जीमेल डेस्कटॉप नोटिफिकेशन

जीमेल ही गूगलची ईमेल सेवा पुरविणारी आघाडीची साईट आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेकजण रोजच्या कामासाठी जीमेलचा वापर करत असतील. आजकाल अनेक महत्त्वाचे व्यवहार ईमेलच्या माध्यमातून हाताळले जातात आणि जीमेल ही साईट त्यामध्ये महत्त्वाची आहे.
आपल्या मोबाईलवर जेंव्हा एखादा मेसेज येतो, तेंव्हा आपल्या फोनची रिंग वाजते, आणि आपल्याला मेसेज आल्याचं समजतं. म्हणजेच आपल्याला मेसेज आल्याचं नोटिफिकेशन मिळतं. पण ईमेलच्या बाबतीत असं होत नाही. नवीन स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा आहे. पण हे स्मार्टफोन अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाहीत. संगणकाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आपण जर एखाद्या डेस्कटॉप चॅट क्लाएंटमध्ये लॉग इन असाल (उदा. गूगल टॉक मेसेंजर), तर आपल्याल नवीन मेल आल्याचं नोटिफिकेशन मिळतं.
पण आपणाला जर चॅटिंगची फारशी आवड नसेल, किंवा आपण कोणतेही मेसेंजर वापरत नसाल, तर जीमेलने स्वतःमध्येच अशी सोय करुन दिली आहे की, आपल्या जीमेल खात्यात नवीन मेल आला की त्यासंदर्भातील नोटिफिकेशन आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल.
रोजच्या व्यवहारासाठी आपण जीमेलचा वापर करत असलो, तरी नेहमी नेहमी जीमेलमध्ये जाऊन नवीन मेल आला आहे का? हे पाहण्यासाठी डोकावणं हे तसं गैरसोयीचंच म्हणावं लागेल. कारण आपण आपल्या संगणकावर महत्त्वाचं काम करत असतो आणि अशावेळी आधून मधून सारखं जीमेलवर जाऊन नवीन मेलबाबत पाहणं, हे तसं फारसं काही सोयीचं वाटत नाही. अनेकदा असंही होऊ शकतं की, कोणताही नवीन मेल आलेला नसेल, तेंव्हा विनाकारण स्वतःला व्यत्यय करुन घेण्यात काही अर्थ नाही.
याऊलट कलप्ना करा की, आपण संगणकावर महत्त्वाचं काम करत आहात, आणि नवीन मेल आला की, त्यासंदर्भातील सुचना लगेच (नोटिफिकेशन) आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल. तर जीमेलमधील नोटिफिकेशनची ही सुविधा कशी सुरु करता येईल? ते आपण पाहूयात. ही सुविधा सुरु करणं खूपच सोपं आहे.

गूगल डेस्कटॉप नोटिफिकेशन सुरु करण्यासंदर्भातील चित्र
यासाठी आपण गुगल क्रोम हे वेब ब्राऊजर वापरत असणं आवश्यक आहे (अधिक माहिती – डेस्कटॉप नोटिफिकेशन). आपले जीमेलचे खाते उघडा. पानाच्या उजव्या बाजूला वर आपल्याला एक चक्रासारखे (गिअर) चिन्ह दिसेल. ते ‘सेटिंग’चे चिन्ह आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर उघडल्या गेलेल्या यादीत, आपल्याला काही पर्याय दिसून येतील. त्या पर्यायांमधून ‘Settings’ वर क्लिक करा. तर या मेल सेटिंग्जमध्ये ‘General’ सेटिंग्ज आपल्याला पाहायच्या आहेत. आत्ता आपण ‘जनरल सेटिंग्ज’ मध्येच आहोत. तेंव्हा आपल्या समोर जे पान आहे, ते खाली स्क्रोल करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘Desktop Notifications’ जवळ या. इथे ‘New mail notifications on’ ची निवड करा. त्यानंतर ‘Click here to enable desktop notification’ यावर क्लिक करा. आता अ‍ॅड्रेसबारच्या खाली एक सुचना येईल. ही सुचना आपल्याकडून ‘डेस्कटॉप नोटिफिकेशन’ सुरु करण्याबाबतीत खात्री करुन घेण्यासाठी असेल. त्यासाठी Allow वर क्लिक करा. सरतेशेवटी जनरल सेटींग्ज पानाच्या तळाला ‘Save Changes’ वर क्लिक करा.
जीमेल डेस्कटॉप नोटिफिकेशन मिळविण्याची सर्व प्रक्रिया आता आपण पूर्ण केली आहे. आपल्या वेब ब्राऊजरच्या एका टॅबमध्ये जीमेल ओपन करुन ठेवा आणि नवीन मेल आला असेल किंवा नाही!? याचा विचार न करता आपले काम एकाग्रतेने करा. जेंव्हा आपल्याला एखादा नवीन चॅट मेसेज येईल किंवा ईमेल येईल, त्याची सुचना आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.