फेसबुक मेसेंजर

गूगल, याहू, एम.एस.एन., यांचे स्वतःचे असे मेसेंजर आहेत. पण आजची सर्वांत आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ‘फेसबुक’ने मात्र आपले स्वतःचे मेसेंजर आत्तापर्यंत निर्माण केले नव्हते. खरं तर, अनेक लोक आपल्या मित्रांबरोबर चॅट करण्यासाठी फेसबुक चॅटचा वापर करतात. तेंव्हा फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी खास मेसेंजर का निर्माण केला नाही? याचं मला आश्चर्व वाटत होतं. पण नुकताच फेसबुक इंडियाचा अपडेट मला वॉलवर दिसला, आणि त्यावरुन असं समजलं की, फेसबुकनेही आता आपला मेसेंजर उपलब्ध करुन दिला आहे.
फेसबुक हे जगातील सर्वांत प्रसिद्ध असे सोशल नेटवर्क आहे. आज करोडो लोक आपल्या मित्रपरीवारीशी जवळीक साधण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. मध्यंतरी फेसबुकने “फेसबुक फॉर एव्हरी फोन” हे अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करुन लोकांच्या अधिक जवळ पोहचण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांचा तो प्रयत्न खरोखरच चांगला होता. पण एकंदरीत अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत फेसबुक म्हणावं तितकं कुशल वाटत नाही. त्यांचे अ‍ॅप्लिकेशन्स पाहून असं वाटतं की, त्यांना त्याची फारशी पर्वाच नाही. फेसबुकच्या मागे पैशांचं आणि तज्ञांचं इतकं मोठं पाठबळ असताना त्यांची त्याबाबतची अनास्था न समजन्याजोगी आहे. फेसबुकचे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन जर आपण पाहिलेत, तर फेसबुक ही इतकी मोठी कंपनी आहे यावर विश्वास बसत नाही. अगदी सुमार दर्जाचे फेसबुक अ‍ॅप्लिकेशन त्यांनी अँड्रॉईड मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. त्यात विशेष असं काहीच नाही आणि ते अ‍ॅप्लिकेशन फोनची महत्त्वाची इंटरनल मेमरी देखील खूप खर्च करतं. अँड्रॉईड ब्राऊजर वापरुन फेसबुक वापरणं हे त्यांचे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यापेक्षा कितीतरी अधिक सुलभ आहे. आणि त्यांच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये मूळ मोबाईल साईटहून वेगळं आणि निराळं असं काहीच नाहीये.

फेसबुक मेसेंजर
अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत आपला हाच सुमार दर्जा कायम राखत फेसबुकने आता आपले मेसेंजर संगणकासाठी उपलब्ध केले आहे. कालांतराने ते कदाचीत या मेसेंजरमध्ये सुधारणा करतीलही, पण सध्यातरी ते आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन वापरावे असं त्यात काहीही नाही. सरळ ब्राऊजरच्या माध्यमातून फेसबुक उघडून चॅट का करु नये? या प्रश्नाचं उत्तर फेसबुक मेसेंजरचा वापर करुनही सापडत नाही. फेसबुक मेसेंजरमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नाही, किंवा आपण एखाद्या मित्रासाठी ऑफलाईन देखील जाऊ शकत नाही. आपल्या संगणकाच्या बॅकग्राऊंडला जर चॅट अ‍ॅप्लिकेशन सुरु ठेवण्याची आपल्याला सवय असेल, तरच आपण या फेसबुक मेसेंजरचा विचार करावा. पण आपला जर केवळ हाच हेतू असेल, तर आपल्यासाठी याहू किंवा एम.एस.एन. चे मेसेंजर्स आहेतच! या मेसेंजर्समध्ये फेसबुक चॅटची सुविधा आहे. तेंव्हा केवळ एक उत्सुकता म्हणून आपल्याला फेसबुक मेसेंजर वापरुन पहायचे असल्यास ते या इथे उपलब्ध आहे – फेसबुक मेसेंजर.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.