लेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्याची सोय कशी करता येईल?

काल आपण पाहिलं की, एखाद्या शब्दाला दिलेली लिंक ही नवीन टॅबमध्ये ओपन होण्याची सोय कशी करता येईल!? आज आपण पाहणार आहोत, एखाद्या चित्राला दिलेली लिंक ही नवीन टॅब, विंडो मध्ये ओपन होण्याची सोय कशी येईल!?

शक्यतो चित्र नवीन टॅब मध्ये ओपन होईल, अशी सोय करण्याची गरज भासत नाही. पण कधी कधी लेखादरम्यान समावेश असलेले एखादे चित्र मोठ्या आकारात पाहता येण्यासाठी, ते नवीन टॅब मध्ये ओपन होईल, अशी सोय करुन ठेवावी लागते. कारण त्या चित्रादम्यान लहान अक्षरात काही माहिती सांगितलेली असते. उदा. माझा रिलायन्स ब्रॉडबँडचा लेख.

माझ्या कालच्या लेखाचेही याबाबत उदाहरण देता येईल. कालच्या लेखादरम्यान एखादी लिंक नवीन टॅब मध्ये ओपन कशी करायची!? याबाबत माहिती सांगणारे चित्र मी लेखादरम्यान दिले होते. त्या चित्रावरील अक्षरे ही लहान आकारात दिसत होती. त्यामुळे त्या चित्रावर क्लिक केल्यानंतर ते नवीन टॅब मध्ये ओपन होईल, अशी सोय मी करुन ठेवली. कारण ते चित्र क्लिक केल्यानंतर त्याच टॅबमध्ये ओपन झाले असते, तर ते गैरसोयीचे झाले असते आणि वाचकाला माझ्या वेबसाईटवर पुन्हा परतण्यासाठी बॅक या बटणाचा उपयोग करावा लागला असता.

लेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्याची सोय अशी करता येईल :
१. त्यासाठी कोणतेही एक चित्र निवडा. मी आपल्या वेबसाईटचा लोगो, म्हणजेच 2know.in चे चित्र निवडत आहे.
२. निवडलेले चित्र आपल्या ब्लॉगर पॅड वर अपलोड करा.
३. Compose शेजारील Edit HTML वर क्लिक करा. खाली 2know.in चे मूळ चित्र दाखवलेले आहे. तर त्याखाली त्याचा HTML कोड दाखवला आहे.

मूळ चित्र
Html कोड – मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

४. वरील चित्रात दाखवलेल्या HTML कोड मध्ये .jpg” असं, म्हणजेच चित्राचा फॉरमॅट जिथे सांगितला आहे, त्यापुढे कालप्रमाणे target=”_new” अशी भर घाला (imageanchor च्या आधी). आता तुमच्या लेखादरम्यान असलेल्या चित्रावर क्लिक केल्यानंतर ते नवीन टॅबमध्ये उघडले जाईल. चित्राचा फॉरमॅट वेगवेगळा असू शकतो, याची कृपया नोंद घ्या. उदा. .png, .gif, .jpeg इ.

कधी आवश्यकता भासल्यास आजच्या माहितीप्रमाणे तुम्ही स्वतः एकदा असा प्रयत्न करुन पाहू शकता. ब्लॉगिंग करत असताना अशा बारिकसारिक गोष्टींची आपल्याला वेळीवेळी गरज पडू शकते. आणि म्हणूनच या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.