गूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल?
गूगल ट्रांसलेट मध्ये जरी मराठी भाषेचा समावेश झालेला असला, तरी त्यामार्फत होणारी भाषांतरे ही सध्या अगदी प्रथमिक अवस्थेत आहेत. एका भाषेतील मजकूर दुसर्या भाषेत भाषांतरीत करणे हे एक क्लिष्ट काम असून गूगल ट्रांसलेट ही निरंतर शिकत जाणारी व्यवस्था आहे. मानवाने केलेले भाषांतर समजून घेऊन गूगल ट्रांसलेट ते आत्मसात करते आणि पुढील वेळी भाषांतर करत असताना त्या दिशेने एखाद्या मजकूराचा त्याच्याकडून अर्थ लावला जातो. आपणही इंग्रजी, हिंदी अथवा इतर भाषेतील वाक्याचे मराठीमध्ये भाषांतर करुन गूगल ट्रांसलेटला शिकण्यास मदत करु शकतो.
मी जवळपास रोजच गूगल ट्रासंलेटचा वापर करतो. यामुळे मला ठामपणे असं काही शिकण्यास मिळत नसलं तरी एखाद्या भाषांतरीत शब्दाचा अथवा वाक्याचा सर्वसाधारणपणे अंदाज येतो. कधी मी गूगल ट्रांसलेट कडून काही शकतो, तर कधी मी त्याला काही नवीन गोष्टी शिकवतो. गूगल ट्रांसलेट माझ्यासाठी एका परदेशी मित्रासारखा आहे, ज्यात आम्हा दोघांनाही एकमेकांची भाषा नीट येत नाही, पण आम्ही आमच्या भावना एकमेकांपर्यंत पोहचवू शकतो. आपणासही गूगल ट्रांसलेटशी मैत्री करायची असेल, तर ते सहज शक्य आहे.
translate.google.com या पत्त्यावर जाऊन गूगल ट्रांसलेटला भेट द्या. दिलेल्या जागेत इंग्रजीमधून एखादे सोपे वाक्य टाईप करुन त्याच्याशी संवाद साधा. या इंग्रजी वाक्याचा मराठीमधील नेमका अर्थ आपणास माहित हवा. आता भाषांतरासाठी पलिकडे मराठी भाषेची निवड करा. गूगल ट्रांसलेटने केलेले भाषांतर योग्य आहे का? ते पहा. जर ते योग्य नसेल, तर त्या भाषांतरावर डबल क्लिक करा व मराठी मध्ये टाईप करुन त्यात सुधारणा करा. त्यानंतर खाली Yes, submit translation वर क्लिक करा. यामुळे गूगल ट्रांसलेटला आपल्याकडून शिकण्यास मदत होईल. मला वाटतं इंटरनेटवर मराठीमध्ये कसे टाईप करायचे या संदर्भातील अद्ययावत लेख मी 2know.in वर कदाचीत अजून लिहिलेला नाहीये. मराठीमध्ये टाईप करण्यासंदर्भातील माहिती आपण उद्याच्या लेखात घेऊयात.
गूगल ट्रांसलेट मधील तांत्रिक अडचणींमुळे वर सांगितल्याप्रमाणे काहीवेळा भाषांतरात बदल करणे अवघड जाते. केवळ एका शब्दाचे भाषांतर करण्यास वरील पद्धत चांगली आहे. त्यामुळे गूगल ट्रांसलेटला शिकवण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवरील एखादे संपूर्ण पान मराठीमध्ये भाषांतरीत करणे आणि मग त्या भाषांतरात सुधारणा सुचवणे. त्यासाठी भाषांतरीत मजकूरावर आपला माऊस नेल्यास आपणासमोर एक नवीन पर्याय येईल. त्यामध्ये Contribute a better translation वर क्लिक करा. त्यानंतर आपणास वर मूळ भाषेतील मजकूर तर खाली त्याचे मराठी भाषेतील भाषांतर दिसेल. या भाषांतरावर डबल क्लिक करा. त्यामुळे आपणास संपूर्ण मजकूराचे योग्य त्या क्रमाने मराठीमध्ये भाषातर करता येईल. योग्य असे भाषांतर झाल्यानंतर Contribute वर क्लिक करा.
गूगल ट्रांसलेटला मदत करण्यासाठीचा तिसरा आणि सर्वांत प्रभावी असा पर्याय म्हणजे ट्रांसलेटर टूलकीट. आपणाकडे जर आपण स्वतः भाषांतरीत केलेले दस्ताऐवज असतील, तर ते आपण translate.google.com/toolkit/ या इथे अपलोड करु शकता. त्यामुळे गूगल ट्रांसलेटला आपली भाषा शिकण्यास मोठीच मदत होईल.
गूगल ट्रांसलेटला जर आज आपण हातभार लावलात तर त्याचा भावी मराठी पिढीला निश्चितच मोठा फायदा होणार आहे. जगभरातील सर्व ज्ञान भावी पिढीस आपल्या मातृभाषेतच उपलब्ध होईल. त्यामुळे गूगल ट्रांसलेटचा उपयोग करुन घेत असताना, त्याच्याकडून काही शिकत असताना, त्याला देखील आपली मराठी भाषा योग्यप्रकारे शिकवायला विसरु नका.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.