ड्रॉपबॉक्स क्लाऊड स्टोअरेज

खादी डिजिटल फाईल साठवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणती माध्यमं वापरतो? संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड इत्यादी. याव्यतिरीक्त आपण ती फाईल इंटरनेटवर ऑनलाईन साठवू शकतो. त्यासाठी काही ऑनलाईन सेवांची मदत घ्यावी लागते, उदाहरणार्थ, गुगल डॉक्स, मिडिया फायर, इत्यादी. ड्रॉपबॉक्स (Dropbox) ही एक त्याच प्रकारातील पण थोडंसं वेगळेपण असलेली एक साईट आहे. ही क्लाऊड स्टोअरेज वेबसाईट आहे. ड्रॉपबॉक्सचा आपल्याला नेमका उपयोग कसा होऊ शकतो? ते आज आपण पाहणार आहोत.

कल्पना करा की आपण एक अगदी महत्वपूर्ण फाईल आपल्या संगणकावर साठवली आहे आणि काही कारणाने ती फाईल आपल्या संगणकाच्या हार्ड डिस्क वरुन उडाली, तर काय होईल? किंवा आपल्या मोबाईलमधील मेमरी कार्ड करप्ट झाले, तर आपल्या मोबाईलमधील फोटोंमध्ये साठलेल्या आपल्या आठवणींचे काय? अशावेळी आपल्या महत्वपूर्ण फाईल्सचा बॅकअप आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि नेमकं हेच काम आपल्याला ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अगदी सहजगत्या आणि यशस्वीरीत्या करता येतं.
ड्रॉपबॉक्स चिन्ह
ड्रॉपबॉक्स नेमकं कसं काम करतं? ते आता आपण पाहूयात.
ड्रॉपबॉक्स ही एक साईट आहे आणि ती या पत्यावर आपल्यासाठी उपलब्ध आहे – dropbox.com. इंटरनेट वेब ब्राऊजरच्या माध्यमातून आपण या साईटवरील सुविधांचा ऑनलाईन लाभ घेऊ शकतो. याव्यतिरीक्त त्या साईटवर गेल्यानंतर आपल्याला ड्रॉपबॉक्स आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करण्यासंदर्भात एक लिंक दिसून येईल. त्या लिंकचा वापर करुन ड्रॉपबॉक्स आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन घ्या. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ड्रॉपबॉक्स वापरण्यासाठी आपल्याला वेब ब्राऊजरची आवश्यकता नाही. आपण ड्रॉपबॉक्स आपल्या संगणकावर इंन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्या संगणकावरील एखाद्या फोल्डर प्रमाणे काम करेल. अगदी हीच गोष्ट आपल्या लॅपटॉपलाही लागू होते.
आपण ज्याप्रमाणे ड्रॉपबॉक्स आपल्या संगणकावर इंन्स्टॉल केलं आहे, त्याचप्रमाणे आपण ते आता आपल्या मोबाईलवर घेणार आहोत. त्यासंदर्भातील लिंकही त्या साईटवर देण्यात आली आहे, शिवाय आपण जर अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर ते अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉईड मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ड्रॉपबॉक्सचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉईड, आय फोन, आय पॅड, ब्लॅकबेरी या प्लॅटफॉर्मवर आधारीत मोबाईल फोन्ससाठी उपलब्ध आहे. ड्रॉपबॉक्स अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाईलवर घेतल्यानंतर ते आपल्या मोबाईलमधील व्हर्च्युअल मेमरी कार्ड प्रमाणे काम करेल. 
ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून २ जी.बी. इतकी स्टोअरेज स्पेस आपल्याला मोफत मिळते. ड्रॉपबॉक्स कसे काम करते? यासंदर्भातील त्या साईटवर असलेले टिटोरीअल आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला भेट म्हणून ०.२५ जी.बी. ची अतिरीक्त स्टोअरेज स्पेस मोफत भेट मिळते. म्हणजेच आपण जर ड्रॉपबॉक्सचा वापर केला, तर २.२५ जी.बी. चे व्हर्च्युअल मेमरी कार्ड आपल्याला अगदी १००% मोफत मिळते, असं म्हणायला काही हरकत नाही. याशिवाय आपण जर आपल्या मित्रांना ड्रॉपबॉक्स वर आमंत्रण दिलंत, ते ड्रॉपबॉक्सचे यशस्वी सदस्य झाले आणि त्यांनी ड्रॉपबॉक्सचे अ‍ॅप्लिकेशन आपल्या संगणकावर डाऊनलोड केलं, तर आपल्याला प्रत्येक सदस्यामागे ०.५ जी.बी. ची अतिरीक्त स्टोअरेज स्पेस मिळते. अशाप्रकारे आपण जास्तितजास्त ३२ लोकांना ड्रॉपबॉक्सचे यशस्वी सदस्य बनवून १६ जी.बी. पर्यंत अतिरीक्त स्टोअरेज स्पेस मोफत मिळवू शकता. याचाच अर्थ असा की, आपणाला १६ + २.२५ = १८.२५ जी.बी पर्यंतचे व्हर्च्युअल मेमरी कार्ड अगदी मोफत मिळू शकते. आणि या आभासी मेमरी कार्डचा मुख्य उपयोग म्हणजे हे कार्ड कधी करप्ट होत नाही. उलट हाच ड्रॉपबॉक्स या सेवेचा मुख्य उद्देश आहे, की आपला डाटा कधीही नष्ट होऊ नये.
आता सांगण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट. आपण एखादी फाईल आपल्या संगणकावरील ड्रॉपबॉक्स अ‍ॅप्लिकेशनच्या फोल्डरमध्ये टाकलीत, की ती लगेच आपल्या मोबाईलवरील ड्रॉपबॉक्स या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध होते. याव्यतिरीक्त ती फाईल त्यांच्या ऑनलाईन साईटवर देखील आपल्याला कायम स्वरुपी उपलब्ध  रहाते. अशाप्रकारे समजा जर आपल्या मोबाईलवरील मेमरी कार्ड खराब झाले, तर ड्रॉपबॉक्स मध्ये टाकलेली फाईल आपल्याला संगणकावरील ड्रॉपबॉक्समध्ये उपलब्ध रहाते. किंवा समजा आपला लॅपटॉप जर खराब झाला, तर ड्रॉपबॉक्स मध्ये टाकलेली फाईल आपल्या मोबाईलवर आपल्यासाठी उपलब्ध रहाते. आणि यापैकी काहीच काम करत नसेल, तर शेवटी ड्रॉपबॉक्सची ऑनलाईन सेवा आपल्याला कायमस्वरुपी उपलब्ध असतेच. अशाप्रकारे ड्रॉपबॉक्स ही एक क्लाऊड स्टोअरेज सिस्टिम आहे. कारण या सुविधेचा उपयोग आपण अगदी कुठेही असताना करु शकतो. उदाहरणार्थ, आपल्या घरी, ऑफिसमध्ये, किंवा प्रवासामध्ये आपल्या मोबाईलवर, आपल्या महत्वपूर्ण फाईल्स सतत आपल्या बरोबर राहतात.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.