‘लावा’चा ड्युएल सिम मोबाईल फोन
मागे मी ड्युएल सिम मोबाईल फोनवर एक लेख लिहिला होता. तेंव्हा त्यात म्हटलं होतं की, घेतला तर ओनिडाचाच ड्युएल सिम मोबाईल फोन घेईन, नाहितर काही काळ वाट पाहिन. अरेऽ पण आपण नेहमी जसा विचार करतो, अगदी तसंच कधी घडतं का!? मनात असतं एक आणि मग बघता बघता सारं चित्रच पालटून जातं.
त्याचं झालं असं की तुर्तास मी ड्युएल सिम मोबाईल फोन घ्यायचा विचार मनातून काढून टाकला होता. पण त्यादिवशी माझ्या मित्रांनी माझ्या समोर ‘फ्लाय’चे दोन ड्युएल सिम मोबाईल फोन्स घेतले, तेही किंमत रुपये १५०० फक्त. ‘त्यातिथून’ सारखं सारखं मोबाईल विकत घेतल्याने ‘तो’ दुकानदार माझ्या मित्राचा चांगला ओळखीचा झाला होता. त्यामुळे त्याने त्यांना ते मोबाईल्स इतर ठिकाणांपेक्षा २००-३०० रुपयांनी स्वस्त दिले. हे पाहून मग माझ्या ‘गरजेने’ही उचल खाल्ली आणि मीही दुस-या दिवशी ड्युएल सिम मोबाईल फोन घ्यायचा ठरवलं. (आणि आता यावेळीहीऽऽऽ) …मी घ्यायला गेलो ‘फ्लाय’ आणि दुकानदाराने दाखवला ‘लावा’ (ज्वालामुखीतला नव्हे!). ठिक आहेऽ ठिक आहेऽ मी बोऽअर करत नाही… पण सांगायचं काय तर… एक वस्तू मागितली की दुकानदार नेहमी ‘जास्त चांगलं’ म्हणून दुसरीच वस्तू दाखवतो. (सगळ्याच दुकानदारांची ही एक वाईट सवय असते.) आता हा ‘लावा’ मोबाईल मला ‘फ्लाय’पेक्षा जास्त आवडला!(दुकानदाराची ईच्छाशक्ती!) कारण याला वायरलेस एफ.एम.(FM) होता आणि याचा स्टॅंडबाय बॅटरी बॅकअप होता १ महिना. अर्थात मी तोच मोबाईल घ्यायचा ठरवलं, कारण असं केल्याने अगदी मित्रांसारखंच ‘शेम टू शेम’ असंही होणार नव्हतं.
मग सुरु झाली ‘घासाघिसऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!’ मला अगदी वॆताग येतो या गोष्टीचा! तसं करणं जमतच नाहीऽऽ! पण रास्त भावात घेतल्याशिवाय एकादी गोष्ट घेतल्याचं समाधानही प्राप्त होत नाही. अशा अडचणीच्या प्रसंगी मित्र मदतीला धावणार नाही तर मग कोण!? मी त्यालाच माझा मोबाईल घ्यायला सांगितलं. त्याने १७०० चा मोबाईल १५५० ला करुन आणला, पण त्यासाठी त्या बिच्या-याला ३५०० रु.चा आणखी एक मोबाईल विकत घ्यावा लागला! (म्हणजे ४-५ दिवसांनंतर तो ‘तो मोबाईल’ विकत घेणारच होता, त्याला ‘तो’ आजच विकत घ्यावा लागला इतकंच!:-)
तर ‘लावा ARC02’ मोबाईलमध्ये काय काय आहे?
Lava ARC 02 |
१. एकाचवेळी दोन सिमकार्डस् बसविण्याची सोय. एकाचवेळी दोन कनेक्शन हाताळण्याची सोय सोप्या पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहे.
२. ३० दिवसांचा स्टॅंडबाय बॅटरी बॅकअप. बाकी तुम्ही जितकं जास्त बोलाल तितक्या लवकर बॅटरी उतरेल.
३. वायरलेस एफ.एम., एफ.एम. रेकॉर्डिंग आणि शेड्यल्ड एफ.एम. रेकॉर्डिंग. एम.एम. वरील एखादे गाणे अथवा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी हा मोबाईल उपयुक्त आहे.
४. यात MP3 प्लेअर आहे. आणि मोबाईलसोबत हेडफोनही मिळतो.
५. २ जी.बी. पर्यंत मायक्रो मेमरी कार्ड बसविण्याची सोय. मोबाईलबरोबर मेमरी कार्ड मिळत नाही. ते तुम्हाला विकत घ्यावे लागेल. अथवा तुमच्याकडे आधिपासूनच एक असेल तर ते तुम्ही बसवू शकाल.
६. ‘लावा’ची ‘टॉर्च’ अतिशय उत्तम आहे, खूप प्रकाश पडतो.
७. इंटरनेट वापरण्याची सोय आहे. पण इतक्या बेसिक मोबाईलवर तुम्ही बघून बघून काय बघणार हा खरा प्रश्न आहे!
८. बाकी गेम्स,आलार्म, कॅलेंडर, टु डू लिस्ट, कॅलक्युलेटर, स्टॉप वॉच, वल्ड क्लॉक, ई-बुक रिडर!!? इ.इ. गोष्टींनी परिपूर्ण असा हा मोबाईल फोन आहे.
तुम्ही स्वतः देखील आजकाल स्वस्तातला बोलण्यापुरता ड्युएल सिम मोबाईल फोन शोधत असाल, तर त्यासाठी आजचा हा लेख जरुर विचारात घ्या.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.