मराठी ब्लॉग विश्व चा लोगो, कोड आपल्या ब्लॉगवर कसा टाकायचा?
माझा मराठी कवितेचा एक ब्लॉग आहे, ‘मनात राहिलं मन एक’. तर या ब्लॉगवर कविता प्रकाशीत केल्या केल्या, हा ब्लॉग, ‘मराठी ब्लॉग विश्व’ च्या यादीत वरच्या क्रमांकावर येत नाहीये. तो फार नंतर दिसायला लागतो. आणि यामुळे मला वाटतं मी माझे अनेक नवीन वाचक गमावून बसतोय. आता या समस्येवर तोडगा म्हणजे, ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा लोगो आपल्या ब्लॉगवर टाकायचा. करु करु म्हणत खूप दिवसांपासून हे छोटंसं काम राहूनच जात होतं. पण योगायोगाने काल मला 2know.in चे नियमित वाचक सुधीरजी, यांनी याबाबत शंका विचारली आणि शिवाय मलाही त्याच दिशेने प्रवास करायचा होता, म्हणून म्हटलं आपण या प्रवासाचेच प्रवासवर्णन करुयात. म्हणजेच हा ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा कोड, लोगो माझ्या ब्लॉगवर टाकता टाकताच मी त्याबाबतची लाईव्ह माहिती तुम्हाला या इथे देणार आहे.
१. ठिक आहे! तर मी ‘मराठी ब्लॉग विश्व’ ही वेबसाईट उघडली आहे.
२. तिथे मी आता ‘लॉग इन’ करणार आहे. म्हणजेच माझ्या ‘सदस्य खात्यात’ प्रवेश करणार आहे.
टंकलेखनाचा पर्याय |
३. मी मराठी लिहिण्यासाठी ‘बरह’ वापरत आहे. आणि म्हणूनच शेजारच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘मराठी ब्लॉग विश्व’ वर ‘मराठीत लिहा’ या सोयीचा, Roman हा पर्याय मी निवडला आहे. ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा उजवीकडील एकदम वरचा कोपरा पहा. तिथे तुम्हाला ही निवड करता येईल.
४. ‘मराठी ब्लॉग विश्व’ वर सदस्य नाव (युजरनेम) आणि परवलीचा शब्द (पासवर्ड) देऊन मी येण्याची नोंद केली आहे. आता मी ‘सदस्य खाते’ (माय अकाऊंट) या पर्यायावर क्लिक करुन ‘मराठी ब्लॉग विश्व’ मधील माझ्या पानावर जात आहे.
५. तिथे ‘मुख्य पान’, ‘मागोवा’, ‘माझे ब्लॉग पर्याय’ आणि ‘संपादन’ असे एकंदरीत चार विभाग दिलेले आहेत. यापैकी ‘माझे ब्लॉग पर्याय’ या विभागावर मी क्लिक करत आहे.
६. इथे माझा प्रत्येक ब्लॉग आणि त्यासाठीचा ‘मराठी ब्लॉग विश्व’ लोगो कोड देण्यात आला आहे. माझ्या ‘मनात राहिलं मन एक’ ब्लॉगसाठीचा कोड मी माऊसच्या सहाय्याने कॉपी करत आहे.
७. आता मी ब्लॉगर च्या डॅशबोर्डवर आलो आहे. तिथून मी ‘मनात राहिलं मन एक’ या ब्लॉगच्या Design (Layout) या विभागात आलो आहे. इथे आपल्याला साईडबारमध्ये किंवा ब्लॉगच्या वर-खाली Add a Gadget नावाचा पर्याय दिसेल. ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा लोगो ठेवण्यासाठी योग्य ती जागा निवडून Add a Gadget वर क्लिक करा.
८. एक नवीन विंडो ओपन होईल तिथून ‘HTML/JavaScript हे गॅजेट जोडा.
९. Content च्या ठिकाणी पायरी ६ मध्ये ‘मराठी ब्लॉग विश्व’ वरुन कॉपी केलेला कोड टाका, तिथे दिलेल्या रिकाम्या जागेत पेस्ट करा. अलिकडे Title फिल्डही भरावी लागत आहे. गरज भासल्यास Title च्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे काहीतरी टाका. आणि आता खाली दिलेल्या Save या बटणावर क्लिक करुन गॅजेट सेव्ह करा.
मराठी ब्लॉग विश्व चिन्ह, लोगो |
१०. तुम्ही आपला ब्लॉग उघडून पाहिलात, तर तुम्हाला ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा लोगो आपल्या ब्लॉगवर दिसेल.
झालं काम! मला वाटतं माझ्याप्रमाणेच तुम्हालाही आता ‘मराठी ब्लॉग विश्व’ चा लोगो आपल्या ब्लॉगवर टाकण्याबाबत काही समस्या येणार नाही.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.