फेसबुक आणि ट्विटर मराठीतून!

फार पूर्वी मी स्वतः फेसबुकच्या मराठी भाषांतरात सहभाग नोंदवला होता आणि त्याबाबत फेसबुकडून पोचपावतीही मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या मराठी भाषांतराचे कार्य चालू असले, तरी हे भाषांतर अजूनही १०० टक्के पूर्ण झालेले नाही. पण सद्यस्थितीत फेसबुकचे ७०% मराठी भाषांतर पूर्ण झाले असून आता आपण सर्वांनी ‘मराठी फेसबुक’ वापरण्यास सुरुवात करायला हरकत नाही. इंटरनेटवर मराठी वापरण्याची सवय नसल्याने सुरुवातीस आपणास फेसबुकचे खाते मराठीतून वापरणे काहीसे गैरसोयीचे वाटू शकेल! पण शेवटी हा सर्व सवयीचा भाग असून हळूहळू तांत्रिक मराठी शब्दही आपणास अंगवळणी पडतील. मी स्वतः जीमेल, ट्विटर मराठीतूनच वापरतो आणि आता मी माझ्या स्वतःच्या फेसबुक खात्याचीही भाषा बदलून ‘मराठी’ केली आहे. शेवटी आपल्या भाषेतून जगण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो!

फेसबुकची भाषा ‘मराठी’ कशी करावी?

फेसबुकची भाषा ‘मराठी’ करणे अतिशय सोपे आहे! फेसबुकच्या Language Settings मध्ये जा. तिथे समोरच भाषा बदलण्यासंदर्भातील पर्याय असेल. त्या पर्यायासमोरुन Edit वर क्लिक करा. त्यानंतर भाषांच्या यादीतून आपली ‘मराठी’ भाषा निवडा आणि हा बदल Save करा. आता आपणास जवळपास संपूर्ण फेसबुक मराठीमधून दिसू लागेल.

मराठी फेसबुक
मराठी इंटरनेटचे फेसबुक पान मराठीत! – भाषांतरीत भाग लाल चौकटीत दाखवला आहे

ट्विटरची भाषा ‘मराठी’ कशी करावी?

ट्विटरने नुकतीच आपली सेवा ही ‘मराठी’ भाषेतून उपलब्ध केली आहे. ट्विटरची भाषा बदलून ‘मराठी’ करणे हे देखील अत्यंत सोपे आहे. ट्विटरच्या Settings मध्ये जा आणि इथे समोरच आपणास भाषा बदलण्यासंदर्भातील पर्याय दिसेल. तेथून ‘मराठी’ भाषेची निवड करा आणि हा केलेला बदल Save करा. आपणास आता आपले ट्विटर खाते ‘मराठी’ भाषेतून दिसू लागेल.

मराठी ट्विटर
मराठी ट्विटर – भाषांतरीत भाग लाल चौकटीत दाखवलेला आहे

फेसबुक आणि ट्विटरचे मराठी भाषांतर पाहिले असता सहजच असे मनात येऊन जाते की, हे भाषांतर अधिक सुलभ व चांगले होऊ शकले असते. पण जे काही भाषांतर करण्यात आले आहे, तेही काही वाईट नाही. आपल्याला ते आवडेल अशी मला खात्री आहे. सुरुवात तर झाली आहे! आता हळूहळू यात सुधारणा देखील होत जाईल.