Way2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना

इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोबाईलवर मोफत SMS पाठवू शकतो हे तर आपणा सर्वांना माहितच असेल. याकामात सर्वाधिक वापरली जाणारी साईट म्हणजे way2sms.com. मोबाईलवर मोफत SMS पाठवण्यासाठी way2sms ही एक चांगली साईट आहे. वापरकर्त्यांना नेहमीच काहीतरी नवं आणि अधिक चांगलं देण्याचा प्रयत्न या साईटमार्फत केला जातो. या साईटचा वापर करुन आपण आपले ईमेल पाहू शकतो, फेसबुक, जीटॉक, याहूवरील आपल्या मित्रांबरोबर चॅट करु शकतो, त्यानंतर फ्युचर SMS, अशा अनेक चांगल्या सुविधा way2sms ने उपलब्ध करुन दिल्या आहेत. आणि आता ही साईट ‘मोफत मोबाईल रिचार्ज’ ही संकल्पना राबवत आहे.
Way2sms तर्फे जरी आपल्याला असं सांगण्यात येत असलं, की ते आपल्याला मोफत रिचार्ज देत आहेत, आणि वरकरणी ते तसं वाटतंही असलं, तरी प्रत्यक्षात तसं मुळीच नाहीये. त्यांच्या ‘मोफत रिजार्च’च्या बदल्यात ते आपल्याकडून काही काम करुन घेणार आहेत. आणि त्या कामाच्या बदल्यात आपली जी कमाई होईल, त्यातून ते आपल्याला त्यांच्या साईट वरुन आपल्या मोबाईलवर रिचार्ज मारु देतील. जर ते आपल्याकडून काम करुन घेणार असतील, तर मग हा मोफत रिचार्ज कसा झाला? हे तर असं झालं जसं की, आपण ऑफिसमध्ये काम करायचं आणि ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांनी महिन्याच्या शेवटी आपल्याला पैशांऐवजी त्या किमतीची एक वस्तू द्यायची आणि म्हणायचं मी तुला ही वस्तू मोफत देत आहे. आपण त्यांना त्या वस्तूचे प्रत्यक्ष पैशे तर दिलेले नसतात, तेंव्हा वरकरणी असं वाटतं की, ती वस्तू आपल्याला मोफत देण्यात आली आहे. याला काही अर्थ आहे?
way2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना
तर त्यांच्या ‘मोफत रिचार्ज’च्या बदल्यात ते आपल्याकडून कोणतं काम करुन घेणार आहेत? ते आता आपण पाहूयात. Way2sms.com या साईटवर आपल्याला काही जाहिराती पुरवण्यात येतील. त्या जाहिराती आपण ईमेलने आपल्या कॉन्टॅक्टसना पाठवायच्या. याशिवाय आणखी एक पर्याय देण्यात आला आहे, त्यामध्ये ते ज्या जाहिराती पुरवतील त्या फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करायच्या. जेंव्हा एखादी व्यक्ति अशाप्रकारे प्रसारित केलेल्या जाहिरातीवर क्लिक करेल, तेंव्हा आपल्या खात्यात काही पैशे जमा होतील. जेंव्हा आपल्या खात्यात कमीतकमी १० रुपये जमा होतील, आपल्याला आपल्या मोबाईलवर रिचार्ज मारता येईल. खूपच सोपं वाटत आहे ना!
पण अशाप्रकारे आपल्या मोबाईल रिचार्जचा प्रश्न सोडवण्याआधी जरा थांबा. ही गोष्ट वरकरणी वाटते तितकी सोपी नाही. अशाप्रकारे आपण दिवसातून केवळ दोन जाहिराती दोन तासांच्या अंतराने शेअर करु शकणार अहात आणि दिवसातून एक ईमेल ५० जणांना पाठवू शकणार आहात. आपण एखादी जाहिरात फेसबुकवर शेअर केलीत आणि ती हजारो लोकांनी पाहिली, तर त्यातील केवळ नाममात्र लोकंच जाहिरातीवर प्रत्यक्षात क्लिक करतात. आपणा स्वतःला आठवतं का? की आपण शेवटी जाहिरातीवर कधी क्लिक केलं होतंत ते? तेंव्हा इतरांकडूनही फारशी अपेक्षा व्यक्त करणं हे व्यर्थ आहे. याव्यतिरिक्त अशा प्रकारच्या जाहिरातबाजीने फेसबुकवरील लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो हे वेगळंच. जे फेसबुकवर जाहिरात शेअर करण्याबाबत आहे, तेच ईमेलच्या बाबतीतही बोलता येईल. फेसबुकवर एखाद्या जाहिरातीवर क्लिक झाला तर आपल्याला २० पैशे देण्यात येतात आणि ईमेलमधून क्लिक झाल्यास आपल्याला ४० पैशे मिळतात. आपल्याला जर ही रक्कम मोठी वाटत असेल, तर तो आपला मोठा गैरसमज आहे. भारतात एका क्लिकला अत्यंतीक कमी म्हटलं, तरी ५० पैशे हे मिळायलाच हवे. खरं तर एका क्लिकची किंमत ही कमीतकमी १ रुपया असायलाच हवी.
तेंव्हा way2sms ची ही योजना म्हणजे प्रत्यक्षात आभास आहे. टिनएजर मुलांसाठी हा एक खेळ होऊ शकतो, पण बाकीच्यांनी मात्र यामध्ये आपली प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण यात शेवटी सर्वांत मोठा फायदा आहे तो केवळ way2sms या साईटचा.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.