माझा आकड्यांचा प्रवास, वाचकसंख्या

मी नवीन नवीन ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेंव्हा सारं काही माझ्यासाठी अगदी नवीन होतं. मी माझ्या ब्लॉगवर वाचकसंख्या समजावी म्हणून गुगल ऍनॅलिटिक्सचा कोड टाकला, माझ्या ब्लॉगपासून कमाई व्हावी म्हणून ऍडसेन्सचा कोड टाकला. अशाप्रकारे माझ्याकडे आता वेळोवेळी पाहण्यासाठी काही आकडे होते. या आकड्यांच्या माध्यमातून सुरुवातीला माझी चांगली करमणूक होत होती. पण एका ठरावीक मर्यादेपलीकडे या आकड्यांची हालचाल होईनाशी झाली. आणि ही ‘ठरवीक मर्यादाही’ अशी होती की, ती सुरु होताच संपत असे. असंच सुमारे दीड वर्ष गेलं. मला नुसतंच मनातून वाटत राहयचं की, हे आकडे वाढयला हवेत. पण काही केल्या ते वाढतील असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी त्यादृष्टिने विशेष असं काहीच करत नव्हतो. आणि दुसरं म्हणजे मी लाईफ मधल्या इतर गोष्टींत याकाळात जरा जास्तच गुंतून गेलो. आता आकडे पाहताच येऊ लागली ती हताशा! पण मागच्या वर्षीच्या हिवाळ्यात हे सारं चित्र पालटलं.

वाचकसंख्या

याकाळात लिहिलेला माझा एका नवीन इंग्रजी लेख सुरुवातीलाच आलेखात एकदम वर गेला आणि त्याला रोज सर्च इंजिनच्या माध्यमातून ५० (unique visitors) लोक भेट देऊ लागले. त्यापाठोपाठ लिहिलेल्या आणखी एका इंग्रजी लेखानेही रोज २०-३० लोक जमवायला सुरुवात केली. मग मात्र माझ्यात थोडासा उत्साह संचारला. पण या संचारलेल्या उत्साहाचा काही एक फायदा न होता, त्यानंतरचे अनेक आर्टिकल्स फ्लॉप झाले. त्यामुळे या वर्षीच्या जानेवारीपर्यंत एकंदरीत परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.  पण त्यानंतर अचानकच माझ्या काही जुन्हा इंग्रजी लेखांनी वाचकसंख्येच्या बाबतीत मोठी उचल खाल्ली आणि ते रोज ०-५ पासून प्रत्येकी २०-२०० लोक जमवू लागले. वर नमूद केलेल्या ज्या इंग्रजी लेखाला रोज ५० लोक भेट होते, त्याला रोज २०० लोक भेट देऊ लागले. आणि नुकताच हा आकडा त्या लेखाच्या बाबतीत ३२५ (unique visitors) च्या घरात गेला आहे. याचा परिणाम म्हणून आजच्या घडीला महिन्याला मी लिहिलेली इंग्रजी पाने साधरणतः ४०००० (pageviews) वेळा पाहिली जातात. आणि मी लिहिलेली मराठी पाने साधरणतः १०००० (pageviews) पाहिली जातात. म्हणजेच एकंदरीत मी लिहिलेली पाने जगभरातून महिन्याला साधरणतः ५०००० (pageviews) वेळा पाहिली जातात. (साधरणतः २२००० युनिक व्हिजिटर्स) मला वाटतं हा एक ठिक आकडा आहे. पण याच्या दहापटीने तरी हा आकडा कमीतकमी वाढायला हवा. म्हणजे तो कमीतकमी ५००००० तरी व्हायला हवा. यासाठीच मी प्रयत्न करेन!

खूप सारा आभ्यास करुनही अनेकदा कोणता लेख सर्च इंजिनच्या माध्यमातून गर्दी खेचून आणेल ते सांगता येत नाही. मी सहज लिहिलेल्या लेखांनाही मोठी वाचकसंख्या मिळालेली आहे आणि खूप कष्ट करुन लिहिलेले लेखही सर्च इंजिन च्या वर्तणुकीमुळे फ्लॉप झाले आहेत. फक्त मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ‘गुगल मराठी सर्च इंजिन’ मध्ये 2know.in चे लेख शक्यतो पहिल्या पाचमध्ये, दहामध्ये असतातच, पण दुर्देवाने मराठी सर्च इंजिन वापरणारे लोक फार क्वचित आढळतात.

मी माझ्या परिने अनेकानेक लेख लिहायचा प्रयत्न करत आहेच. पण मला माहित आहे, की इंटरनेट च्या शर्यतीत माझा नंबर जगात सध्यातरी खूपच खाली लागतो. मला वाटतं इंग्रजी व मराठी लेखांची वाचकसंख्या मिळून तो १ ते ५ पाच लाखांच्या दरम्यान कुठेतरी लागत असेल. यासाठी मी ऍलेक्सा रँकिंगचे ठोकठाळे गृहित धरले आहेत. अजून बरीच मजल मारायची आहे. खूप सारे लेख मला यासाठी आभ्यासपूर्वक लिहावे लागतील. कदाचीत काही वेगळ्या कल्पनांवर मला यासाठी विचार करावा लागेल.

शेवटी मला एका यशस्वी ब्लॉगरच्या मुलाखतीतला एक प्रश्न आठवला. आता हा प्रश्न या लेखाशी सुसंगत आहे की नाही!? मला माहित नाही. पण आता आठवला आहे, तर लिहून टाकतो. त्याला विचारलं गेलं, ‘जर तुला टाईममशीन मधून मागे जातं आलं, तर आत्ताचा ‘तू’ मागच्या ‘तू’ ला कोणता सल्ला देशील!?’ ‘तू’ च्या इथे त्या ब्लॉगरचं नाव होतं. मी ते नाव विसरलं असल्याने ‘तू’ असं लिहिलं आहे. तो म्हणाला, ‘मी हे सारं काम एकट्यानेच न करण्याबाबत त्याला सांगेन.’ मी या संभाषणाचा आठवत असलेला मतितार्थ सांगितला आहे. पण शेवटी मला हा एक फारच मोलाचा सल्ला वाटतो.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.