PDF फाईल चा शोध घ्या, ई पुस्तक शोधा

जालावरील असंख्य पानांमधून PDF (पी.डी.एफ.) फाईल्सचा शोध कसा घ्यायचा ते आपल्याला पाहायचं आहे. ई-पुस्तकं देखील PDF (पी.डी.एफ.) फॉरमॅटमध्येच असतात, त्यामुळे तुम्हाला जर एखादे ई पुस्तक शोधायचे असेल, तर त्यासाठी देखील या लेखाचा तुम्हाला फायदा होईल.

बहुतेक जण गुगलचं सर्च इंजिन वापरत असल्याने आपण प्रथम पाहणार आहोत ते गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून PDF (पी.डी.एफ.) फाईल्सचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी एक गुगलचा शॉर्टकट आहे, तो तुम्हाला वापरावा लागेल. कोणत्याही प्रकारची PDF फाईल शोधायची असेल, तर त्यासाठी गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये प्रथम त्या फाईलचे नाव टाईप करा आणि मग त्यापुढे filetype:pdf असं टाईप करा. आता सर्च वर क्लिक करा. गुगल जे रिझल्ट्स घेऊन येईल ते सर्व रिझल्ट्स PDF फॉरमॅटमधले असतील. मागे आपण गुगलचे इतर काही शॉर्टकट्स पाहले होते, ते पाहायचे असतील तर या इथे क्लिक करा.

पी.डी.एफ. फाईल शोधा

गुगल सर्च इंजन च्या माध्यमातून PDF फाईल कशी शोधायची!? ते आपण पाहिलं आहेच! आता आपण खास PDF सर्च इंजिनचा विचार करुयात. पी.डी.एफ. फाईल्सचा शोध घेण्यासाठी pdf-search-engine.com हे एक चांगलं सर्च इंजिन आहे. मुख्य म्हणजे तुम्हाला जर एखादे पुस्तक हवे असेल, तर त्या पुस्तकाचे नाव फक्त यांनी दिलेल्या शोध खोक्यात (सर्च बॉक्स) टाकायचे आणि मग पी.डी.एफ. स्वरुपातील ते पुस्तक तुमच्या समोर हजर होते. त्यांनी त्यांच्या शोध खोक्यावर Search For a Book असंच लिहिलेलं आहे! म्हणजे खरं तर हे एक पुस्तक शोधण्याचेच सर्च इंजन आहे, असं आपण म्हणू शकतो.

PDF फाईल्स, ई पुस्तकं शोधण्यासाठी आणखीही काही सर्च इंजिन्स आहेत. त्यापैकी एक आहे pdfgeni.com. तिथल्या सर्च बॉक्स मध्ये एखादा विषय टाका आणि त्या विषया संबंधीत पुस्तकं तुम्हाला मिळतील. तशाच प्रकारची आणखी एक वेबसाईट म्हणजे search-pdf-books.com. बाकी गुगल, याहू आणि बिंग सर्च इंजिन्सच्या माध्यमातून PDF फाईल्सचा एकत्रितपणे शोध घेणारे सर्च इंजिन आहे pdfsearchengine.in.

अशाप्रकारे तुम्ही PDF (पी.डी.एफ.) स्वरुपातील ई पुस्तकांचा शोध घेऊ शकता. या सर्च इंजिन्सच्या माध्यमातून मला माझी ई पुस्तकं मिळाली आणि मला वाटतं आता तुम्हालाही हवं ते ई पुस्तक या माध्यमातून मिळू शकेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.