विश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती

फुटबॉल हा तसा माझा आवडता खेळ नाहीये. त्यामुळे मला त्याबाबत अधिक माहिती नाहीये. पण बहुतेक मागच्याचा मागचा विश्वकरंडक फुटबॉल ताई आणि वडिलांबरोबर उत्सुकतेनं दुरदर्शनवर पाहिल्याचं मला आठवतं. चौथी-पाचवीत असताना भारत क्रिकेट मॅच हरला, तरी माझे डोळे पाणावले जायचे, इतकं मन लावून मी मॅच पहायचो. पण आता मॅच कधी आहे!? हे देखील मला माहित नसतं. पर्वा खूप वर्षांनंतर IPL च्या काही मॅचेस मी पाहिल्या, आणि त्या मला आवडल्या देखील. पण आता सारं काही तेव्हढ्या पुरतं तेव्हढं झालं आहे. कधी हरतात, उद्या जिंकतात, परत हरतात! हे आपलं चालूच राहतं. मग त्यासाठी उगाचच वेळ खर्च करावासा वाटत नाही.

पण खेळ आणि त्यातही फुटबॉल पहायला आवडणारे देखील आपल्यामध्ये खूपजण आहेत. त्यांच्यासाठी गुगलने आपल्या सर्च बॉक्सच्या खाली Follow your team नावाचा पर्याय पुरवला आहे.

विश्वकरंडक फुटबॉल – आपल्या टिमला पाठिंबा देण्यासाठी पर्याय

Follow your team या पर्यायावर क्लिक केल्यानंतर उघडल्या जाणार्‍या पानावर काय काय आहे!? ते आता आपण पाहूयात.

१. गुगल क्रोम वेब ब्राऊजरसाठी थिम्स : तुमच्याकडे गुगल क्रोम वेब ब्राऊजर नसेल, तर तो तुम्ही या इथून घेऊ शकता. तुम्ही आपल्या गुगल क्रोम वेब ब्राऊजरला, दिलेल्या थिम्सच्या सहाय्याने फुटबॉलमय करु शकता.

२. igoogle थिम्स : आपण जर गुगलचे पर्स्नलाईज्ड होम पेज, म्हणजेच ‘आय गुगल’ वापरत असाल, तर त्या ‘आय गुगल’ पानालाही थिम्सच्या सहाय्याने फुटबॉलचा रंग चढवू शकता.

३. गुगल क्रोम एक्सटेंन्शन्स्‌ आणि आय गुगल गॅजेट्स्‌ च्या सहाय्याने आपण FIFA.com वरुन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बातम्या, लाईव्ह स्कोर, वेळापत्रक आणि स्टेट्स यांबाबतची माहिती मिळवू शकतो.

४. मॅच पाहण्यासाठीच्या योग्य ठिकाणांचा शोध आपण गुगल मॅप्स च्या सहाय्याने घेऊ शकतो. त्यासाठी या इथे जा. आता समोर दिसणार्‍या नकाशातून कोणत्याही एका ‘निर्देश’ करणार्‍या चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर येणार्‍या नकाशावर दिसणारे फुटबॉलचे चिन्ह हे स्टेडियम निर्देशित करेल. त्यावर क्लिक केल्यानंतर फुटबॉल वल्डकप स्टेडियमची माहिती आपल्यासमोर उघडली जाईल. त्या माहितीखाली Street View आणि Earth View असे दोन पर्याय आपल्याला दिसतील. त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड केल्यास तुम्ही स्टेडियमच्या आणि रस्त्यांच्या 3D प्रतिमेपर्यंत पोहचाल!

५. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे शेड्युल, वेळापत्रक या इथे पहायला मिळेल. याशिवाय विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची ऑफिशिअल वेबसाईट FIFA.com वर देखील विश्वकरंडक फुटबॉल बाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.

तर ही होती गुगलच्या माध्यमातून घेता येईल अशी यावेळच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची माहिती. आपल्याला जर फुटबॉल आवडत असेल, तर आपल्याला या माहितीचा चांगला उपयोग होईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.