मोबाईल इंटरनेट, गुगल मोबाईल

इंटरनेट चा उपयोग करण्यासाठी, पाहण्यासाठी मोबाईल फोनचा वापर दिवसागणिक अधिकाधिक होत चालला आहे. खास करुन आता अधुनिक मोबाईल बाजारात येऊ लागले आहेत आणि 3G नेटवर्क सुद्धा सर्वत्र पसरु पहात आहे. सध्या 3G स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या बातम्या वर्तमानपत्रातून गाजत आहेतच. पुढील महिन्यापासून BSNL पुण्यामध्ये 3G सेवा सुरु करणार असल्याचे माझ्या वाचनात आले. त्यामुळे मोबाईल इंटरनेटचा स्पीड अनेक पटींनी वाढणार असून, मोबाईलवर इंटरनेटचा वापर करणं कंटाळवाणं वाटणार नाही. अधुनिक मोबाईल आणि 3G नेटवर्क नवीन क्रांती घडवतील हे नक्की!

मोबाईल वापरकर्ते

माझी इंटरनेटशी ओळख झाली ती मोबाईलच्या माध्यमातूनच, आणि साधरण दोन वर्ष तरी मी मोबाईलवरच इंटरनेट पहात होतो. अगदी आपली ‘मराठी ब्लॉग विश्व’ ही वेबसाईटदेखील मला मोबाईल नेटच्या माध्यमातूनच प्रथम दिसली! माझा पहिला मराठी ब्लॉग देखील मी मोबाईलवरुनच लिहिला आहे. त्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, हे वेगळं सांगायला नकोच. पण त्यावेळी मला त्याबाबत मोठी उत्सुकता आणि उत्साह होता. तुमचा मोबाईल जर मराठी भाषा, देवनागरी लिपी सपोर्ट करत असेल, तर पडल्या पडल्या मोबाईलवर मराठी ब्लॉग वाचायला मजा येते.

गुगल मोबाईल

मोबाईल इंटरनेटच्या क्षेत्रातदेखील गुगलने मोठी बाजी मारली आहे. काही महिन्यांपूर्वी आपण गुगलचे मोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर पाहिले आहे. शिवाय जीमेलचे मोबाईल सॉफ्टवेअर देखील आपण पाहिले आहे. ‘मोबाईल संदर्भात’ 2know.in वर प्रकाशीत झालेल्या सर्व नोंदी तुम्हाला या इथे एकत्र पाहायला मिळतील. गुगलने मोबाईल वापरकर्त्यांसाठी आणखी काय काय देऊ केलं आहे!? ते तुम्हाला या दुव्यावर पाहायला मिळेल. यु ट्युब, आय गुगल, बझ, गुगल रिडर, गुगल कॅलेंडर, ब्लॉगर, गुगल न्युज, गुगल डॉक्स, पिकासा वेब अल्बम, गुगल अर्थ, गुगल लॅटिट्युड अशा आपल्या अगदी सर्व सेवा गुगलने मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय याव्यतिरिक्तही इतर अनेक सेवा गुगलने मोबाईल वापरणार्‍यांसाठी देऊ केल्या आहेत. त्या तुम्हाला वर दिलेल्या दुव्यावर पाहायला मिळतीलच. त्या पानावर प्रत्येक नावापुढे ‘watch video’ नावाचे बटण आपल्याला दिसून येईल. त्या बटणाचा उपयोग करुन तुम्ही त्याबाबत अधीक माहिती घेऊ शकता.

आता तर मोबाईल बँकिंगही सुरु झालं आहे. थोडक्यात काय!? तर मोबाईलचा उपयोग हा वाढतच जाणार आहे. आणि हो! मोबाईल टि.व्ही. बाबतची सॅमसंग कॉर्बी आणि टाटा फोटॉनची जाहिरातही सध्या टि.व्ही. वर जोरात चालू आहे. मी स्वतः मागे माझ्या मोबाईलवर एक दिवासाच्या फ्रि ट्रायल मध्ये टि.व्ही. पाहिलेला. त्याचा स्पीड ठिकठाक होता. पण आता 3G आल्यावर स्पीडचा प्रश्न उरणार नाही. आपण मोबाईल इंटरनेट वापरत असाल, तर वर दिलेल्या गुगलच्या सेवा वापरुन पहायला हरकत नाही.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.