इंटरनेट गुरु – इंटरनेटविषयी माहिती देणारे मराठी मासिक
2know.in या इंटरनेटविषयक माहिती देणार्या मराठी ब्लॉगवर लोक अगदी भरभरुन प्रेम करतात. पण हा ब्लॉग केवळ अशाच लोकांपर्यंत पोहचतो ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे. ज्या लोकांकडे इंटरनेट नाही आणि ज्यांना अगदी इंटरनेट म्हणजे काय? हे देखील माहित नाही, अशा लोकांसाठी मात्र एखाद्या पारंपारिक माध्यमाची गरज होती. इतके दिवस वर्तमानपत्रात येणार्या एखाद् दुसर्या लेखामार्फत अशा लोकांपर्यंत इंटरनेट संबंधित थोडीफार माहिती पोहचत होती. पण आता एक नवीन मासिक इंटरनेटची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत देण्यासाठी खास सुरु करण्यात आले आहे.
‘इंटरनेट गुरु’ हे या नवीन मासिकाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी मला एक ईमेल आला. त्यामध्ये मला या मासिकासाठी लिहिण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. तेंव्हा मी ते मासिक घरी मागवून घेतले. मी जेंव्हा ‘इंटरनेट गुरु’ हे मासिक स्वतः पाहिले आणि वाचले तेंव्हा ते मला अतिशय आवडले. हे मासिक हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्या लक्षात येते की, या मासिकाची छ्पाई ही अगदी दर्जेदार आहे. या मासिकातील प्रत्येक लेख आपणास माहितीची नवी दालने खुली करतो. एकंदरीतच ‘इंटरनेट गुरु’ हे मासिक इंटरनेटची आवड असणार्या लोकांच्या संग्रही असावे असे आहे.
नुकताच या मासिकाचा दुसरा अंक प्रकाशित झाला. त्यात माझ्या स्वतःच्या एका लेखाचा देखील समावेश आहे. ‘इंटरनेट गुरु’च्या वाचकांना मी माझ्या 2know.in या ब्लॉगची ओळख त्यात करुन दिली आहे. ‘इंटरनेट गुरु’च्या पुढील अंकापासून वाचकांना माझे निरनिराळ्या विषयावरील लेख वाचायला मिळतील. ‘इंटरनेट गुरु’ हे मासिक कोल्हापूर येथून प्रकाशित होते. भागवत पवार हे या मासिकाचे मालक, मुद्रक व प्रकाशक आहेत.
हे मासिक साधरण ५० पानांचे असून या मासिकाची किंमत १०० रुपये इतकी आहे. या मासिकाचे दोन अंक आत्तापर्यंत प्रकाशित झाले आहेत. त्यातील पहिल्या अंकाची ई-आवृत्ती मी खास 2know.in च्या चाहत्यांना मोफत देत आहे. ‘इंटरनेट गुरु’ मासिकाचा ई-अंक मोफत मिळवण्यासाठी आपणास केवळ 2know.in चे फेसबुक पेज लाईक करावे लागणार आहे. त्यानंतर 2know.in च्या फेसबुक पानावरील Only for likers या अॅप्लिकेशनवर गेल्यास आपणास हे मासिक डाऊनलोड करण्यासंदर्भातील दुवा (लिंक) दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘इंटरनेट गुरु’ हे मासिक ऑनलाईन वाचता येईल. जर हे मासिक डाऊनलोड करायचे असेल, तर File मध्ये जाऊन Download वर क्लिक करा.
‘इंटरनेट गुरु’ मासिकाची वार्षिक वर्गणी ९९९ रुपये असून याच मासिकाच्या ई-आवृत्तीची वार्षिक वर्गणी ही केवळ ४४४ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. सहामाही वर्गणी ५५५ रुपयांत उपलब्ध आहे. वर्षातून एकंदरीत १२ अंक अशी या मासिकामागील संकल्पना आहे. आपणास जर हे मासिक हवे असेल, तर अधिक माहितीसाठी मला mail@2know.in या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. या मासिकाची ई-आवृत्ती वाचून झाली असेल, तर हे मासिक कसे वाटले? ते लेखाच्या खाली प्रतिक्रियेच्या माध्यमातून आवर्जून सांगा.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.