अनुमती दिलेल्या वेबसाईट्स, ऑथोराईज्ड वेबसाईट्स, ओपन आय.डी. आणि नियंत्रण
इंटरनेटच्या विश्वात आजकाल इतक्या वेबसाईट्सचा समावेश झाला आहे की, कुणाकुणाचे म्हणून सदस्य व्हावे आणि युजरनेम आणि पासवर्डस् तरी किती लक्षात ठेवावेत!? प्रत्येक नव्या वेबसाईटचा सदस्य होणं म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं आलं, ई-मेल व्हेरिफाय करणं आलं इ.इ. ..नेहमी नेहमी या सार्या गोष्टी करत बसणं म्हणजे एक मोठी डोकेदुखीच आहे. पण अशा या समस्येवरही एक उपाय आहे.. आणि तो म्हणजे नवीन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत बसण्यापेक्षा थेट ओपन आय.डी. द्वारे लॉग इन करणं! अर्थात तशी सुविधा प्रस्तुत वेबसाईटने उपलब्ध करुन दिली असेल, तरच ते शक्य आहे. पण आजकालच्या बहुतेक सर्व चांगल्या वेबसाईट्सने ही सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहेच! फेसबुकच्या लॉग इन माहिती द्वारे एखाद्या बाहेरील वेबसाईटला लॉग इन होणं म्हणजे हा देखील एक ओपन आय डी चाच प्रकार आहे.
ओपन आय.डी. चे बोधचिन्ह |
ओपन आय.डी. बाबत अधिक जाणून घेण्यासाठी आपण या इथे जाऊ शकाल. आपले जर गुगल खाते असेल (उदा. जीमेल इ.) किंवा फेसबुक, ट्विटर यांचे खाते असेल, तर अभिनंदन! आपला ओपन आय.डी. आधिपासूनच तयार आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर, आपण ibibo.com चे घेऊयात. आपण ibibo.com वर गेल्यानंतर पाहू शकाल की, त्यांनी फेसबुक लॉग इन ची सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. म्हणजेच आपल्याला जर ibibo.com च्या आत शिरायचं असेल, तर केवळ “Connect with facebook” या निळ्या बटणावर क्लिक करायचं आहे, आणि लगेच आपल्याला ibibo.com मध्ये शिरण्याची परवानगी मिळेल. अट इतकीच आहे की, तुम्ही त्यासाठी आपल्या फेसबुक अकाऊंटमध्ये लॉग इन असायला हवं, नाहीतर आपल्याला फेसबुकचे युजरनेम आणि पासवर्ड दिल्यानंतर आत शिरण्याची परवाणनगी मिळेल. थोडक्यात काय!? तर आपण फेसबुकच्या ओपन आय डी द्वारे ibibo.com मध्ये लॉग इन होऊ शकाल. एखाद्या वेबसाईटवर जर ओपन आय.डी चालत असेल, तर त्या वेबसाईटच्या मुख्य पानावर त्या वेबसाईटच्या आत शिरण्यासाठी इतर कोणकोणत्या वेबसाईटचे (उदा. फेसबुक, गुगल) ओपन आय.डी चालतात!? ते सांगितलेलं असतं. आता ऑथोराईज्ड म्हणजेच अनुमती दिलेल्या वेबसाईट्स कोणत्या!? उदाहरणानेच सांगायचं झालं तर, ibibo.com ही फेसबुक मध्ये ऑथोराईज्ड वेबसाईट आहे. कारण फेसबुकची लॉग इन माहिती वापरण्याची परवानगी, अनुमती आपण ibibo.com ला दिली आहे.
आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, अशा अनुमती दिलेल्या वेबसाईटची अनुमती जर आपल्याला काढून घ्यायची असेल, तर हे काम कुठून करता येईल!? फेसबुक, गुगल, ट्विटर या तीन वेबसाईट्सच्या संदर्भात आपण या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत.
फेसबुक : आपण कोणकोणत्या वेबसाईट्सना फेसबुकची माहिती वापरण्याची अनुमती दिली आहे, हे पाहण्यासाठी आणि एखाद्या वेबसाईटची अनुमती काढून घेण्यासाठी आपल्याला खाली सांगितल्याप्रमाणे जाता येईल.
१. फेसबुक मध्ये लॉग इन झाल्यानंतर आता आपण मुख्य पानावर आला असाल.
२. मुख्य पानाच्या उजव्या कोपर्यात वर Account मधून Privacy Settings मध्ये जा.
३. आलेल्या पानावर अगदी खालच्या बाजूला Applications and Websites च्या खाली Edit your settings हा पर्याय आपल्याला दिसून येईल. त्यावर क्लिक करा.
४. त्यानंतर Applications you use या विभागात आपल्याला आपण अनुमती दिलेल्या अॅप्लिकेशन्स आणि वेबसाईट्सची यादी दिसून येईल. Edit settings वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनुमती दिलेल्या वेबसाईट्स, अॅप्लिकेशन्स वर नियंत्रण ठेवता येईल किंवा त्यांना काढून टाकता येईल.
गुगल : गुगलच्या बाबतीत ऑथराईज्ड वेबसाईट्सवर नियंत्रण ठेवणं अगदी सोपं आहे.
१. https://www.google.com/accounts या इथून आपण गुगल अकाऊंट्स वर जाऊ शकाल.
२. Personal Settings – Security मध्ये change authorized websites या दुव्यावर क्लिक करा.
३. आपण गुगलची माहिती वापरण्यास परवानगी दिलेल्या वेबसाईट्सची यादी आपल्याला दिसून येईल. यापैकी एखाद्या वेबसाईटची अनुमती आपल्याला काढून घ्यायची असेल, तर केवळ त्या वेबसाईटसमोरील Revoke Access या दुव्यावर क्लिक करा.
ट्विटर : ट्विटरसंदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला असं करता येईल.
१. ट्विटरच्या मुख्य पानावरुन settings या दुव्यावर क्लिक करा.
२. settings मधून connections या विभागात जा. या विभागातून आपण परवानगी दिलेल्या वेबसाईट्सवर नियंत्रण मिळवू शकाल. त्यासाठी संदर्भीत वेबसाईटखालील Revoke Access या दुव्याचा वापर आपण करु शकाल.
अशाप्रकारे आज आपण माहिती घेतली आहे, अनुमती दिलेल्या वेबसाईट्स म्हणजेच ऑथोराईज्ड वेबसाईट्स संदर्भात आणि अशा वेबसाईट्सवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात! ..तसंच ओपन आय.डी. म्हणजे काय!? हे देखील आज आपण थोडक्यात पाहिलं आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.