हेमंत आठल्ये चा वर्डप्रेस ब्लॉग – मुलाखत

नुकतेच 2know.in चे १०० लेख पूर्ण झाले आहेत. आणि आता गरज आहे ती काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याची! याच विचारातून मी मराठी ब्लॉगर्सच्या मुलाखतींचा उपक्रम हाती घेत आहे. आज मी माझ्या जीवनातली पहिलीच मुलाखत घेत आहे आणि आपल्या बरोबर आहे आपला मित्र हेमंत आठल्ये. hemantathalye.wordpress.com या पत्यावरुन तो आपला वर्डप्रेस ब्लॉग चालवतो. अगदी मनःपूर्वक, बिनधास्त आणि दररोज नाविन्यपूर्ण केलेलं लिखाण हे त्याच्या ब्लॉगचं वैशिष्ट्य आहे. रोजच्या जीवनातील छोट्यामोठ्या घडामोडींवर तो जे लिहितो, त्यातून मानवी जीवनातील भावभावना उलगडत जातात. त्याच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत! पण इंटरनेट, तंत्रज्ञान हा 2know.in चा मूळ विषय असल्याने, या मुलाखतीच्या अनुषंगाने वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग कसा सुरु करायचा!? ते त्याआधी आपण अगदीच थोडक्यात पाहणार आहोत.

वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला mr.wordpress.com वर जावं लागेल. या इथे वर्डप्रेस मराठीतून उपलब्ध आहे.
२. त्यानंतर Sign Up Now! असं लिहिलेल्या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
३. साईन अप, साईन इन झाल्यानंतर वरच्या बारमधून My Dashboard – Manage Blogs वर क्लिक करा.
४. या इथे तुम्ही आपला ब्लॉग Register करु शकता.
५. पत्ता, नाव, भाषा आणि प्रायव्हसी निवडल्यानंतर Create Blog वर क्लिक करा आणि मग तुमचा ब्लॉग तयार होईल.

वरच्या पायर्‍या पूर्ण करत असताना काही अडचण आल्यास त्यासाठी खाली आपला कॉमेंट बॉक्स आहेच.

हेमंत आठल्ये ची मुलाखत!

मी : ब्लॉगच्या माध्यमातूनच आपलं मन मोकळं करावं असं तुला का वाटलं?

हेमंत आठल्ये चा वर्डप्रेस ब्लॉग

हेमंत : ब्लॉग हे माध्यम खूप उत्तम साधन आहे. मुळात ब्लॉग ही संकल्पना खूप मजेशीर आहे. वेबसाइटसारखा यात प्रोफेशनल टच नसतो. आणि यात असे काही एटिकेट्स नसतात, की अमुक असायला हवं! किंवा ह्या गोष्टी असयलाच हव्या.

मी दोन वर्षांपूर्वी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने असताना मुंबईत असलेली परिस्थिती आणि वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या यात खूप फरक वाटायचा. मग मी त्या त्या वर्तमानपत्राच्या वेबसाइटला माझी प्रतिक्रिया द्यायचो. पण ते कधीच त्या प्रतिक्रिया प्रकाशित करत नसायचे. म्हणून, मी वर्डप्रेसवर माझा ब्लॉग बनवला. दुसरी गोष्ट अशी, त्यावेळी आणि अजूनही माझे मित्र कधी भेटले की, नेहमीच त्यांची दु:ख मला सांगत असतात. त्यांच्या अडचणी ऐकण्यात सगळा वेळ जातो. काही मित्र कामापुरतेच असतात. मग मनातलं कसं आणि कोणाला सांगणार?


मी : माझ्या मते तू आजच्या तरुण पिढीतील मुलांच्या भावविश्वाचं खर्‍या अर्थाने प्रतिनिधित्त्व करतोस, तुझ्या लिखाणाच्या पद्धतीमागचं रहस्य काय?
हेमंत : रहस्य 😀 त्यात कसले आले रहस्य. जसे मी बोलतो, तेच सर्व अगदी जसेच्या तसे लिहितो. उलट मलाच अनेकांच्या शुद्धलेखन सुधार अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. बोलत असशील तर देतो लिंक. आणि मुळात शुद्ध मराठी कोण बोलतो आजकाल? आणि बोलायचे किंवा लिहायचे ठरवले तर किती लोकांना समजेल?

मी : ब्लॉग लिहिताना तुझ्या मनात काय चालू असतं? म्हणजे तू वाचकांची पर्वा करतोस की मनाला पटेल तेच लिहितोस?
हेमंत : ब्लॉग असा मी काही ठरवून लिहित नसतो. जे घडलं, जे वाटलं… व वाचकांची पर्वा न करून कसे चालेल? नेहमी माझे लिखाण ५०० शब्दांच्या जवळपास असावे असा प्रयत्न करतो. नाहीतर मग उगाच लांबलचक आणि वाचणार्‍याला सुद्धा रटाळ वाटते. पण मनाला जे पटेल तेच लिहितो. मुळात वाचक सर्वज्ञ असतात. त्यांना फुकाचे सल्ले द्यायचे मी टाळतो. थोडक्यात, कशाला मी माझा आणि त्यांचा वेळ वाया घालू? ज्या गोष्टी त्यांना माहिती आहेत त्याच सांगून काय फायदा.

मी : तू तुझ्या ब्लॉगवर येणार्‍या कॉमेंट्सना प्रतिउत्तर देत नाहीस! यामागे काही खास कारण?
हेमंत : मुळात माझे ब्लॉग हीच एक प्रतिक्रिया असते. जे बोलायचे आहे ते मी आधीच बोलून टाकलेले असते. त्यावर आलेल्या कॉमेंट्स ही त्यांची मते असतात. मग ती मते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात. स्पष्टपणे सांगायचं झालं तर, प्रत्येकाची मते प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबरच असतात, असं माझे मत आहे. त्यामुळे कोणतेही कॉमेंट्स मला मान्यच असतात. कॉमेंट्सना प्रतिउत्तर देऊन निष्कारण वाद वाढतात. मग मूळ विषय राहतो बाजूला आणि भलताच वाद सुरु होतात. त्यामुळे मी कोणत्याच कॉमेंट्सना प्रतिउत्तर देत नाही.  

मी : तुझ्या अनेक ब्लॉग्जमध्ये तू तरुणींबाबत अगदी मोकळेपणाने बोलतोस. मुलींबद्दल तुझं मत काय? जीवनात सुंदरता अधिक महत्त्वाची की गुणवत्ता? कारण सर्वगुणसंपन्न सुंदर अशा मुली काही भाग्यवंतांनाच मिळतात!
हेमंत : हो हो 😀 अगदी खरे आहे. त्या एवढ्या छान असतात. मग मनात विचार येणारंच ना! माझ्या मते तरी, जगातील सर्वात सुंदर कलेचा आणि प्रेमाचा नमुना म्हणजे मुलगी. आता ती गोष्ट वेगळी की, त्यांच्यामुळेच अनेक प्रेमभंग होतात.

पण प्रत्येक मुलगी खरंच खूप सुंदर असते. आणि प्रत्येकीत काही ना काही इतरांपेक्षा खूप छान असतेच. आता जीवनात सुंदरता अधिक महत्वाची की गुणवत्ता याचे उत्तर द्यायला मी काही फार मोठा तज्ञ नाही. त्यामुळे काही बोलत नाही. सगळ्याच मुली सर्वगुणसंपन्न असतात. खोटे वाटत असेल तर, अनुभव घेऊन बघ! 😀 असेलच..
आजकालचे युग मुलगी भेटली तो भाग्यवंत म्हणावे असे आहे. कारण सध्याला मुलींचे प्रमाण १० मुलांमागे २ मुली असे आहे. काही दिवसांनी, मुलगी मिळवण्याचे कोचिंग क्लास सुरु होतील.

 
मी : ‘मित्र’ या संकल्पनेबाबत तुझं मत काय? खरा मित्र खरंच असू शकतो? की सगळेच जण जीवनातली एक गरज म्हणून सोबत येतात?  
हेमंत : माझ्या मते ‘मित्र’ हा एक मानसिक आधारस्तंभ असतो. जो असतांना आणि नसतांना दोन्हीही काळात त्याची जाणीव होते. आई-वडिलांनंतरचे हक्काचे शक्तीपीठ. खरा मित्र प्रत्येकाला असतो. फक्त असतांना त्याची किंमत आपल्याला समजत नाही. साधारणतः एखादा आपल्यासोबत असला की आपण त्याला मित्र संबोधतो. आणि नंतर त्याने आपल्या मनाविरुद्ध केले की आपण नाराज होतो. आता असे अनुभव मला अनेक आले आहेत. पण मुळात मित्र आणि सहकारी यात खूप फरक असतो. गरजू तर अनेक असतात. गरज संपली की तू कोण आणि मी कोण, असे वागतात.

मी : तू नेटवर आपल्या प्रायव्हसीची अधिक काळजी घेत नाहीस, तूला काय वाटतं!? मनापासून लिहित असताना प्रायव्हसीशी तडजोड ही करावीच लागते?
हेमंत : प्रायव्हसी सगळीकडे बोजवारा उडाला आहे. जे जे काही ऑनलाईन येत त्याला चोरी पासून कोणीच वाचवू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला हजार पर्याय असतात. मीच अनेकवेळा माझ्या मित्रांची अकौंट चोरून उघडली आहेत. 😀 गाणी, ई-बुक, प्रोफाईल, आणि अख्खेच्या अख्खे चित्रपट चोरीला जातात. मग आपण लिहिलेलं चोरी होण्याची शक्यता असतेच. पण माझ्या ब्लॉगचा उदयेश  फक्त आणि फक्त माझ्या भावना मांडणे हाच आहे. त्यामुळे भावनांची चोरी कशी होवू शकते? भावना उत्पन्न मनातून होतात. आपल्या संवेदना समजाव्यात म्हणून हा ब्लॉग आहे. थोडक्यात ते माझे भावनारूपी घर आहे. त्यात येणारा प्रत्येकाला माझ्या घरातील वस्तू जवळून बघण्याचा अधिकार आहे. त्यांना कशाला नियमात जखडून टाकायचे.

मी : समाजिक प्रश्नांवरही तू अनेक ब्लॉग लिहिले आहेत, तुला आपल्या देशात काही चांगला बदल घडेल अशी आशा वाटते? की अगदी सारं काही होपलेस आहे!
हेमंत : असो, नुसते लिहून काही घडतं नसते असा माझा अनुभव आहे. कृती केल्याशिवाय काहीही फायदा नाही. आठ महिने माझी आई दर आठवड्याला रेशनकार्डसाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारायची. त्यानंतर, वैतागून मी गेलो. पाहतो तर सगळाच अजब कारभार! कोणाचेच काम होत नव्हते. एक ऑफिस जाळण्याची धमकीवजा इशारा दिला. दोन महिन्यात रेशनकार्ड मिळाल. सगळे लोक लहान लहान गोष्टीला त्रासले आहेत. पण कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. आणि आपण नाही केले तर कोणीच करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशात बदल नक्की घडेल! पण, ज्यावेळी सुरवात आपल्यापासून आपण करू त्यावेळी! होपलेस वगैरे काही नाही. 

मी : भविष्याबाबत तुझ्या काय योजना आहेत?
हेमंत : बापरे! अरे साधे सकाळी उठून पळायला जायचे ही योजना यशस्वी होत नाही आहे. ब्लॉग बद्दल आणि माझ्या स्वतः बद्दल तर अजून विचारच केला नाही आहे. या १९ जूनला माझ्या ब्लॉगला वर्ष पूर्ण होत आहे. बघुयात, यावर्षी रोज नित्यनियमाने ब्लॉग लिहायचे ठरवले आहे.
मी : आपल्या वाचकांना काही संदेश!?
हेमंत : वाचक हे सर्वज्ञ आहेत. त्यांना माझ्यासारख्या बापड्याकडून काय संदेश देण्याचे धाडस? ते मला समजून घेतात हेच मोठे नाही का?  
मी : शेवटी मला तुझं 2know.in बाबत मत जाणून घ्यायला आवडेल!
हेमंत :  अरे, 2know.in माझी ड्रीम साईट आहे. माझ्याही मनात खूप आधीपासून अशी माहितीची मराठीत वेबसाईट बनवावी असं होते. पण अजूनपर्यंत नाही शक्य झाले. त्यामुळे मला नेहमीच तुझ्या वेबसाईटचा हेवा वाटतो. अशा मराठी साईट असायला हव्यातच. आणि टूनो.इन हा तर माहितीचा खजिना आहे. छान वेबसाईट आहे.
* हा होता ‘हेमंत आठल्ये’ ज्याने आज आपल्या बरोबर अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीबाबत आपल्याला काय वाटलं!? ते आपण खाली कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. आजच्या गप्पा तर इथेच संपत आहेत, पण तुम्ही मात्र 2know.in ला अशीच भेट देत रहा! नमस्कार!
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.