डू फॉलो, नो फॉलो लिंक, पेजरँक तक्ता आणि फायरफॉक्स अॅड-ऑन

खाद्या पानाच्या पेजरँक वरुन आपण त्या पानाची गुगल सर्च इंजिन लेखी किंमत काय आहे!? ते जाणून घेऊ शकतो. पेजरँक वरुन एखाद्या पानाचा दर्जा आणि विश्वसनियता आपण ‘सर्वसाधारणपणे’ समजू शकतो. आपल्या ब्लॉगची अथवा वेबसाईटची पेजरँक कशी पहावी!? ते आपण मागील एका लेखात पाहिले आहेच. एखाद्या वेबसाईट वर जर आपल्या वेबसाईट/ब्लॉगची लिंक दिली गेली असेल, तर गुगल सर्च इंजिनच्या दृष्टिने त्या वेबसाईट ने तुमच्या वेबसाईटला दिलेले ते ‘मत’ आहे. उदाहरणार्थ, माझ्या ब्लॉगची लिंक ही ‘मराठी ब्लॉग विश्व’ सारख्या बर्‍याच वेबसाईट्सवर आहे. तर ते माझ्या वेबसाईटसाठी त्यांनी दिलेले ‘मत’ आहे. किंवा माझ्या वेबसाईटवरुन दिल्या गेलेल्या सर्व लिंक म्हणजे मी त्या लिंकना दिलेले ‘मत’आहे. अशा लिंक्स या दोन प्रकारच्या असू शकतात ‘डू फॉलो’ लिंक्स आणि ‘नो फॉलो’ लिंक्स.

डू फॉलो आणि नो फॉलो लिंक :
‘डू फॉलो’ लिंक म्हणजे सर्च इंजिन त्या लिंकला ‘मत’ या अर्थाने गृहित धरु शकतात. ‘नो फॉलो’ लिंक म्हणजे सर्च इंजिन त्या लिंकला ‘मत’ या अर्थाने गृहित धरत नाहीत. उदा. ब्लॉगरच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपण जी लिंक टाकतो, ती ‘नो फॉलो’ लिंक म्हणून गृहित धरली जाते. ‘नो फॉलो’ लिंक करण्यासाठी लिंकच्या कोड मध्ये थोडासा बदल करण्यात येतो.

पेजरँक तक्ता :
आता कोणाच्या मताला किती किंमत आहे!? हे ते मत देणार्‍या वेबसाईटच्या पेजरँक वर अवलंबून आहे. जितकी पेजरँक अधिक असेल, तितके वजनदार ‘मत’! यावरुन पेजरँक साठीचा एक तक्ता तयार होतो, तो मी खाली देत आहे. हा मला इंटरनेटवर मिळाला आहे आणि त्याची विश्वसनीयता मी पडताळून पाहिलेली नाही. पण एक सर्वसाधारण अंदाज यावा या उद्देशाने तो मी खाली देत आहे. मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्या तक्त्यावर क्लिक करा.

पेजरँक तक्ता

आपल्या वेब पानाने एखादी पेजरँक मिळविण्यासाठी कोणत्या पेजरँक वाल्या पानांकडून किती लिंक्सची!? म्हणजेच मतांची गरज आहे!? हे आपल्याला वरील तक्त्यावरुन स्पष्ट होईल. त्यानुसार आपण आपल्या ब्लॉगसाठी, वेबसाईटसाठी ‘लिंक बिल्डिंग’ चा प्रयत्न करु शकतो.

फायरफॉक्स अॅड-ऑन :
इंटरनेट वरील कोणत्या पानाची पेजरँक किती!? हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. त्यासाठी एक फायरफॉक्स अॅड-ऑन आहे. तर हे फायरफॉक्स अॅड-ऑन आपल्याला या इथे मिळेल. फायरफॉक्स च्या खालच्या बाजूला स्टेटस बारमध्ये उजव्या कोपर्‍यात आपल्याला हे अॅड-ऑन दिसेल. आपण इंटरनेट सर्फ करत असताना ज्या पानावर असाल, त्या पानाची पेजरँक आपल्याला त्या तिथे दिसेल. हे अॅड-ऑन आपल्या फायरफॉक्स वेब ब्राऊजरवर इन्स्टॉल केल्यानंतर आपला फायरफॉक्स वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा आणि मग आपले अॅड-ऑन काम करु लागेल. इंटरनेटवरील प्रत्येक पानाची गुगल पेजरँक आपल्याला समजेल.

गुगल पेजरँक बाबत आज आपण थोडीफार माहिती घेतली आहे. मला वाटतं नवीन ब्लॉग, वेबसाईट चालकांना याचा नक्कीच फायदा होईल

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.