पैसे कमवण्यासाठी लेख कुठे लिहावे?
इंटरनेटवरुन पैसे कमवण्यासाठी लिहिण्याची आवड असणं आवश्यक आहे, हे आपण मागच्यावेळी पाहिलं. आता आपण हे लेख कुठे लिहिता येतील? ते पाहणार आहोत. पैसे कमवण्यासाठी नुसतं लिहून चालत नाही, तर हे लेख एका विशिष्ट पद्धतीत लिहिणं आवश्यक आहे. तसं केल्याने आपले लेख सर्च इंजिन मध्ये वर येतात आणि आपल्या लेखांस अधिक वाचक मिळतात. जितके अधिक वाचक आपल्या लेखांना मिळतील, तितके अधिक पैसे आपल्याला मिळू शकतात. लेखन करुन पैसे कमवण्यामागे ‘वाचकसंख्या’ हे एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण आहे.
ब्लॉग: 2know.in हा एक इंटरनेट-तंत्रज्ञानविषयक माहिती देणारा एक ब्लॉग आहे. आपणही अशा प्रकारे एक ब्लॉग तयार करु शकाल. ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा? यासंदर्भातील लेख मी लिहिला होता. त्या लेखाची मदत आपल्याला घेता येईल. याव्यतिरीक्त वर्डप्रेसवर देखील आपल्याला आपला ब्लॉग सुरु करता येईल. पण वर्डप्रेसवरील ब्लॉगवरुन पैसे कमवण्यासाठी आपलं स्वतःचं होस्टिंग असणं आवश्यक आहे. आपल्याला जर ब्लॉगर किंवा वर्डप्रेसवर ब्लॉग तयार करण्यासंदर्भात काही समस्या असेल आणि आपल्याला सर्व सुविधांनी युक्त, सुसज्ज असा ब्लॉग हवा असेल, तर mail@2know.in वर संपर्क करा. मी तो आपल्याला अगदी कमी किमतीत तयार करुन देईन.
रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्स:
रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्सवर आपण आपले लेख लिहू शकतो. पण त्या तिथे लेख लिहिण्याचे काही नियम आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे आपले लेख हे इंग्रजी भाषेतच असायला हवेत. आपले लेख यापूर्वी कधीही, कुठेही प्रकाशीत झालेले नसावेत. आपल्या लेखांची लांबी ५०० शब्दांपर्यंत असावी. त्यामध्ये आपल्याकडे अधिकार असणार्या चित्रांचा सुयोग्य असा वापर केलेला असावा. प्रत्येक रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईटचे नियम जरी वेगळे असले, तरी सर्वसाधारणपणे ते असे असतात. हे सर्व नियम महत्त्वाचे आहेत कारण नियमांच्या या चौकटीत आपण लेख लिहू लागलात तर ते अधिक प्रोफेशनल, चांगले वाटतात, तसेच सर्च इंजिनमध्येही वर येतात. आपला लेख जर नियमांच्या चौकटीत बसत नसेल, तर आपला लेख काढून टाकण्यात येतो.
इंटरनेटवर लेखन करुन पैसे कमवण्यासाठी आपण रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईटपासून सुरुवात करावी असं माझं आग्रही मत आहे. तिथे दिलेल्या नियमांच्या चौकटीत आपण तंत्रशुद्ध लेखनाचे धडे गिरवू शकाल. अशा वेबसाईट्सवर आपल्याला या क्षेत्रातील इत्थंभूत माहिती मिळते आणि खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे माझं असं मत आहे की आपण रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्स पासून लेखनास सुरुवात करावी आणि त्यानंतर आपला ब्लॉग सुरु करावा. रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्स आपल्या मिळतकतीच्या ५०-६०% भाग जरी स्वतःजवळ ठेवत असली, तरी त्याबदल्यात तितकेच अधिक वाचक देखील ती आपल्याला मिळवून देते. आपल्याला लेखनासाठी आवश्यक तंत्रज्ञानापासून ज्ञानापर्यंत सर्व काही पुरवलं जातं.
आता आपण काही रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्सची माहिती घेऊ. या सर्व रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्समध्ये आपण नक्की सहभागी व्हा आणि केवळ सहभागी होऊन थांबू नका तर नेटाने अनेक लेख लिहा. काही कालावधीतच आपल्याला पैसे मिळू लागतील.
इंटरनेटवर लेख लिहून पैसे कमवा |
हबपेजेस (Hubpages): ही माझी सर्वांत आवडती रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट आहे. या साईटवर लिहिलेला आपला लेख समजा १० वेळा पाहिला गेला, तर त्यापैकी ६ वेळा (६०%) त्या लेखामध्ये आपल्या जाहिराती दिसतात, तर ४ वेळा हबपेजेसच्या जाहिराती दिसतात. अशाप्रकारे मिळकत विभागली जाते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या वेबसाईटला रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट असे म्हणतात. आपले जर अॅडसेन्सचे अकाऊंट नसेल, तर या साईटवर ईबे (ebay) च्या सहाय्याने आपण पैसे कमवू शकाल.
विझली (Wizzley): विझली ही एक मला हवी होती तशी रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट आहे. या साईटवरुन पैसे कमवण्यासाठी आपल्याजवळ अॅडसेन्सचे अकाऊंट असण्याची आवश्यकता नाही. आपण आपले ‘चिटीका’चे जाहिरात अकाऊंट अॅडसेन्सच्या बदल्यात वापरु शकाल. चिटीकाचे खाते काढणे हे अॅडसेन्स इतके अवघड नाही, ते लगेच मिळते. याव्यतिरीक्तही पैसे कमविण्याची अनेक साधने विझलीवर उपलब्ध आहेत. आपले १०० लेख लिहून पूर्ण होईपर्यंत ते आपल्याबरोबर ५०% मिळकत वाटून घेतात, त्यानंतर मात्र आपल्याला मिळकतीचा ६०% भाग मिळत रहातो.
झूजावा (Zujava): ही एक नवी रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट आहे. या साईटचं वैशिष्ट्य म्हणजे या साईटच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे अॅडसेन्सचे खाते असण्याची गरज नाही. झूजावा आपल्यासोबत एकून मिळकतीचा ५०% भाग वाटून घेईल. तेंव्हा आपल्याकडे जर अॅडसेन्सचे खाते नसेल, पण अॅडसेन्सच्या माध्यमातून कमवायचे असेल, तर या साईटवर लिहायला हरकत नाही.
या रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्सवर आपण आपले लेख लिहू शकाल आणि त्यांपासून चांगले पैसे देखील कमवू शकाल. मी स्वतः अशा वेबसाईट्सच्या माध्यमातून दरमहा चांगले रुपये कमवत आहे. या रेव्हेन्यू शेअरींग वेबसाईट्सवर खूप काही शिकायला मिळतं, आणि त्यानंतर आपण आपला स्वतःचा ब्लॉग तयार करुन त्यावर लिहायला सुरुवात करण्यास देखील हरकत नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.