तुमचा ई मेल वाचला गेला आहे का? मोफत ई मेल ट्रॅकिंग

पण जर एखाद्याला कॉल केला आणि त्याने तो उचलला नाही, तर आपण त्याच्यापर्यंत पोहचू शकलो नाही, हे साधं लॉजिक आपल्याला समजू शकतं. पण जर एस.एम.एस. केला, तर समोरुन परत रिल्पे आल्याशिवाय आपल्याला समजतच नाही की, समोरच्याने आपला एस.एम.एस. वाचला आहे की नाही!? आणि अगदी हीच समस्या आपण ई-मेलच्या बाबतीतही अनुभवत असतो. समोरुन परत ई मेल आल्याशिवाय आपल्याला कळतच नाही की, त्याने तो वाचला आहे की नाही!? आणि बर्‍याचदा तर असेही ई-मेल पाठवलेले असतात, ज्यांच्या रिप्लेची अपेक्षाच आपण बाळगलेली नसते. म्हणजेच त्यावेळी आपल्याला फक्त काही सांगायचं असतं. आणि जर एखादा अतिशय महत्त्वाचा मेल (उदा. लव्ह लेटर इ. 🙂 आपण एखाद्याला पाठवलेला असेल, तर अशावेळी त्याने तो वाचला आहे की नाही? हे आपल्याला समजणं आवश्यक आहेच आहे. कारण काही लोक महिन्यातून एकद्यावेळीच आपला मेल चेक करतात, आणि काही लोक कधीच नाही!

…आणि म्हणूनच ‘आपला ईमेल वाचला गेला आहे की नाही!?’ ते पाहण्यासाठी आपण ‘ई मेल ट्रॅकिंग कशी करायची!?’ ते पाहणार आहोत. त्यासाठी ‘स्पायपिग’ या वेबसाईटचा उपयोग आपण करुन घेणार आहोत.

मोफत ई-मेल ट्रॅकिंग

spypig.com :  स्पायपिग.कॉम वर जो एक फॉर्म दिला आहे, तो भरायला सुरुवात करा. आपला ईमेल ऍड्रेस टाईप करा, मेसेज टायटल लिहा. आणि आता स्टेप ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे एका चित्राची निवड करा. शक्यतो पहिलंच असू द्या, म्हणजे तुमची हलकीफुलकी हेरगिरी कुणाला समजणार नाही 🙂 तो मेल एखादी व्यक्ती जितक्या वेळा ओपन करुन वाचेल, तितक्या वेळा तुम्हाला समजणं आवश्यक आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर स्टेप ४ मध्ये सांगितलेला एक नंबर निवडा. तुमचा मेल जास्तितजास्त १०० वेळा वाचला गेल्याचं तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजू शकतं. स्टेप ५ मध्ये जे बटण दिलं आहे त्यावर आता क्लिक करा आणि ६० सेकंदांच्या आत त्याखाली दिसणारी इमेज तुमच्या मेलमध्ये कॉपी आणि पेस्ट करा. फायरफॉक्स वाल्यांनी मात्र ती इमेज माऊसच्या लेफ्ट क्लिकच्या साहाय्याने उचलावी आणि आपल्या वेब ब्राऊजरच्या दुसर्‍या टॅबमध्ये असलेल्या मेलमध्ये टाकून द्यावी. आणि आता नेहमीप्रमाणे आपला मेल सेंड करावा.

मी माझ्याच एका ई मेल आय.डी.वरुन दुसर्‍या ई मेल आय.डी.वर, मेल सेंड करुन ही सुविधा वापरुन पाहिली. स्पायपिग ही वेबसाईट ईमेल नोटिफिकेशन्सद्वारे ‘तुमचा मेल किती वेळा वाचला गेला!?’ याची माहिती देते!

महत्त्वाच्या आणि गंभीर प्रसंगी मेल वाचणं – न वाचणं यावरुन गॆरसमज निर्माण होत असेल, तर अशावेळी ई-मेल ट्रॅकिंग ऎवजी आपल्या अंतरात्म्यावर अधिक विश्वास ठेवावा. फक्त मनोरंजनाचा एक भाग म्हणून मी या सुविधेची माहिती सांगत आहे. बाकी जीमेलने स्वतः हून ही सुविधा पुरवली असती, तर ते जास्त चांगलं झालं असतं.

अशाच प्रकारची सुविधा पुरवणारी आणखी एक वेबसाईट – whoreadme.com
साधा ‘वेब हिट काऊंटर’ टाकून ई मेल ट्रॅकिंग करता येतं का? हेही एकदा तपासून पहायला हवं!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.