एक वर्षापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर
फेसबुकचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. प्रत्येकजण फेसबुकवर सतत काही ना काही पोस्ट करत असतो. भारतामध्ये ट्विटरचा वापर तितकासा होत नसला, तरी आपल्यापैकी काहीजण ट्विटर नियमितपणे वापरतात. ट्विटर ही एक मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट आहे. इथे १४० अक्षरांच्या बंधनात आपण आपलं मन मोकळं करु शकतो. १४० अक्षरात आपल्या भावना मांडून आपण जे पोस्ट करतो, त्याला ‘ट्विट’ असं म्हणतात. असे कितीही ट्विट्स आपण करु शकतो. पण प्रत्येक ट्विटची मर्यादा ही १४० अक्षरांची असते.
आपण जर दैनंदिनी लिहित असाल किंवा लिहिली असेल, तर १ वर्षापूर्वी याच दिवशी मी नेमकं काय करत होतो? हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच अनुभवली असेल. आपण जर कधी दैनंदिनी लिहिली नसेल, तरी देखील काही हरकत नाही. आपण फेसबुक किंवा ट्विटरचा वापर तर नक्कीच करत असाल. फेसबुक आणि ट्विटरवर टाकलेले स्टेटस अपटेट्स हे त्यावेळी आपल्या मनात काय चालू होते? याचे प्रतिबिंबच असतात. तेंव्हा एक वर्षापूर्वी आपल्या मनात काय चालू होते? याचा अंदाज आपल्याला एक वर्षापूर्वीचे स्टेटस अपडेट्स आणि ट्विट्स पाहून येऊ शकतो. पण एक वर्षापूर्वीचे स्टेटस अपडेट आणि ट्विट शोधून काढणे हे तसं अवघड काम आहे. पण ‘टाईमहॉप’ (Timehop) ने हे अवघड काम आपल्यासाठी सोपं केलं आहे.
एक वर्षापूर्वी आपण काय करत होतात? (फेसबुक आणि ट्विटर) |
टाईमहॉपच्या माध्यमातून आपण फेसबुक, ट्विटर बरोबरच फोरस्क्वेअर आणि इंन्स्टाग्रामवर १ वर्षापूर्वी काय करत होतो? हे देखील जाणून घेऊ शकतो. फेसबुकच्या सहाय्याने आपणास टाईमहॉपमध्ये प्रवेश करता येईल. त्यानंतर Settings मध्ये जाऊन आपल्याला आपले ट्विटर, फोरस्क्वेअर आणि इन्स्टाग्रामचे खाते टाईमहॉपशी जोडता येईल. भारतीय प्रमाणवेळ (Timezone) निवडून बदल जतन करा (Save Changes).
टाईमहॉपच्या मुख्य पानावर एक वर्षापूर्वी आपण नेमका कोणता स्टेटस अपडेट टाकलेला? किंवा नेमकं कोणतं ट्विट केलेलं? कोणते छायाचित्र टाकलेले? ते दिसू लागेल. यापैकी आपल्या आवडीचे स्टेटस आपण Favorites मध्ये साठवून देखील ठेवू शकाल. जर आपण एक वर्षापूर्वी कोणताही अपडेट टाकला नसेल, तर मात्र आपणास काहीही दिसणार नाही. १ वर्षापूर्वी आपण काय स्टेटस टाकलेला? हे पाहण्यासाठी आपणास वेळोवेळी ‘टाईमहॉप’ या साईटवर येण्याची काही एक गरज नाही. एक वर्षापूर्वीचे आपले अपडेट्स आपणास आपोआप दररोज सकाळी आपल्या ईमेल पत्त्यावर टाईमहॉप मार्फत मिळत राहतील. टाईमहॉपची ही सेवा मनोरंजक तर आहेच, पण आपल्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.