टास्कबारवरचा स्टार्टअप क्विक लॉन्च आयकॉन कायमचा घालवा

पल्या संगणाकावर खूप सारे क्विक लॉन्च आयकॉन ठेवले, तर आपल्या संगणकाची गती कमी होते. आणि म्हणूनच संगणकावर कमीतकमी क्विक लॉन्च आयकॉन्स ठेवणं आवश्यक आहे. अनेकदा काय होतं!? आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आणि मग आपल्या नकळतच आणखी एका क्विक लॉन्च आयकॉनची भर पडते. अशावेळी नको असलेल्या आयकॉन्सवर राईट क्लिक करुन Exit होऊन, आपण त्यांना तात्पुरतं घालवू शकतो. पण नको असलेल्या क्विक लॉन्च आयकॉनला जर कायमस्वरुपी घालवून टाकायचं असेल तर?

दोन महिन्यांपूर्वी आमच्याकडे एक संगणक डॉक्टर आलेला. टास्कबारवरचे काही आयकॉन्स कायमस्वरुपी घालवून टाकयचे आहेत, असं मी त्याला सांगितलं आणि कुतूहलाने ‘ते कसं करायचं!?’ हे मी त्याला विचारलं. लागलीच माझ्या मूळ प्रश्नाला बगल देत तो म्हणाला, ‘मी करतो की! काही काळजी करु नका.’ त्याने पटापट ‘रन’ मध्ये काही शब्द टाईप केले आणि माझी नजर स्थिर व्हायच्या आत आयकॉन्स घालवून टाकले. तो जे सोपं काम करतोय, ते मी शिकलो… तर मग त्याला काय काम उरणार!?

शेवटी इंटरनेटरुपी स्थितप्रज्ञ गुरुने मला याबाबत माहिती सांगितली, आणि तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. संगणक स्टार्ट केल्यानंतर एक एक करुन क्विक लॉन्च आयकॉन्स अवतरु लागतात. त्यांपॆकी न लागणार्‍या आयकॉन्सना कायमस्वरुपी घालवण्यासाठी खालील पायर्‍या पूर्ण करा.

टास्कबार आयकॉन्स घालवा

१. संगणकावर डाव्या कोपर्‍यात खाली असणार्‍या “start” या बटणावर जा.
२. त्यानंतर “Run” या पर्यावर क्लिक करा.
३. आता open समोर “msconfig” हे शब्द टाईप करा. आणि ok वर क्लिक करा.
४.  System Configuration Utility या नावाची विंडो ओपन होईल.
५. त्या विंडोच्या startup या पर्यायावर क्लिक करा.
६. तुमचा संगणक सुरु केल्यानंतर… “जे प्रोग्राम्स लगेच सुरु होऊ नयेत, असं तुम्हाला वाटत असेल” (टास्कबारवरचे आयकॉन्स घालवायचे असतील), त्यांच्यासमोरील टिकमार्क काढून टाका.
७. तुमची निवड झाल्यानंतर ok वर क्लिक करा.
८. पुढच्यावेळी संगणक सुरु केल्यानंतर, तुम्हाला हवे आहेत, असेच आयकॉन्स तुम्हाला दिसून येतील.

मध्यंतरी मी माझ्या डेस्कटॉप वरची खूप सारी गर्दी कमी केली, आणि माझा संगणक पळू लागला! संगणकाची गती वाढवण्यासाठी डेस्कटॉप रिकामा करणे हाही एक अत्यंत उपयुक्त असा पर्याय आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.