ब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल?

पल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष!? मलाही अगदी तसंच वाटलेलं आणि म्हणूनच मी या विषयावर यापूर्वी काही लिहिलं नव्हतं! पण प्रत्यक्ष भेटीत मला एका नवख्या ब्लॉगरने याबाबत शंका विचारली. आपण जेंव्हा ब्लॉगिंगला नुकतीच सुरुवात करतो, तेंव्हा छोट्या छोट्या समस्याही आपल्याला मोठ्या वाटत असतात. एकाला पडलेला प्रश्न हा अनेकांच्या मनात पडलेला असू शकतो, या भावनेतून मी हा आजचा लेख लिहित आहे.

ब्लॉगच्या शिर्षकाखाली आडव्या पट्टीत आपल्याला जे दुवे (लिंक) दिसतात, त्यांना एकंदरीत आपण ‘मेनूबार’ असं म्हणू शकतो. मेनूबार हे लिंकबारचंच एक स्वरुप असून, केवळ ब्लॉगच्या शिर्षकाखाली दर्शनी भागात ‘लिंकबार’ वापरला की, त्याला मेनूबार असं म्हणता येईल. काही ब्लॉग टेम्प्लेट मध्ये या आडव्या पट्टीला ‘नेटवर्क’ असंही संबोधलं जातं. आपल्या ब्लॉग टेम्प्लेट मध्ये जर आधीपासून ‘नेटवर्क’ हे गॅजेट नसेल, तर ते कसं जोडता येईल? हे आता आपण पाहूयात.

१. सर्वप्रथम आपल्याला ब्लॉगर.कॉम वर लॉग-इन व्हावं लागेल.
२. आता ज्या ब्लॉगला मेनूबार जोडायचा आहे, त्या ब्लॉगच्या Design विभागात शिरा.
३. मेनूबार म्हणजे काय? हे आपल्याला अजून कळालेलं नाही का? मी हे उदाहरणाने स्पष्ट करतो. या ब्लॉगच्या शिर्षकाखाली आपल्याला दुव्यांचा समावेश असलेली एक आडवी पट्टी दिसत असेल, त्यात काही दुवे देण्यात आले आहेत, जसे.. मोफत डाऊनलोड, मोफत मराठी ई-पुस्तकं, मराठी गाणी इ. तर या दुव्यांचा समावेश असलेली जी आडवी पट्टी आहे, त्यालाच मी ‘मेनूबार’ असं म्हणत आहे.

2know.in चा मेनूबार

४. पायरी क्रमांक दोन प्रमाणे कृती करुन आपण ब्लॉगच्या Design या विभागात शिरला आहात. सहाजीकच, Design विभागातील Page Element हा विभाग आता आपल्या समोर दिसत असेल. इथून Add a Gadget वर क्लिक करा.
५. Link List या गॅजेट (मेनूबार) समोरील ‘अधिक’ चिन्हावर क्लिक करा. इथे मेनूबारमध्ये आपण जोडणार असलेल्या दुव्यांसंबंधी माहिती भरा. उदा. New Site URL समोर http://marathiblogs.net असं टाका आणि New Site Name समोर ‘मराठी ब्लॉग विश्व’ असं टाका. अशाप्रकारे ‘मराठी ब्लॉग विश्व’ आपल्या मेनूबारमध्ये जोडले जाईल. असे अनेक दुवे आपण आपल्या मेनूबार मध्ये जोडू शकता. आपल्या इतर ब्लॉगचे दुवे या मेनूबारमध्ये देण्यास आपल्याला आवडेल.
६. आत्ता आपण जे मेनूबार गॅजेट तयार केलं आहे, ते ‘हेडर’ (header) च्या खाली नेऊन टाका. यासाठी आपण ते गॅजेट ड्रॅग आणि ड्रॉप करुन शकता. म्हणजेच माऊसच्या राईट क्लिकच्या सहाय्याने हे गॅजेट उचलून ते हेडर खाली नेऊन राईट क्लिक सोडून द्यायचे.
७. अशाप्रकारे आपला मेनूबार तयार झाला आहे. आता आपला ब्लॉग अधिक आकर्षक आणि उपयुक्त दिसू लागला असेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.