गुगल युआरएल (URL) शॉर्टनर

मागे फार पूर्वी आपण url चा मोठा आकार लहान करण्याविषयी एक लेख पाहिला होता. त्या लेखात आपण is.gd या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची माहिती घेतली होती. युआरएल शॉर्ट करण्यासंदर्भात तशा खूप वेबसाईट आहेत, पण आता हीच सुविधा आपला विश्वासू गुगल आपल्याला देत आहे. मोठ्या आकाराचे URL लहान करण्यासाठी आता आपण गुगलची मदत घेऊ शकतो. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे या युआरएल ची आकडेवारीही आपल्याला या मध्यमातून उपलब्ध होणार आहे. काय असेल या आकडेवारीत? तर त्या युआरएल वर किती जणांनी क्लिक केलं? कोणत्या देशातून ते क्लिक आले? क्लिक करणारे कितीजण कोणते वेब ब्राऊजर्स आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरत होते? अशी सर्व माहिती आपल्याला या मध्यमातून मिळू शकेल. गुगलच्या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची माहिती पाहताना मोठं युआरएल छोटं कसं करता येईल? आणि त्याचा उपयोग काय? हे आपण पाहूयात.

युआरएल (URL), अ‍ॅड्रेसबार आणि वेब ब्राऊजर:
युआरएल (URL) ला आपण सोप्या भाषेत ‘इंटरनेटवरचा पत्ता’ म्हणूयात. ‘पत्ता’ म्हणजे ‘अ‍ॅड्रेस’. हा अ‍ॅड्रेस (पत्ता) आपण ‘वेब ब्राऊजर’च्या ‘अ‍ॅड्रेसबार’मध्ये टाकतो. वेब ब्राऊजर म्हणजे एक असं माध्यम ज्यामार्फत आपण इंटरनेट पाहू शकतो, वापरु शकतो. 
उदाहरणार्थ, 2know.in हे एक युआरएल (URL) आहे. 2know.in हा माझ्या ब्लॉगचा इंटरनेटवरील पत्ता (अ‍ॅड्रेस) आहे. आत्ता आपण इंटरनेट कशाचा माध्यमातून वापरत आहात? गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा, ? तर हे आहेत वेब ब्राऊजर. आणि 2know.in वर येण्यासाठी या वेब ब्राऊजरच्या वरील बाजूस आपण जिथे 2know.in हा वेब पत्ता टाईप कराल, तो आहे अ‍ॅड्रेस बार. जिथे आपण google.com किंवा facebook.com टाईप करुन त्या त्या साईटवर पोहचतो, तर तो आहे अ‍ॅड्रेस बार. खाली दर्शवलेल्या चित्राच्या मध्यमातून हे अधिक चांगल्या रितीने स्पष्ट होईल. मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा. ते एका वेगळ्या टॅब मध्ये उघडले जाईल.
युआरएल (URL) आणि अ‍ॅड्रेस बार
गुगल युआरएल शॉर्टनर वापरुन मोठे युआरएल लहान कसे कराल?
गुगल युआरएल शॉर्टनर
हे सर्वकाही अगदी खूपच सोपं आहे. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की, goo.gl यावर क्लिक करा. वर दाखवल्याप्रमाणे आपल्यासमोर गुगल युआरएल शॉर्टनर सर्व्हिसचे पान असेल. Paste your long URL here असं जिथं लिहिलं आहे, त्याखाली एक मोकाळी जागी आहे. तिथे मोठे युआरएल पेस्ट करा. उदा. 2know.in क्लासचे मोठे युआरएल आहे – http://2know.in/p/2knowin_18.html. आता हे मोठे युआरएल मला लहान करायचे असेल, तर ते मी कॉपी करुन दिलेल्या मोकळ्या जागेत पेस्ट करेन. 
मोठे युआरएल जर लिंकच्या स्वरुपात असेल, तर त्या लिंकवर माऊस नेऊन राईट क्लिक करा आणि Copy Link Location वर क्लिक करा. त्या लिंक मागे दडलेले युआरएल अशाप्रकारे कॉपी होईल आणि मग ते पेस्ट करा. उदा. वर मी नमूद केलेले युआरएल मेनूबार मधील ‘क्लासेस’ या लिंकमागे दडलेले आहे.
मोठे युआरएल लहान करा
मोकळ्या जागेत आपण एखादं मोठ्या आकाराचं युआरएल पेस्ट केलं असेल. आता केवळ Shorten वर क्लिक करा आणि पहा! त्यासमोरच आपल्याला goo.gl स्वरुपातील लहान युआरएल दिसू लागेल. युआरएल म्हणजे पत्ता! तो आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जातो. इथे आपण मोठ्या अकारातील पत्ता छोट्या आकारात केला असला, तरी तो आपल्याला एकचा (त्याच) ठिकाणी घेऊन जाणार आहे. उदा. http://2know.in/p/2knowin_18.html हे आपले मोठे युआरएल होते. Shorten केल्यानंतर ते लहान झाले या स्वरुपात – http://goo.gl/zlNqf. यातलं मोठं युआरएल आणि छोटं युआरएल आपल्याला 2know.in क्लासच्या पानावरच घेऊन जाणार आहेत. आपणही जर असे एखादे युआरएल लहान केले असेल, तर ते फेसबुक पेज, वॉल, स्टेटस, ट्विटर, ब्लॉग, वेबसाईट, फोरम, इ. असं अगदी कुठेही वापरु शकाल. मोठ्या युआरएल ऐवजी लहान युआरएल वापरणं हे आपल्या सोयीचं आहे. त्याचा दुसरा एक फायदा म्हणजे त्या युआरएल संदर्भातील आकडेवारी आपण या माध्यमातून गोळा करु शकतो.
गुगल युआरएल शॉर्टनर आणि आकडेवारी
आता आपण जे युआरएल लहान केले आहे, त्याची आकडेवारी आपल्याला कशी मिळेल? गुगल युआरएल शॉर्टनरच्या माध्यमातून आपण जी काही मोठी युआरएल शॉर्ट केली आहेत, त्या सर्वांची यादी आपल्याला त्याच पानावर दिसून येईल. ती यादी अशा स्वरुपात असेल; Long URL, Short URL, Created आणि Clicks. त्यापूर्वी Clicks for the past समोरुन कोणत्या कालावधीतील क्लिक्सची आकडेवारी आपल्याला हवी आहे!? ते आपण ठरवू शकतो. उदा. two hours, day, week, month, all time.
गुगल युआरएल शॉर्टनर आणि आकडेवारी
Details वर क्लिक केल्यानंतर वर चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या त्या युआरएल संदर्भातील विस्तृत आकडेवारी दिसू लागेल.  यात तारीख आणि क्लिक संदर्भातील एक ग्राफ आपल्याला ठळकपणे दिसून येईल. त्या शेजारी Referrers, म्हणजेच त्या युआरएल ला कोणत्या ठिकाणहून क्लिक आले!? ते दिसून येईल. उदा. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, फोरम, इ. 
ग्राफच्या खाली Visitor Profile विभागात आपल्याला कोणत्या देशातून? कोणते वेब ब्राऊजर वापरुन? आणि कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम वरुन? त्या युआरएलवर किती क्लिक आले? ते पाहता येईल. अशाप्रकारे लहान केलेल्या युआरएल संदर्भातील आकडेवारी आपल्याला दिसून येईल. ब्लॉगरना या आकडेवारीचा विशेष उपयोग होऊ शकतो. किंवा एखाद्याला केवळ उत्सुकता असेल, तर त्यासाठीही गुगल युआरएल शॉर्टनर सर्व्हिसचा आणि आकडेवारीचा चांगला उपयोग आहे.
इंटरनेटवरचे एखादे पान आपल्याला आवडले आणि ते आपल्याला आपल्या मित्रांना दाखवायचे असेल, तर त्यासाठी त्या पानाचा पत्ता म्हणजेच युआरएल देणं आवश्यक आहे. पण ते युआरएल जर खूप मोठ्या आकाराचे असेल, तर ते इतरांना देणे जरा गैरसोयीचे होऊन बसते. अशावेळी गुगल युआरएल शॉर्टनरचा उपयोग करुन घ्यावा आणि मोठी आकारातील युआरएल लहान आकारात करावे. असे लहान युआरएल इतरांना देणे हे सोयीचं देखील आहे आणि मग आपण त्या युआरएलची आकडेवारीही पाहू शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.