अडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा
काही वर्षांपूर्वी एखादा इंग्रजी शब्द अडला की त्याचा अर्थ पाहण्यासाठी शब्दकोश (डिक्शनरी) उघडून त्यात तो शब्द शोधावा लागत असे. अशाप्रकारे अडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहणं तसं फारसं सोयीचं नव्हतं. शिवाय पुन्हा त्या शब्दाचा अर्थ लक्षात राहिलच असं नाही, तेंव्हा तो शब्द एखाद्या वहीत लिहून ठेवला तरच भविष्यात त्याचा उपयोग होत असे, नाहीतर त्यासाठी पुन्हा पुन्हा शब्दकोश उघडून पहावा लागे. अशावेळी एखादे इंग्रजी पुस्तक वाचत असताना अथवा इंग्रजी सिनेमा पहात असताना एखादा शब्द आडला, तर सारंच कसं कंटाळवाणं आणि अवघड होऊन बसायचं. कारण त्यासाठी वारंवार शब्दकोश हाताळावा लागे. यामुळे मनोरंजनापेक्षा तो आभ्यासच अधिक वाटायचा.
पण इंटरनेटच्या या काळात या सार्या गोष्टी अगदी सहजसोप्या झाल्या आहेत. आपण जेंव्हा एखादे इंग्लिश पुस्तक वाचत असाल, अथवा इंग्लिश सिनेमा, कार्यक्रम पहात असाल, तेंव्हा आपला स्मार्टफोन, टॅब वा लॅपटॉप सोबत ठेवत चला. आता http://translate.google.com हे संकेतस्थळ आपल्या इंटरनेट वेब ब्राऊजर मध्ये उघडा. या पानावर गूगलद्वारे भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एक ऑनलाईन शब्दकोश म्हणून देखील आपणास हे संकेतस्थळ वापरता येते.
अडलेल्या शब्दांपासून शब्दकोश तयार करणे
- आपणास अडलेला असा कोणताही एखादा इंग्लिश (किंवा इतर भाषेतला) शब्द दिलेल्या जागी टाईप करा.
- तो शब्द कोणत्या भाषेत आहे? ते गूगल ट्रांसलेट स्वतःहून शोधून काढेल. जर ते त्यास जमले नाही, तर आपण त्या शब्दाची भाषा निवडा.
- त्यानंतर त्या शब्दाचा अर्थ कोणत्या भाषेत हवा आहे? ते आपणास सांगावं लागेल. त्यानंतर लगेच आपणास त्या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल.
- भविष्यातील गरज ओळखून हा शब्द संग्रही ठेवण्यासाठी चित्रात दाखविल्याप्रमाणे त्यास तारांकित करा. (मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)
- हा शब्द तारांकित केल्यानंतर तो ‘फ्रेजबुक’मध्ये (Phrasebook) साठवला जाईल. फ्रेजबुकमध्ये अशाप्रकारे तारांकित केलेल्या शब्दांचा एक शब्दसंग्रह तयार होतो. त्यामुळे आपणास अडलेले सर्व शब्द भविष्यात एका ठिकाणी पाहता येतात.
- आपला शब्दसंग्रह वाढत गेला, तर फ्रेजबुकसाठी असलेल्या सर्चचा वापर करुन आपण आपल्या शब्दसंग्राहातील शब्दांचा अगदी सहज शोध घेऊ शकाल.
आपला शब्दकोश ऑफलाईन कसा वापराल?
- आपण स्वतः तयार केलेला शब्दकोश इंटरनेट कनेक्शन नसताना म्हणजेच ऑफलाईन वाचता यावा यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Export to Google Sheets वर क्लिक करा.
- CSV data गूगल स्प्रेडशीटमध्ये import करा.
- Phrasebook नावाची एक स्प्रेडशीट आपल्या गूगल डॉक्सच्या (गूगल ड्राईव्ह) खात्यात तयार होईल. ती स्प्रेडशीट उघडा. गरज नसलेले कॉलम हवं तर डीलीट करा.
- तुम्हाला तुमचे शब्द स्प्रेडशीटमध्ये अल्फाबेटीकली, म्हणजेच A पासून Z पर्यंत लावता येतील. त्यामुळे आपणास आपले शब्द शोधण्यास सोपे जातील. अशाप्रकारे अल्फाबेटीकली शब्द लावण्यासाठी आपणास इंटरनेटवर त्यासंदर्भातील स्प्रेडशीट फॉर्म्युला शोधावा लगेल.
- त्यानंतर हव्या त्या फॉरमॅटमध्ये ती स्प्रेडशीट फाईल आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या. अशाप्रकारे आपण आपला शब्दकोश ऑफलाईन वापरु शकाल.
गूगल ट्रांसलेट मधील आपले फ्रेजबुक (साठवलेला शब्दसंग्रह) पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर देखील करु शकाल. आपणास आपला शब्दकोश (डिक्शनरी) प्रिंट करता येईल, जेणेकरुन मोबाईल आणि संगणकापासून दूर असताना शब्दकोशाचा वापर करता येईल.