स्क्रिनशॉट घेण्याची सोपी पद्धत

काल मी फेसबुक पेजवर ‘स्क्रिनशॉट’ म्हणजे काय? ते सांगितलं. तेंव्हा अपेक्षेप्रमाणे ‘स्क्रिनशॉट कसा काढायचा?’ हा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल स्वतंत्र लेख लिहिण्याची आवश्यकता होती. त्याप्रमाणे मी आजचा हा लेख लिहित आहे. पण जे लोक फेसबुकवरील आपल्या समुहात सहभागी नाहीत, त्यांच्यासाठी ‘स्क्रिनशॉट म्हणजे काय?’ ते आपण पुन्हा एकदा पाहू, आणि त्यानंतर संगणक व स्मार्टफोनवर स्क्रिनशॉट कसा घ्यायचा? ते समजून घेऊ.

स्क्रिनशॉट म्हणजे काय?

आपल्या संगणकच्या अथवा स्मार्टफोनच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे यास ‘स्क्रिनशॉट’ घेणे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मागच्या वेळी मी ‘****** लपलेला पासवर्ड कसा पहायचा? भाग २’ हा लेख लिहिला. या लेखात दिलेली माहिती आपल्याला व्यवस्थित समजावी, म्हणून मी काय केले? मी माझ्या संगणकाच्या स्क्रिनचे छायाचित्र काढले, म्हणजेच ‘स्क्रिनशॉट’ काढला; आणि त्या ‘स्क्रिनशॉटच्या’ सहाय्याने ‘लपलेला पासवर्ड कसा पहायचा?’ हे मी आपल्याला अगदी व्यवस्थित समजावून सांगितले. स्क्रिनशॉटमुळे आपल्याला नक्की काय करायचे आहे? ते अगदी सहजतेने समजले. अशाप्रकारे स्क्रिनशॉटचा वापर करुन आपण आपल्या अडचणी सोडवू शकतो किंवा स्क्रिनवरील मजकूर, चित्र साठवून ठेवू शकतो.

संगणकावर स्क्रिनशॉट कसा घ्याल?

सर्वसाधारणपणे आपण सगळेच आपल्या संगणकावर Windows (विंडोज) ही ऑपरेटींग सिस्टीम वापरतो. तेंव्हा मी त्या अनुशंगाने ही माहिती सांगत आहे. आपल्या संगणकाच्या स्क्रिनचे छायाचित्र काढणे, स्क्रिनशॉट घेणे हे अत्यंत सोपे आहे. आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील prt sc हे बटण दाबायचे आहे की झाले! स्क्रिनशॉट निघाला! आता हा स्क्रिनशॉट साठवायचा कसा? तेव्हढाच काय तो प्रश्न उरला आहे!

स्क्रिनशॉट
‘मराठी इंटरनेट’ या संकेतस्थळाचा संगणकावरुन घेतलेला स्क्रिनशॉट

Windows च्या प्रत्येक संगणकात पूर्वीपासूनच Paint (पेंट) नावाचे एक सॉफ्टवेअर असते. ते सॉफ्टवेअर उघडा. Paint सापडत नसल्यास विंडोजच्या सर्चमधून त्याचा शोध घ्या. हे सॉफ्टवेअर उघडल्यानंतर आपल्याला केवळ आपल्या कीबोर्डवरील ctrl हे बटण दाबून ठेवत v हे बटण दाबायचे आहे किंवा सरळ राईट क्लिक करुन Paste या पर्यायाची निवड करा. आपला स्क्रिनशॉट आपल्याला Paint मध्ये दिसू लागेल. आता हा स्क्रिनशॉट Save करा. अशाप्रकारे आपण अगदी सहजतेने आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट घेतलेला आहे.

स्मार्टफोनवर स्क्रिनशॉट कसा घ्याल?

स्मार्टफोनवरुन स्क्रिनशॉट घेणे तर प्रचंड सोपे आहे. अर्थात मी या लेखात अँड्रॉईड स्मार्टफोनबाबत सांगत आहे.

स्क्रिनशॉट
अँड्रॉईड फोनवरुन ‘मराठी इंटरनेट’ या संकेतस्थळाचा घेतलेला स्क्रिनशॉट

आपल्या स्मार्टफोनवर Volume (व्हॉल्यूम) आणि Power (पॉवर) असे दोन स्वतंत्र बटण असतील. आपल्याला केवळ एव्हढेच करायचे आहे की, व्हॉल्यूम बटणावरील गाण्याचा आवाज कमी करण्याकरीता वापरली जाणारी बाजू आणि पॉवरचे बटण हे एकाचवेळी एकत्रितपणे दाबायचे आहेत. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनचा स्क्रिनशॉट निघेल. हा स्क्रिनशॉट आपल्या फोनवरील फोटो गॅलरीत आपोआप साठवला जाईल, तेंव्हा आपणास स्वतंत्रपणे काही करण्याची आवश्यकता नाही.आपल्या फोनच्या फोटो गॅलरीत जाऊन आपण तो स्क्रिनशॉट पाहू शकाल.

स्क्रिनशॉट म्हणजे काय? आणि तो कसा घ्यायचा? हे आता आपल्याला समजेलच असेल. तेंव्हा याबाबत इतरांनाही सांगा! आणि ‘मराठी इंटरनेट’ वाचत रहा!