चांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल फोन

मागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर यासंदर्भातील लेख लिहायचा हे माझ्या आधीपासूनच मनात होतं, पण अनेकांनी प्रश्न विचारल्यानंतर हा लेख आज प्रत्यक्ष लिहायला घेतला. आपणास जर १० दहा हजार रुपयांच्या आतील एखादा नवीन फोन घ्यावयाचा असेल, तर आपण अँड्रॉईड फोनच घ्यावा असं मी आपल्याला सुचवेन. अँड्रॉईड ही गुगलने मोबाईलसाठी विकसीत केलेली ऑपरेटिंग सिस्टिम आहे. उदाहरणार्थ, ‘जावा’ किंवा ‘सिम्बियन’, तसा हा ‘अँड्रॉईड’. अँड्रॉईड ही सिस्टिम सिम्बियन पेक्षा खूपच अधिक चांगली आहे. त्यामुळे नोकियावर जरी आपलं प्रेम असलं, तरी त्यांचे अँड्रॉईड फोन नसल्याने आपण नोकियाचा विचार करणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सीचे वारे सध्या सर्वत्र वहात आहे. त्यांच्या बर्‍याच जाहिराती टि.व्ही.वरुन आणि वर्तमानपत्रातून पहायला मिळतात. पण आपण जर त्यांच्या मोबाईल फोनची तुलना इतर कंपन्यांच्या मोबाईलशी लक्षपूर्वक केली, तर इतर मोबाईल थोडेफार उजवे असल्याचे आपणास दिसून येईल. म्हणजे या इथे आपण एकाच प्राईस रेंजच्या मोबाईल्सची तुलना करत आहोत. आपणास जर दोन मोबाईलमध्ये अगदी योग्य अशी तुलना करायची असेल, तर “Compare Cell Phones” ही साईट त्यादृष्टिने अतिशय चांगली आहे.
आता मी १० हजार रुपयांच्या आतील माझ्या आवडीचे तीन मोबाईल सांगत आहे. त्यातील एक मोबाईल मी स्वतः विकत घेतला आहे. मी माझा मोबाईल ऑनलाईनच विकत घेतला आहे. कारण मला तो ऑनलाईन कमी किमतीत मिळाला.
डेल एक्ससीडी३५ मोबाईल फोन
हा मोबाईल फोन मी स्वतः विकत घेतला आहे. मला हा मोबाईल ८५०० रुपयांना मिळाला. या मोबाईलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मोबाईलची स्क्रिन हे आहे. दहा हजार रुपयांच्या आत ३.५ इंच स्क्रिन असणारे फार थोडे मोबाईल आहेत. शिवाय या मोबाईलचे पिक्सेल १० हजारांच्या आतील सर्व मोबाईल्सवर मात करतात. या मोबाईलची स्क्रिन, डिस्प्ले अतिशय उत्तम आहे. मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी, वेब ब्राऊजिंग करण्यासाठी Dell XCD35 हा एक उत्तम मोबाईल आहे. १० हजारांच्या आतील सॅमसिंग गॅलेक्सी पेक्षा हा मोबाईल कितीतरी अधिक चांगला आहे. या फोनला ३.२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. पण तरीही कॅमेरॅची क्वालिटी खूपच चांगली आहे, असं मात्र म्हणता येणार नाही.
एलजी ऑप्टिमस वन पी५०० मोबाईल फोन
हा फोन आपल्याला ९५०० रुपयांच्या आसपास मिळेल. या फोनची स्क्रिन ३.२ इंच आहे. आणि हा फोन दिसायलाही सुंदर आहे. पण मी असं ऐकलं आहे की, या फोनच्या स्क्रिनचा ब्राईटनेस कमी जास्त करता येत नाही. Dell XCD35 मध्ये मात्र ही सुविधा आहे. LG Optimus One P500 चा कॅमेरा ३.१५ मेगापिक्सेलचा आहे (मेगापिक्सेलचा आणि कॅमेरॅच्या क्वालिटीचा फारसा असा संबंध नसतो.). आपला जर Dell वर विश्वास नसेल, तर आपण LG चा हा फोन घ्यायला काही हरकत नाही.
स्पाईस एमआय-३५०एन मोबाईल फोन
खरं तर माझ्या दृष्टिने १० हजार रुपयांच्या आतील हाच सर्वोत्तम मोबाईल फोन आहे. या मोबाईल फोनला व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरचा कॅमेरा आहे. हा एक ड्युअल सिम अँड्रॉईड फोन आहे. ३.५ इंचांची स्क्रिन आहे, ३.२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, आणि या फोनची किंमतही केवळ ७५०० रुपयांच्या आसपास आहे. मी केवळ Spice च्या सर्व्हिस सेंटर बाबत त्यावेळी साशंक होतो, म्हणून मी हा फोन घेतला नाही. बाकी या फोनची बॅटरीही चांगली आहे आणि आपण ३२ जी.बी. पर्यंत या फोनची मेमरी वाढवू शकतो.
वर सांगतलेल्या तीनही मोबाईलच्या कॅमेरँना फ्लॅशची सुविधा नाहीये. १० हजार रुपयांच्या आतील कोणत्याही अँड्रॉईड फोनच्या कॅमेरॅला फ्लॅशची सुविधा नाहीये. बाकी सर्वांचे कॅमेरे ऑटो-फोकस आहेत. अँड्रॉईड फोनची बॅटरी खूप दिवस जाईल अशी अपेक्षा करु नका. कारण आपण आपला मोबाईल Wi-Fi, GPS ला जोडला की, बॅटरी जवळपास ६ तासांत उतरते. हे फोन लॅपटॉपसारखे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाकी आपण जर हे फोन केवळ बोलण्यासाठी वापरले, तर मात्र साधारत: ३-४ दिवस आपल्या फोनची बॅटरी टिकेल. अँड्रॉईड फोन हे काही तरी करुन दाखवण्यासाठी बनले आहेत, तेंव्हा त्यांना अधिक उर्जा ही लागणारच.

आज आपण १० हजार रुपयांच्या आतील काही मोबाईल फोन पाहिलेले आहेत. हे माझ्या दृष्टिने चांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल फोन आहेत.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.