2know.in मराठी इंटरनेट टूलबार

नुकतीच 2know.in च्या मराठी इंटरनेट टूलबारची रचना करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील बॅनर आपण कदाचीत 2know.in वर याआधीच पाहिले असतील आणि आपल्यापैकी अनेकांनी हा टूलबार आपल्या संगणकावर इन्स्टॉलदेखील करुन घेतला आहे. ३ वर्षांपूर्वी “माझी मराठी” या नावाने मी अशाच एका टूलबारची रचना केली होती. त्यावेळी काहीजणांना मराठी अक्षरे पाहताना त्यात तांत्रिक अडचणी जाणवल्या, तेंव्हा इंग्रजी अक्षरांचा आणखी एक तसाच मराठी टूलबार लोकांना इन्स्टॉल करण्यासाठी देण्यात आला. मराठी लोकांना त्या टूलबारचं वेगळेपण खूपच भावलं. सुमारे १००० हून अधिक लोकांनी ते टूलबार आपल्या संगणकाच्या वेब ब्राऊजरवर घेतले. त्यावेळी माझ्याकडे 2know.in सारखा लोकप्रिय ब्लॉग नव्हता, नाहीतर आणखी काही हजार लोकांनी तो नक्कीच वापरला असता.
“माझी मराठी” या टूलबारचं नाव कालांतराने “मनोविश्व” असं ठेवलं गेलं, कारण त्यावेळी माझा कवितेचा एक ब्लॉग मी चालवायचो, आणि त्यावरुन ते नाव सुचलं होतं. आज मोठ्या कालावधीनंतर मला पुन्हा एकदा या टूलबारची आठवण झाली. आणि 2know.in हा ब्लॉग आज इतका प्रभावी ठरत असताना, आपल्या या ब्लॉगचा स्वतःचा टूलबार का असू नये? अशा विचारातून मी 2know.in या नावाने मराठी टूलबारची पुनःश्च रचना केली. 
या इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी या टूलबारची निर्मिती केली नसून केवळ अधिक चांगल्या प्रकारे रचना केली आहे. आपल्या इथल्या लोकांच्या गरजा काय आहेत? याचा विचार यासाठी करण्यात आला आहे. या टूलबारवर विविध प्रकारची अनेक अ‍ॅप्लिकेशन्स आहेत जी वेगवेगळ्या डेव्हलपर्सनी निर्माण केली आहेत. उदाहरणार्थ, eBuddy चा “ऑल इन वन मेसेंजर”. टूलबारवर असलेल्या या मेसेंजरचा उपयोग करुन आपण एकाचवेळी आपल्या जीटॉक, फेसबुक, याहू, एम.एस.एन., इत्यादी सर्व मेसेंजरवरील मित्रांशी गप्पा मारु शकतो. आता eBuddy ही मराठी कंपनी नसल्याने सहाजीकच त्यांचे अ‍ॅप्लिकेशन हे इंग्रजी मध्ये आहे. तेंव्हा हा टूलबार जरी मराठी असला, तरी तो पूर्ण १००% मराठी करण्यामध्ये अशाप्रकारे एक छोटिशी मर्यादा आहे. 
या संपूर्ण मोफत टूलबारचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर या टूलबारवर सर्व प्रमुख मराठी साईट्सचं संकलन करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, मराठी ब्लॉगविश्व, मिसळपाव, मनोगत, मायबोली, मी मराठी, मराठी विकिपेडीआ, इत्यादी. याव्यतिरीक्त महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मराठी वृत्तपत्रांची लिंक या टूलबारवर देण्यात आली आहे. आपल्या सुचनेनुसार उत्तरोत्तर या यादीमध्ये भर पडत राहीलच. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आपले अभिप्राय ऐकण्यासाठी मी खास “गूगल ग्रुप” तयार केला आहे. याशिवाय टूलबारसाठी खास अशी वेगळी साईट या इथे सुरु करण्यात आली आहे – toolbar.2know.in
सर्वांत लोकप्रिय आणि प्रमुख सोशल नेटवर्कींग साईट्सचे दुवे या इंटरनेट टूलबारवर देण्यात आले आहेत. नवीन ईमेल आल्याची नोंद आपल्याला या टूलबारवर मिळेल. या टूलबारवर एक इंग्रजी शब्दकोश आहे. एकाच प्रकारच्या इतर साईट्स शोधण्यासाठीदेखील हा टूलबार उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त मोठ्या आकाराची फाईल सेंड करणे, आपल्या शहरातील सध्याचे हवामान पाहणे, रेडिओवर ऑनलाईन गाणी ऐकणे, गेम खेळणे, आपल्या इंटरनेट कनेक्शनचा स्पीड तपासणे, जवळचे वाय-फाय क्षेत्र शोधणे, एखादे डॉक्युमेंट PDF मध्ये बदलणे, ईमज एडिटींग, ऑडिओ एडिटींग, असं सर्व काही या टूलबारवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त आपण सर्वजण मिळून ज्या सुचना कराल त्यानुसार वेळोवेळी या टूलबारमध्ये सुधारणा करण्यात येतील. 
तर असा हा 2know.in चा मराठी इंटरनेट टूलबार आपणा सर्वांना उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. हा टूलबार प्रत्येकाने आपल्या संगणकावर इन्स्टॉल करुन घ्यावा असं मला वाटतं. त्यासंदर्भातील व्हिडिओ देखिल मी लवकरच प्रसारित करत आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा आणि काही अडचण असेल तर मला खाली कॉमेंटच्या माध्यमातून कळवावं, किंवा माझा ईमेल पत्ता आहे – onlinemailme@gmail.com. फेसबुक पेज आहे – facebook.com/2know.in. यापैकी कुठेही आपण मला प्रतिक्रिया देऊन आपली अडचण सांगू शकाल किंवा आपला अभिप्राय देऊन आणखी सुधारणा करण्याबाबत सुचवू शकाल. मला खात्री आहे सर्वांना 2know.in चा मराठी टूलबार नक्की आवडेल. तेंव्हा या टूलबारबाबत आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगायला देखिल विसरु नका.

2know.in मराठी इंटरनेट टूलबार मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालिल चित्रावर क्लिक करा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.