2know.in या ‘मराठी साईट’ च्या वाटचालीचा आढावा

० जानेवारी २०१० साली 2know.in हे डोमेन नाव विकत घेऊन मी या ब्लॉगची सुरुवात केली. 2know.in ही साईट अगदी पहिल्या दिवसापासून toknow.in या वेब पत्यावरुनही चालवली जाते, हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे!? 2know.in आणि toknow.in अशा दोन पत्यांवरुन ही साईट चालवली जाते. वाचकांचा साईटच्या नावासंदर्भात गोंधळ उडू नये, म्हणून हे दोनही पत्ते या साईटला देण्यात आले. आज 2know.in या माझ्या साईटला एक वर्ष पूर्ण होत आहे.

स्थापनेच्या पहिल्याच दिवशी उत्साहाने पाच लेख लिहिल्याचं मला आठवतं. त्यानंतर मी इथे अधूनमधून लेख लिहू लागलो. सुरुवातीलाच माझ्यामध्ये इतकी उर्जा होती की, ती मला आजपर्यंत पुरत आहे. मार्च मध्ये रोज एक लेख लिहायचाच, या नियमाचे पालन करत मी ३१ दिवसात ३३ लेख लिहिले होते!

आज 2know.in आपल्याला ब्लॉगच्या स्वरुपात न दिसता साईटच्या स्वरुपात दिसत आहे, त्यामागे भरपूर कष्ट आहेत. कारण खरं सांगायला गेलं, तर html टेम्प्लेट एडिटिंगचं मला ‘क’ की ‘ढ’ कळत नाही! टेम्प्लेट एडिटिंकचं काम शोधून, वाचून, अनेकानेक तास घालवून ‘ट्रायल ऍन्ड एरर’ पद्धतीनं चाललेलं असतं. माझ्या शिक्षणाचा आणि मी जे करत आहे त्याचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इतरांसारखाच मीही एक सर्वसामान्य ब्लॉगर आहे.

2know.in च्या भावनिक, मानसिक, आर्थिक वाटचालीचा आढावा मी प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात खाली घेत आहे. याचा इतरांनाही उपयोग होईल, अशी मला खात्री आहे. 

2know.in चा पहिला वाढदिवस, एक वर्ष पूर्ण!
2know.in ची वर्षभरातील कमाई – ८०० रुपये

2know.in वर आत्तापर्यंत वर्षभरात झालेला खर्च – १६०० रुपये + सुमारे ६०० तासांचा बहुमूल्य वेळ (एकंदरीत)

2know.in वर वर्षभरात लिहिलेले एकून लेख – १४१

प्रत्येक लेख लिहिण्यास लागणारा साधारण वेळ – २ ते ३ तास (आभ्यास + लिखाण + मांडणी)

2know.in ला आत्तापर्यंत भेट देणार्‍या वाचकांची संख्या – सुमारे २६०००

त्यांनी वाचलेल्या पानांची संख्या – सुमारे ८२०००

क्रमवारी – माझ्या माहितीनुसार ‘कॉपी-पेस्ट’ न करता ‘संपूर्ण मराठी’ स्वरुपात असलेला आणि एका व्यक्तिद्वारे चालवला जाणारा 2know.in हा वाचकसंख्येच्या क्रमवारीत ‘मराठीतील’ अग्रणी ब्लॉग आहे.

2know.in चे क्रमवारीतील स्थान (१० जानेवारी २०११ नुसार) सोर्स – अ‍ॅलेक्सा.कॉम

भारतीय क्रमवारीतील (मागील ‘तीन’ महिन्यांसाठी) स्थान – १,२७,३७८
जागतिक क्रमवारीतील (मागील ‘तीन’ महिन्यांसाठी) स्थान – १८,८६,५२९
जागतिक क्रमवारीतील (मागील ‘एक’ महिन्यासाठी) स्थान – १२,५०,७५१

इंग्रजीच्या तुलनेत वाचकसंख्या कमी असण्याचे कारण

१. मराठी लोक इंटरनेटचा फारसा वापर करत नाहीत.

२. 2know.in ही एक ‘संपूर्ण मराठी’ साईट आहे. मराठी लोक ‘मराठी गुगल’ वापरुन मराठीतून ‘शोध’ घेत नाहीत. त्यामुळे त्यांना या साईटचा ‘शोध’ लागत नाही. अनेकांना इंटरनेटवर मराठी लिहिता येत नसल्याने ते मराठीतून शोध घेत नाहीत.

2know.in ची पेजरँक – ३ (सर्व लेखांना ‘मराठी गुगल’ मध्ये अग्रणी स्थान)

प्रत्येक वाचकाने 2know.in वर सरासरी किती वेळ घालवला? – ५ मिनिटे २३ सेकंद (माहितीच्या उपयुक्ततेचे निदर्शक)

प्रत्येक भेटीमागे वाचल्या गेलेल्या पानांची सरासरी संख्या – ३.०८ (माहितीच्या उपयुक्ततेचे निदर्शक)

2know.in ला मिळालेले यश आणि पुरस्कार – ‘स्टार माझा’ चॅनलच्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेत 2know.in प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण! (परिश्रमांना मिळालेली ‘पोचपावती’)

2know.in मार्फत करण्यात आलेले इतर कार्य – वाचकांच्या अनेक प्रश्नांना ईमेलने, तर कधी संपूर्ण ब्लॉग लिहून उत्तरं!

2know.in (मराठी ब्लॉगिंग) समोरील प्रमुख समस्या – आर्थिक स्ववलंबत्व नाही.

2know.in च्या आर्थिक अपयशाचे कारण –

१. 2know.in ही ‘संपूर्ण मराठी’ साईट आहे. आर्थिक आधारासाठी ‘संपूर्ण मराठी’ या स्वरुपाशी न केलेली तडजोड. पर्यायाने ‘गुगलच्या जाहिराती’ वापरण्यावर आलेला प्रतिबंध.

२. भारतातील वाचकवर्ग ऑनलाईन खरेदी करण्यास अनुत्सुक, त्यामुळे भारतात प्रत्येक क्लिक मागे जाहिरातदार देत असलेली रक्कम दूर्लक्ष करण्याइतपत अत्यंत कमी.

2know.in हा जर एक इंग्रजी ब्लॉग असता, तर आज महिन्याला किती कमवत असता? – सर्च इंजिन मधील परिस्थितीवर अवलंबून, पण अंदाजे कमीतकमी १०० ते २०० डॉलर (५ ते १० हजार रुपये) प्रती महिना.

2know.in वर जाहिरीती दिसू नयेत यासाठी काय करु? – त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी या दुव्याचा आधार घ्यावा.

2know.in च्या कार्यप्रणाली मागील भावना – सारं काही करता येईल तितकं व्यवस्थित, योग्य, नियमांना अनुसरुन आणि जागच्याजागी असायला हवं. एक ‘बिंदू’ चुकला आहे, असं जरी निदर्शनास आल्यास, दूर्लक्ष न करता, त्याच वेळी आळस न करता तो दुरुस्त करणं. स्वतःच्या ताकदीनुसार ‘दर्जेदार तेच’ देण्याचा प्रयत्न करणं.

2know.in या उपक्रमामागील समर्पणाची भावना – केवळ 2know.in चा लोगो आणि बॅनर तयार करता यावे म्हणून DTP चा क्लास लावून तो पूर्ण केला.

2know.in च्या वर्षपूर्तीनंतर मनात असलेली ‘प्रामाणिक’ भावना – एखाद्या गोष्टाला आपण चिकाटीने आकार देऊ शकतो, या जाणिवेतून निर्माण झालेला आत्मविश्वास, हलकेसे समाधान.. आणि थोडीफार उद्विग्नता!

मराठी मध्ये भविष्यात काही योजना – कप्लना अनेक आहेत, पण वेळ आणि आर्थिक पाठबळा अभावी तूर्तास अशक्य!

2know.in च्या भविष्यकालीन योजना – अनेक योजना असल्या, तरी यावर्षी नवं काही करणं हे वेळ आणि पैशांच्या कसोटीवर शक्य दिसत नाही. आपली उर्जा इंग्रजी लेखकनाकडे वळवणं ही प्रत्यक्ष जवळून अनुभवलेली ‘काळाची गरज’! यावर्षी इंग्रजी लेखनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाईल. नुकतीच त्या दृष्टीने सुरुवात झाली आहे.

2know.in बंद होणार का!? – याबाबतचा विचार मनात डोकावून जातो. कमीतकमी काही कालावधीसाठी तरी 2know.in वरील लेखन बंद करावं, असं वाटू लागतं.. पण लेखन ही सर्वप्रथम माझी आवड आहे, आणि ही आवड जीवनभर अशीच जपता यावी म्हणून त्याला दिलेली व्यावसायिक जोड! शेवटी कितीही तोटा झाला, तरी मी लिहिल्या शिवाय राहू शकेन असं वाटत नाही.. त्यामुळे वेळात वेळ काढून 2know.in वर लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करेन.

मराठी लोकांकडून अपेक्षा – संगणकावर शुद्ध मराठी लिहायला शिका आणि जमलंच तर एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी ‘मराठी गुगल’ चा मराठीतून वापर करा.

2know.in चा हा एक वर्षाचा प्रवास अनेकांना काही नवीन देऊन गेला असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो! आपल्या सर्वांच्या सहकार्याचा शतशः ऋणी आहे.. ही वाटचाल मला खूप काही शिकवून जाणारी, समाधान देणारी होती.. धन्यवाद!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.