघडली जाईल.

अशाप्रकारे गुगलचे मुख्य पान तुम्ही तुमच्या पानाप्रमाणे सुशोभीत करु शकता. एकदा प्रयत्न करुन पहा. इंग्रजीमधून गुगलची मदत या इथे उपलब्ध आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.