अ‍ॅडसेन्स, एमजिंजर आणि अ‍ॅडमाया चे चेक

या दहा दिवसात अ‍ॅडसेंन्स, एमजिंजर आणि अ‍ॅडमाया यांचे सलग तीन चेक माझ्या घरी आले. जेंव्हा नेहमी वडिलांचं नाव घेत येणारा कुरिअर वाला विचारतो, रोहन जगताप कोण आहे? तेंव्हा अगदी छान वाटतं. मला खात्री असते, नक्कीच हा माझ्यासाठीचा चेक असणार! दुसरं कोणाचं माझ्याकडे काय काम!? याचा अर्थ असा नाहीये की, असे चेक नेहमीच माझ्यासाठी घरी येतात, योगायोगाने ते यावेळी एकत्र आले इतकंच. पण या सर्व चेक्सना मला एकदा विचारायचं आहे, तुम्ही रोज माझ्या घरी का येत नाही? मी नको तर म्हटलं नाही! अगदी न बोलवता येणार्‍या पाहुण्याप्रमाणे येत जा. पण चेक येण्यामागचं एक सरळ सुत्र आहे, जितके अधिक लेख, तितके अधिक वाचक. जितके अधिक क्लिक्स, तितके अधिक आणि लवकर चेक!  यात मी लेलित लेखन धरत नाही, कारण त्यावर मी जाहिराती ठेवत नाही. एकंदरीत विचार केला, तर मला वाटतं इंटरनेटवर आत्तापर्यंत मी  ५०० लेख लिहिले आहेत.

अ‍ॅडसेन्स चा चेक:

अ‍ॅडसेन्स, अ‍ॅडमाया आणि एमजिंजर चे चेक

यावेळी आलेला अ‍ॅडसेन्स चा चेक हा माझा अ‍ॅडसेन्सचा तिसरा चेक होता. आपल्या अ‍ॅडसेन्स खात्यात $१०० (शंभर डॉलर) जमा झाल्यानंतर (अ‍ॅडसेन्स पेमेंट थ्रेशोल्ड) ‘त्या’ महिनाअखेरीस अ‍ॅडसेन्स कडून आपल्याला १०० किंवा त्याहून अधिक जे काही डॉलर झाले असतील, ते भारतीय रुपयांमध्ये बदलून, त्या रकमेचा चेक आपण नमूद केलेल्या पत्यावर पाठवून देण्यात येतो. अ‍ॅडसेन्स पेमेंट प्रोसेस बाबत अधिक माहिती माझ्या या लेखात मिळेल – माझा पहिला अ‍ॅडसेन्स चेक आणि अ‍ॅडसेन्स पेमेंट प्रोसेस.

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या बदलत्या दराचा देखिल या रकमेवर परिणाम होतो. पहिल्या चेकच्या वेळी डॉलर रुपयाचा जो दर होता, तोच दर जर आजही असता, तर मला २०० रुपये अधिक मिळाले असते. इतक्या कमी रकमेवर याचा लक्षात येण्याजोगा परिणाम होतो, तर सहाजीकच आयात-निर्यातीवर याच्या हलक्याशा बदलाचाही प्रचंड परिणाम होत असणार.

यावेळी कुरिअर वाला मला म्हणला, ‘कसलं कुरिअर आहे सर हे!? सहज आपलं एक कुतूहल म्हणून विचारतो. वर फ्रॉम वगैरे काही नाही. चेक आहे इतकं माहित आहे आणि हा  फार कमी लोकांना येतो.’ तेंव्हा मी त्याला त्याबाबत थोडक्यात समजावून सांगितलं.

मी इंटरनेटवर सुमारे ५०० लेख जरी लिहिले असले, तरी त्यातले केवळ सुमारे १३० इंग्रजी असल्याने आर्थिक कमाईत मला आत्तापर्यंत हवं तसं लक्षणिय यश मिळालेलं दिसून येत नाही.

एमजिंजर चा चेक:

एमजिंजर चा यावेळी मला आलेला चेक हा देखिल ऍडसेन्स प्रमाणेच तिसरा चेक होता. आपल्या मोबाईलवर जाहिरातीचा एक SMS येतो, तेंव्हा आपल्याला त्याचे २० पैसे मिळतात. आपल्या खाली तयार झालेल्या साखळीतील कोणाला जेंव्हा SMS येतो, तेंव्हा आपल्याला त्याचे १० पैसे मिळतात, आणि दुसर्‍या स्तरावरील साखळीतील कोणाला जेंव्हा SMS येतो, तेंव्हा आपल्याला त्याचे ५ पैसे मिळतात. असं साधरणतः एमजिंजरचं स्वरुप आहे. याशिवाय आपण मिळावलेल्या प्रत्येक नवीन सदस्यामागे आपल्याला २ रुपये मिळतात. याबाबतची अधिक सविस्तर माहिती, माझ्या या लेखात मिळेल.

आपल्या एमजिंजर खात्यात ३०० रुपये जमा झाल्यानंतर आपण चेकची मागणी करु शकतो. त्याप्रमाणे काही दिवसांत चेक आपल्या घरी येतो. यासाठी खूप मोठी साखळी तयार करण्याची गरज असून, त्यासाठी माध्यमाची गरज आहे, आणि असं माध्यम सर्वांकडेच असत नाही. तेंव्हा आपल्याला हे जमेल का!? याचा यात सहभागी होण्यापूर्वी प्रत्यकाने स्वतःशी विचार करणं गरजेचं आहे.

अ‍ॅडमाया चा चेक:

अ‍ॅडमाया चा मात्र हा माझा पहिलाच चेक होता. हा पहिला चेक येण्यास जरी मोठा कालावधी लागला असला, तरी कासवाच्या गतीने का होईना, पण अ‍ॅडमायाचे खाते आता जरा अधिक वेगाने अकडेबदल दाखवत आहे. कदाचीत वाचकांची संख्या वाढत असल्याचा हा परिणाम असेल. शिवाय अ‍ॅडमाया पेज इंप्रेशनलाही काही रक्कम देऊ करत आहे. ही रक्कम जरी दूर्लक्षीत करण्याजोगी असली, तरी ती एकंदरीत हलकीशी परिणामकारक ठरत असावी.

अ‍ॅडसेन्स सारख्या आधाराने जेंव्हा मराठीचा आधार काढून घेतला, तेंव्हा काही पर्यायांचा विचार करत असताना अ‍ॅडमायाच सर्वोत्तम पर्याय बनून माझ्या समोर आला. त्यापूर्वी मी ‘अ‍ॅड्स फॉर इंडियन्स’ च्या जाहिराती काही काळ राबवल्या होत्या, पण विवाह विषयक वेबसाईट्सच्या जाहिराती सोडून इतर कोणत्याही जाहिराती दाखवायला ते तयार नव्हते. शिवाय महिनाभर जाहिराती साईटवर ठेवूनही एकही क्लिक झाला नाही!? तेंव्हा ‘ऍड्स फॉर इंडियन्स’ फ्रॉड असल्याचेच सिद्ध झाले.

विविध विषयांशी संबंधीत अनेक जाहिरातदार आणि त्यांच्या जाहिराती हे अ‍ॅडमायाचे बलस्थान आहे. शिवाय कोणत्या जाहिराती आपल्याला आपल्या साईटवर नको आहेत, हे ठरवण्याचे स्वातंत्र्यही अ‍ॅडमाया आपल्याला देते. विवाह आणि सहल विषयक अशा सर्व जाहिराती अशाप्रकारे मी माझ्या साईटवरुन वगळून टाकल्या.

अ‍ॅडमाया ही तशी तुलनेने नवीन साईट असून, ते अजून या क्षेत्रात रुळत आहेत. प्रत्येक क्लिक मागं ते केवळ २ सेंट देतात, यामागे त्यांना दोष देण्यात अर्थ नसून, भारतातील परिस्थिती त्यास बहुतांशी कारणीभूत आहे. आपल्या अ‍ॅडमाया खात्यात १० किंवा त्याहून अधिक डॉलर जमा झाल्यानंतर आपण अ‍ॅडमायाला चेकची विनंती करु शकतो. डायरेक्ट बँक डिपॉझिटचा पर्यायही उपलब्ध आहे.

अ‍ॅडमायाच्या एका गोष्टीवर मात्र मी नाराज आहे, ती म्हणजे पोस्टाचा आणि प्रोसेसिंगचा खर्च ते आपल्याकडून वसून करतात. याकरणास्तव अंदाजे ४५० चा चेक ४०० चा बनून माझ्या हातात पडला. साधरण १ डॉलर ते प्रोसेसिंग फी म्हणून वसूल करतात असं दिसून येतंय. दुसरं म्हणजे अ‍ॅडमायाची ‘चेक पेमेंट प्रोसेस’ अत्यंतीक मंद असून चेकची विनंती केल्यानंतर तब्बल सव्वा दोन महिन्यांनंतर चेक माझ्या हातात आला. अ‍ॅडसेन्सच्या बाबतीत हा कालावधी साधारणतः सव्वा महिन्याचा आहे.

आपल्या शंकांना मात्र अ‍ॅडमायातर्फे न विसरता उत्तरे दिली जातात ही बाब मला आवडते. या दुव्याच्या आधारे आपण ऍडमायाचे सदस्य बनून त्यांच्यामार्फत आपल्या उत्पादनाची जाहिरात करु शकाल अथवा आपल्या ब्लॉगसाठी, वेबसाईटसाठी जाहिराती मिळवू शकाल.

अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे चेक मला या १० दिवसांत आले. बाकी माझ्याजवळ असलेले डोमेन नेम रिन्यू करण्यातच हे सगळे पैसे संपून गेले. हळूहळू दर महिन्याला जर असे चेक माझ्या घरी येऊ लागले, तर ते पहायला मला आवडेल.

जाता जाता १००० हून अधिक सब्स्क्राईबर्स झाल्याबद्दल 2know.in च्या सर्व वाचकांना एक आनंदाची बातमी! आजपासून मी 2know.in ची फिड पूर्ण स्वरुपात देत आहे. याचाच अर्थ यापुढे 2know.in चे सर्व लेख ईमेल मध्येच अथवा रिडर मध्येच अगदी पूर्ण स्वरुपात वाचता येतील. आता आपण 2know.in चा माहितीपर लेख घेऊन आलेला मेल आपल्या सर्व मित्रांना अगदी सहजगत्या ईमेलने पुढे (Forward) पाठवू शकाल. अजूनही आपण 2know.in ला सब्स्क्राईब केले नसेल, तर लवकरात लवकर सब्स्क्राईब करा. शेजारच्या साईडबार मधून आपण 2know.in चे फेसबुक ‘फॅन पेज’ देखिल लाईक करु शकाल, जेणेकरुन इंटरनेट विषयक माहिती फेसबुकवर आपल्याला आपल्या मराठी भाषेत मिळत राहिल. आपण जर 2know.in चे चाहते असाल, तर आपल्या सर्व मित्रांना 2know.in विषयक माहिती द्या आणि असंच 2know.in ला भेट देत रहा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.