नवीन ‘ओपेरा मिनी’ मोबाईल वेब ब्राऊजर
‘ओपेरा मिनी’ शिवाय मोबाईलवर इंटरनेट पाहण्याची कल्पना करणं हे काहिसं अशक्यच आहे. आपल्या अत्यंत दर्जेदार अशा मोबाईल वेब ब्राऊजरच्या सहाय्याने ओपेराने आजवर जगभरातील असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. आपली हीच यशस्वी परंपरा कायम ठेवत ‘ओपेरा मिनी’ आता आपली ५ वी आवृत्ती सर्वांसाठी खुली करण्याच्या तयारीत आहे. या नवीन सॉफ्टवेअरची सध्या बीटा (म्हणजेच अजूनही ते या सॉफ्टवेअरची चाचणी घेत आहेत.) आवृत्ती उपलब्ध आहे. आणि त्याचं नाव आहे ‘ओपेरा मिनी ५ बीटा २’.
या नवीन ओपेराचे काही ठळक फिचर्स खालिलप्रमाणे आहेत.
१. नवीन ओपेराच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मोबाईलवर संगणकाप्रमाणेच एकाच वेळी अनेक वेबसाईट्स पाहू शकणार आहात. ही सोय संगणकाच्या ब्राऊजरमध्ये टॅबच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येते. तशीच ती ‘ओपेरा मिनी’ वरही टॅबच्या स्वरुपात देण्यात आली आहे.
२. संगणकावर ओपेरा, क्रोम, सफारी वापणा-यांना ‘स्पिड डायल’ म्हणजे काय ते माहित असेलच. अगदी अशीच ‘स्पिड डायल’ ची सोय नवीन ‘ओपेरा मिनी’ वरही देण्यात आली आहे. (वरील चित्र पहा.)
३. आधी ‘ओपेरा मिनी’ वरुन एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी ‘लिंक’वर क्लिक केले की मोबाईलचा डिफॉल्ट वेब ब्राऊजर ओपन व्हायचा आणि मग त्या सॉफ्टवेअरचे डाऊनलोडिंग सुरु व्हायचे, पण आता नवीन ‘ओपेरा मिनी’ मध्ये ही समस्या जाणवणार नाही. यात समाविष्ट असलेल्या ‘डाऊनलोड मॅनेजर’ च्या सहाय्याने तुम्ही चालू डाऊनलोडिंग पॉज अथवा रिझ्युम देखील करु शकाल.
४. नवीन ‘ओपेरा मिनी’ च्या सहाय्याने तुम्ही एखाद्या ‘वेब पेज’ मध्ये हवा असलेला विशिष्ट शब्द, हवे असलेले विशिष्ट वाक्य शोधू शकाल. जसं आपण आपल्या संगणकावर Ctrl + f वापरुन करतो.
५. याशिवाय पासवर्ड मॅनेजर, अधिक गती इ.इ. अनेक फिचर्स आपल्याला ‘ओपेरा मिनी’ मध्ये पहायला मिळतील.
ओपेराची नवीन आवृत्ती आली असली, तरीही सध्या ती बीटा अवस्थेत आहे. त्यादृष्टीने ‘ओपेरा मिनी’ची आजच्या घडची पक्की आवॄत्ती ‘ओपेरा मिनी ४’ देखील आपल्याला उपयुक्त ठरु शकेल. आजकाल अनेक मोबाईल वेब ब्राऊजर्स उपलब्ध आहेत. अगदी ‘मोझिला फायरफॉक्स’ नेही या क्षेत्रात पाऊल टाकल्याचं दिसून येईल. पण तरीही आत्ताचा विचार केला, तर ‘ओपेरा मिनी’ची सर बाकी दुस-या कोणत्याही ‘मोबाईल वेब ब्राऊजर’ला येत नाही… ओपेरासोबत मोबाईलवर इंटरनेट पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.