संगणकावरील सर्व गाणी मोबाईलवर ऐका

आपल्या संगणकावर शेकडो किंवा हजारो गाणी असू शकतात. ही सर्व गाणी आपल्या मोबाईलवर घेण्यासाठी आपल्याकडे एक चांगला कार्यक्षम मोबाईल असायला हवा आणि त्यात अधिक क्षमतेचे मेमरी कार्ड बसवायला हवे. त्यानंतर ही सर्व गाणी आपणास आपल्या मोबाईलवर ट्रांसफर करावी लागतील. संगणकावर पुन्हा नव्याने काही गाणी घेतली, तर ती परत एकदा मोबाईलमध्ये ट्रांसफर करावी लागतील. हे काहीसे वेळखाऊ काम आहे आणि आपल्याकडे चांगल्या क्षमतेचा मोबाईल किंवा मेमरी कार्ड नसल्यास हे सारं करणं शक्य होणार नाही. तेंव्हा कमी आणि जास्त क्षमतेच्या अशा सर्व प्रकारच्या मोबाईल स्मार्टफोनवर आपल्या संगणकावरील सर्व गाणी कशी ऐकता येतील? ते आपण पाहू.

मागे एकदा आपण ‘ड्रॉपबॉक्स’विषयी माहिती घेतली होती. ड्रॉपबॉक्स ही एक क्लाऊड स्टोअरेज सेवा आहे. यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ड्रॉपबॉक्समध्ये साठवलेली सर्व माहिती एकाचवेळी आपण आपल्या ड्रॉपबॉक्स खात्याने जोडलेल्या सर्व लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्मार्टफोनवर साठवली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी केलेला बदल हा सर्वत्र जतन केला जातो. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘ड्रॉपबॉक्स क्लाऊड स्टोअरेज’ हा लेख वाचावा. संगणकावरील सर्व गाणी मोबाईलवर ऐकण्यासाठी आज आपण ड्रॉपबॉक्सचा वापर करणार आहोत.

ड्रॉपबॉक्स संदर्भातील तो लेख आपण वाचला असेल हे मी गृहित धरतो. आपल्या संगणकावरील ड्रॉपबॉक्समध्ये आता गाण्यांसाठी एक नवीन फोल्डर तयार करा. त्यामध्ये आपल्या संगणकावरील गाणी कॉपी पेस्ट करा. यासाठी आपल्याकडे अनलिमिटेड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन असणे आवश्यक आहे. ड्रॉपबॉक्समध्ये गाण्यांच्या फोल्डरमध्ये टाकलेली सर्व गाणी ड्रॉपबॉक्सवर अपलोड होण्यास काही वेळ लागेल. आपल्या स्मार्टफोनवर ड्रॉपबॉक्सचे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करुन आपले ड्रॉपबॉक्स खाते त्यास जोडून घ्या. आपण संगणकावरील ड्रॉपबॉक्समध्ये तयार केलेले गाण्यांचे हे नवीन फोल्डर आपणास आपल्या स्मार्टफोनवरील ड्रॉपबॉक्स अ‍ॅप्लिकेशनमध्ये दिसू लागेल. स्मार्टफोनवर ड्रॉपबॉक्समध्ये असलेले संगणकावरील गाण्यांचे हे फोल्डर उघडल्यानंतर आपणास त्या फोल्डरमधील हवे ते गाणे ऐकता येईल.

संगणकावरील गाणी मोबाईलवर
ड्रॉपबॉक्स वापरुन संगणकावरील गाणी मोबाईलवर ऐका

स्मार्टफोनची मेमरी ही संगणकापेक्षा कमी असते हे ड्रॉपबॉक्सने गृहित धरले आहे. त्यामुळे संगणकावरील फाईल्स मोबाईलवर जरी दिसत असल्या तरी त्या आपल्या मोबाईलवर प्रत्यक्ष डाऊनलोड झालेल्या नसतात. आपणास मोबाईलवर आवश्यक अशाच फाईल मोबाईलच्या मेमरी कार्डवर साठवण्याची निवड ड्रॉपबॉक्सने आपणास दिली आहे. आपण ड्रॉपबॉक्समध्ये दिसणारे एखादे गाणे जेंव्हा सुरु कराल, तेंव्हा ते इंटनेट स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर वाजू लागेल. आपण ‘सावन’ अथवा ‘धिंगाणा’ वर कधी ऑनलाईन गाणी ऐकली असतील, तर अशाप्रकारे ऑनलाईन गाणी ऐकण्याचाच हा देखील एक प्रकार आहे. आपल्या आवडीची गाणी जी आपणास प्रत्यक्ष मोबाईलच्या मेमरी कार्डवर घ्यायची आहेत, ती त्या गाण्यासंदर्भात असलेल्या ड्रॉपबॉक्समधील पर्यायांमधून ‘तारांकीत’ (Favorite) करा. त्यामुळे ती गाणी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड होतील व इंटरनेट कनेक्शन नसताना देखील आपणास ऐकता येतील. अशाप्रकारे मोबाईलमध्ये घेतलेली नवीन गाणी जर मोबाईलमधील ड्रॉपबॉक्स अ‍ॅप्लिकेशनमध्ये टाकली, तर ती आपोआप इंटरनेटशी जोडलेल्या आपल्या संगणकावर येतील.

आजकाल कोणी नवीन फोन घेत असेल, तर बहूदा स्मार्टफोनच घेतला जातो. त्यामुळे अँड्रॉईड, विंडोज, आयफोन, ब्लॅकबेरी असे स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या आता वाढू लागली आहे. त्यातही स्वस्त दर आणि अधिक गुणवत्ता असल्याने अँड्रॉईड फोन वापरण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. स्मार्टफोन्सनी लोकांना आधुनिक सोयी-सुविधांची नवी दालने खुली केली. त्यामुळे अनेक गोष्टी कमी वेळात, अधिक सोप्यापद्धतीने आणि आपल्या सोयीने होऊ लागल्या. पण या सोयींचा मनमुराद उपयोग करुन घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी घरात अनलिमिटेड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आणि वाय-फायची सुविधा असणे आवश्यक आहे. याव्यतिरीक्त घराबाहेरही या सोयींचा उपयोग करुन घेता यावा म्हणून आपल्या स्मार्टफोनवर एक ३जी प्लॅन सुरु असणे गरजेचे आहे.