गुगल शोध – मी भाग्यवान

गुगल मधून एखाद्या विषयाचा शोध घेत असताना आपण गुगलच्या सर्च बॉक्समध्ये त्यासंबंधीचा एखादा शब्द टाकतो, ज्याला आपण की-वर्ड म्हणतो. की-वर्ड नुसार गुगलचे पान सर्च रिझल्ट्स घेऊन येते. या सर्च रिझल्ट्स मधील वेबसाईट्सची क्रमवारी किंवा वेबसाईटमधील पानाची क्रमवारी ही ती वेबसाईट किंवा पान किती सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड आहे!? यावरुन ठरते.

मराठी गुगल’ च्या सर्च बॉक्स खाली आपल्याला दोन पर्याय दिसून येतात, ‘Google शोध’ आणि ‘मी भाग्यवान’. ‘गुगल शोध’ हा पर्याय तर सर्वांना परिचित आहेच, आज आपण पाहणार आहोत ते ‘मी भाग्यवान’ या पर्यायाबाबत. इंग्रजी गुगलमध्ये ही बटणे अनुक्रमे Google Search आणि I’m Feeling Lucky या नावाने ओळखली जातात.

काही वर्षांपूर्वी I’m Feeling Lucky चं ‘मराठी गुगल’ मध्ये मराठी भाषांतर ‘आलिया भोगासी’ अशा अर्थाने केलं गेलं होतं. आणि पुढील बरेच दिवस ते तसंच होतं, त्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. एक दीड वर्षांपूर्वी मात्र त्यात ‘मी भाग्यवान’ असा योग्य बदल करण्यात आला.

गुगल शोध – मी भाग्यवान

‘मी भाग्यवान’ हे बटण कसं काम करतं!? ते मी आता उदाहरणासहीत स्पष्ट करतो. मराठी गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये ‘फेसबुक’ हा शब्द टाका. त्यानंतर सर्च बॉक्स खालील ‘Google शोध’ या बटणावर क्लिक करण्याऐवजी त्याशेजारील ‘मी भाग्यवान’ या बटणावर क्लिक करा. गुगल तुम्हाला नेहमीप्रमाणे सर्च रिझल्ट्स च्या पानावर घेऊन न जाता, थेट त्याबाबतच्या माहितीचा समावेश असलेल्या वेब पानावर घेऊन जाईल. ‘फेसबुक’ या शब्दाच्या बाबतीत ‘मी भाग्यवान’ हे बटण तुम्हाला 2know.in वेबसाईटच्या ‘फेसबुक पेज तयार करा’ या पानावर घेऊन येईल. म्हणजे सध्या या वेळी, या इथे तर तसंच दिसत आहे. ‘गुगल’ या शब्दाच्या बाबतीतही ‘मी भाग्यवान’ बटण तुम्हाला 2know.in वेबसाईट वरच घेऊन येईल.

थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘मी भाग्यवान’ हे बटण तुमचा शोध घेण्याचा वेळ वाचवतं, आणि तुम्हाला थेट इंटरनेटवरील त्या पानावर आणून सोडतं, ज्या पानात तुम्ही सर्च करत असलेल्या शब्दाबाबत अधिकाधिक माहिती आहे. आपला वेळ वाचतो, शोध घेण्याचे कष्ट वाचतात, आपल्याला मनात वाटतं, ‘मी भाग्यवान!’ आणि म्हणूनच तर या बटणाचं नाव आहे, ‘मी भाग्यवान’.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.