2know.in ब्लॉगला २ वर्ष पूर्ण (वाटचाल, आढावा)

ज 2know.in या आपल्या आवडत्या ब्लॉगला, साईटला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रवासात आपण 2know.in ला जे भरभरुन प्रेम दिलंत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. २ वर्ष पूर्ण होत असल्या निमित्त, आपण 2know.in च्या वाटचालीचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी मी २०१० व २०११ या वर्षांतील 2know.in चा तुलनात्मक तक्ता तयार केला आहे. त्यामुळे थोडक्यात आपल्याला 2know.in च्या वाटचालीचे स्वरुप समजेल. त्यानंतर आपण आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून 2know.in चा प्रवास पाहणार आहोत. त्यावरुन 2know.in संदर्भातील गोष्टींचा एकंदरीत अंदाज येईल. याचा जुन्या आणि नव्या मराठी ब्लॉग लेखकांना नक्की उपयोग होईल. पुढील वाटचालीची दिशा कोणती असावी? हे देखील यातून ठरवणं आपल्याला सोपं जाईल. तर खाली मी 2know.in च्या मागील दोन वर्षांतील वाटचालींची तुलना करणारा तक्ता देत आहे.

2know.in चा दोन वर्षांतील वाटचालीचा आढावा (तक्ता):

–>
२०१०
२०११
2know.in वर वर्षभरात लिहिलेले लेख
१४१
२३
वर्षभरात 2know.in ला भेट देणार्‍या वाचकांची संख्या
सुमारे २६,०००
सुमारे ४१,०००
त्यांनी वाचलेल्या पानांची संख्या
सुमारे ८२,०००
सुमारे ९९,०००
वाचकांनी 2know.in वर घालवलेला सरासरी वेळ
५ मिनिटे २३ सेकंद
३ मिनिटे ५७ सेकंद
प्रत्येक भेटीमागे वाचल्या गेलेल्या पानांची सरासरी संख्या
३.०८
२.३४
2know.in ची पेजरँक
2know.in चे ऍलेक्सा क्रमवारीतील स्थान (मागील तीन महिन्यांसाठी)
१८,८६,५२९ (जागतिक)
१,२७,३७८ (भारतीय)
२२,७७,३८५ (जागतिक)
१,२४,७६९ (भारतीय)
2know.in चे वार्षिक उत्पन्न
सुमारे ८०० रुपये
सुमारे ८००० रुपये
2know.in वर झालेला खर्च
सुमारे ३१०० रुपये (मागच्यावर्षी आढावा घेताना मी इंटरनेटचं बिल गृहित धरलं नव्हतं) + सुमारे ६०० तास
सुमारे १६५० रुपये + सुमारे १५० तास

वरील तक्त्यावरुन आपल्याला असं दिसून येईल की, वाचकांची आणि त्यांनी पाहिलेल्या पानांची संख्या मोठ्य़ा प्रमाणावर वाढली आहे. मराठी लोकांमध्ये वाढत असलेला इंटरनेटचा वापर आणि 2know.in चा हळूहळू होत असलेला प्रसार यामुळे ही वाढ झाली असावी. पण त्याचबरोबर मी लिहिलेल्या लेखांची संख्या घटल्याने इतर अनेक बाबतीत 2know.in ची आकडेवारी २०१० च्या तुलनेत कमी झाली आहे. वाचकांनी 2know.in वर घालवलेला सरासरी वेळ साधारण दीड मिनिटाने कमी झाला आहे. शिवाय प्रत्येक भेटीमागे वाचल्या गेलेल्या पानांची सरासरी आकडेवारीही कमी झाली आहे. २०१० ला मी १४१ लेख लिहिले, तर २०११ मध्ये मी केवळ २३ लेख लिहू शकलो. त्यामुळे गुगलचं 2know.in वरील प्रेम कमी होऊन पेजरँक ३ वरुन १ वर घसरली आहे. ऍलेक्साच्या जागतिक क्रमवारीत २-३ लाखाचा फरक पडला आहे, पण मुळात ही क्रमवारी अचूक नाही. आपण ती क्रमवारी सर्वसाधारण अंदाजासाठी गृहीत घरु शकतो. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर क्रमवारीत सर्वसाधारणपणे काही फरक पडलेला नाही.
2know.in च्या वाटचालीतील आर्थिक बाजू
2know.in चं उत्पन्न ८०० वरुन सुमारे ८००० वर गेलं असलं, तरी तेही अत्यंत नाईलाजाने इंग्रजीचा आधार घेऊनच! आणि ज्या मराठी साईटला दोन वर्षात ७०,००० लोकांनी भेट दिली आणि जिची १,८५,००० पानं वाचली गेली, त्या साईटने दोन वर्षात केवळ ४०५० रुपये (प्रत्यक्ष खर्च वजा करुन) कमवावे, ही एका मराठी साईटसाठी फारशी अभिमानास्पद गोष्ट नाही. शिवाय या ब्लॉगवर करण्यात आलेलं सुमारे ७५० तासांचं काम लक्षात घेतलं, तर ते ४०५० रुपये कुठेच्याकुठे वजा होऊन ही साईट प्रचंड दिवाळखोरीत निघते. तरीही त्यातल्यात्यात मी माझ्या परीने 2know.in मार्फत उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
मी सध्या अशा वळवणार आहे की, भेटणारा प्रत्येक जण विचारतो, “काय करतोस मग सध्या?”. म्हणजेच ‘कमवतोस काय?’ ‘काम काय करतोस?’ असा त्यांचा एकंदरीत सुर असतो. तेंव्हा लेखांची संख्या १४१ वरुन २३ वर येणं अपरिहार्य होतं. आणि मागच्या वर्षी आढावा घेत असताना मी हे सांगून टाकलं होतं, की लेखांची संख्या कमी होणार आहे. ही साईट मराठी आहे म्हणून कमी कमावते, असं मला वाटत नाही. पण मराठी लोकांमध्ये असलेलं इंटरनेटचं अज्ञान, मराठीचाच वापर करण्याबाबत नसलेला आग्रह आणि ऑनलाईन खरेदीवर त्यांचा नसलेला विश्वास, ही त्यामागील प्रमुख कारणं आहेत. इंटरनेटविषयक अज्ञान दूर करणे हा 2know.in या साईटचा मूळ उद्देश आहे, पण मराठीचा आग्रह हे मात्र मराठी लोकांच्या स्वतःच्या हातात आहे.
आजचा विचार केला, तर एखाद्या कंपनीचा हजारो रुपयांचा फायदा करुन देण्याची ताकद 2know.in मध्ये आहे. पण 2know.in ही साईट मार्केटिंग मध्ये कमी पडत आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणी मार्केटिंगमध्ये तज्ञ असल्यास माझ्याशी संपर्क करावा. 2know.in वर जर जाहिरातदारांचा प्रभाव नको असेल, तर विकीपीडीआच्या धर्तीवर दानाच्या माध्यामातून 2know.in ला आर्थिक आधाराची गरज आहे! पण 2know.in ला भेट देणार्‍या लाखभर लोकांपैकी किती मराठी लोक असं दान देण्यास तयार होतील? मला याबाबत फार मोठी शंका आहे. बाकी आर्थिक नुकसान होत असूनही मी मागील दोन वर्ष ही साईट नेटाने चालवत आहे, तेंव्हा माझ्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नसावी. उलट अशाने मी 2know.in च्या माध्यमातून अधिक चांगले आणि नियमीत उपक्रम राबवू शकेन.
आज मी इतर मार्गाने कमवत आहे, त्यावर 2know.in चं काम चालू आहे. बाकी 2know.in चा स्वतःचा असा त्या कमाईत काहीही वाटा नाहीये. आणि 2know.in या मोठी वाचकसंख्या असलेल्या एका मराठी साईटने स्वतःच्या पायावर का उभं राहू नये? हा प्रश्न मला पडतो. आर्थिक आधार नसल्याने इतरही अनेक मराठी साईट अनेक दिवसांपासून जवळपास बंद असल्याचं इंटरनेटवर मराठीचा नियमीत वापर करणार्‍या वाचकांना समजलं असेलच. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी आर्थिक आधार हा तर आवश्यक आहेच आहे! त्याशिवाय पर्याय नाही.
2know.in च्या वाटचालीतील भावनिक बाजू
2know.in कडे आपण व्यवहारीक दृष्टिकोनातून पाहिलं, आता आपण त्याकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहूयात. या दोन वर्षात 2know.in वर वाचकांनी भरभरुन प्रेम केलं. आजपर्यंत जगभरातील अनेक मराठी लोकांनी मला शाबासकी देणारे, कौतुक करणारे, प्रोत्साहन देणारे, मान देणारे अनेक मेल पाठवले आहेत. 2know.in ला मिळालेला ‘स्टार माझा’ चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार हा तर माझ्या जीवनातला अगदी अविस्मरणीय प्रसंग! 2know.in ने मला एक छोटिशी ओळख दिली. आणि त्यासाठी मी या माझ्या ब्लॉगचा आणि माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांचा सदैव ऋणी राहीन. 2know.in चं आर्थिक गणित फसलेलं असलं, तरी भावनीक गणित फसलेलं नाही हे निश्चित! त्यामुळे काही झालं तरी थांबत थांबत का होईना, 2know.in हा ब्लॉग आपल्याला अशीच इंटरनेट विषयक माहिती देत राहिल, असा विश्वास मी आपल्याला देतो. मागच्या वर्षी 2know.in चा आढावा घेत असताना मी जरा निराश होतो, पण यावेळी मात्र माझ्यात सुंदर भविष्याचा आशावाद आहे! आपण ज्या प्रतिक्रिया देता, मेल पाठवता, त्यामुळे माझी लिहिण्याची उर्जा द्विगुणित होते. सर्वच प्रतिसादांना कधीकधी उत्तर देणं मला शक्य होत नाही, पण आपला प्रत्येक प्रतिसाद मी वाचलेला असतो आणि त्यावर विचार केलेला असतो, याची खात्री बाळगा. आपण सर्वजण मिळून तिसर्‍या वर्षात 2know.in ला आणखी मोठं करु आणि एक दिवस प्रत्येक मराठी माणसाला 2know.in हे नाव माहित असेल, अशी मी आशा व्यक्त करतो. त्यासाठी आपला सहभाग तर आवश्यक आहेच! आणि तो मला मिळणार याची मला खात्री आहे. 
2know.in – रोहन जगताप
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.