२र्‍या वाढदिवसानिमित्त 2know.in तर्फे छोटिशी भेट

१० जानेवारी २०१० रोजी मी माझा 2know.in हा ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता लवकरच आता त्याला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या २ वर्षांच्या प्रवासादरम्यान 2know.in ला मराठी वाचकांचं भरभरुन प्रेम मिळालं, पुरस्कार मिळाला, आणि हा सारा प्रवास सकारात्मक, आनंदमयी होऊन गेला.
2know.in मार्फत आपण वाचकांसाठी इतरही काही उपक्रम राबवावेत असं सतत माझ्या मनात येत होतं, पण काही कारणांनी ते शक्य होत नव्हतं. यावेळी मात्र मी एका लहानश्या उपक्रमापासून सुरुवात करायचं ठरवलं आहे. 2know.in च्या दुसर्‍या वाढदिवसानिमित्त मी विजेत्या वाचकाला एक कादंबरी भेट देण्याचं ठरवलं आहे. हा एकंदरीत उपक्रम कसा असेल? ते मी खाली नमूद करत आहे.

१० जानेवारी ला 2know.in चा वाढदिवस आहे आणि १४ जानेवारीला पानिपतच्या युद्धाला २५१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपल्यापैकी एका वाचकाला विश्वास पाटिल यांची सुप्रसिद्ध ‘पानिपत’ ही कादंबरी भेट देण्यात येईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर १० जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री १२ पर्यंत याच लेखाच्या खाली असलेल्या प्रतिक्रेयेच्या जागेत द्यायचं आहे. आपण अशी जास्तित जास्त तीन उत्तरं, म्हणजेच तीन प्रतिक्रिया देऊ शकाल. यापैकी सर्वोत्तम विचार समोर आणणार्‍या प्रतिक्रियेला ‘पानिपत’ ही कादंबरी  भेट देण्यात येईल. 2know.in च्या फेसबुक पेज वर याबाबत  एक स्वतंत्र धागा काढण्यात आला आहे. त्यावर देण्यात आलेली उत्तरं देखिल या इथे ग्राह्य धरली जातील. विजेत्याचं नाव १४ जानेवारीला सकाळी १० वाजता घोषित करण्यात येईल.
प्रश्न – मराठीच्या संवर्धनासाठी आपण आपल्यापरीने काय कराल?
या उपक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या परीने मराठीच्या संवर्धनाची सुरुवात केली आहे. आता आपण काय कराल? ते प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगा आणि 2know.in तर्फे ‘पानिपत’ ही कादंबरी भेट मिळवा.
खरं तर 2know.in च्या सब्स्क्रायबर्समधून लकी ड्रॉ काढून ही कादंबरी भेट द्यावी असा माझा विचार होता. यानिमित्त माझे सब्स्क्राबर्सही वाढले असते. पण २००० व्यक्तिंमधून लकी ड्रॉ ने निवडलेल्या व्यक्तिला त्या भेटीमध्ये रस असेलच असं नाही. तेंव्हा ही भेट इच्छूक व्यक्तिंनाच मिळावी आणि सत्कारणी लागावी म्हणून ही नाममात्र स्पर्धा. खरं तर एकाहून अधिक पुस्तकं वाटायला मला नक्कीच आवडेल, पण सध्यातरी सुरुवात म्हणून मी हा एक लहानसा उपक्रम राबवायचं ठरवलं आहे, त्यानंतर वर्षभर अनेक उपक्रम राबवून जास्तितजास्त वाचकांना जास्तितजास्त भेटी देण्याचा माझा प्रयत्न असेल. कारण देण्यातही एक मानसिक समाधान आणि आनंद आहे.
असाही एक विचार होता की, 2know.in ही तंत्रज्ञाशी संबंधीत मराठी साईट आहे, तेंव्हा तंत्रज्ञानाशी संबंधीत एखादे मराठी पुस्तक भेट द्यावे. पण १० जानेवारी आणि १४ जानेवारी असा एक चांगला योग जुळून आला आहे. आणि मराठी लोकांच्या जिव्हाळ्याशी संबंधीत असा ‘पानिपत’ हा विषय आहे. तेंव्हा अधिककाधिक मराठी लोकांमध्ये मराठ्यांच्या उज्ज्वल ईतिहासाविषयी अभिमान निर्माण व्हावा! त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा यासाठी हा छोटासा प्रयत्न. आपल्या घरातील लहान मुलांना खास करुन ही भेट वाचायला द्यावी, कारण पाठ्यपुस्तकातून हेतुपुरस्सर हा ईतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे आज जिज्ञासू मुलांशिवाय कोणालाही हा ईतिहास माहित असल्याचं दिसून येत नाही. तेंव्हा जास्तितजास्त मराठी लोकांना आपणही कधी संबंध भारतावर राज्य केलेलं हे माहित व्हावं, हीच माझी या भेटीमागील सदिच्छा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संबंधीत मराठी पुस्तकं पुढिल उपक्रमातून देण्यात येतील.
खरं तर प्रश्न विचारून स्पर्धा ठेवण्यामागे दोन उद्दिष्टं आहेत. पहिला उद्देश म्हणजे या प्रश्नाच्या माध्यमातून जी काही उत्तरं येतील, त्यातून आपल्या मराठी संस्कृतीला एक वैचारीक दिशा मिळण्यास हातभार लागेल. आणि दुसरं म्हणजे सर्वच ईच्छूकांना सध्या मी मोफत पुस्तक देऊ शकत नाही (खरं तर तसं मला देता आलं असतं, तर मला खूप आनंद झाला असता.). त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मी एकाची निवड करु शकेन. 
स्पर्धेच्या निकालानंतर भेट न मिळालेल्या वाचकांनी आजिबात निराश होऊ नये ही विनंती. या स्पर्धेला अगदी खेळीमेळीने आणि हलक्याने घ्यावे, कारण शेवटी ही भेट केवळ विचाराने श्रीमंत आहे. फेसबुकवर एक प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ इथे द्यावा इतकंच! आणि 2know.in वर अशा स्पर्धा आता यापुढे वारंवार होत राहतील. तेंव्हा या मोठ्या प्रवासात प्रत्येकाला काही ना काही मिळेलच. आणि ते तसं मिळावं असं मला मनापासून वाटतं! धन्यवाद!
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.