फेसबुक पेज ट्विटरशी कसे जोडावे?
आपलं फेसबुक पेज ट्विटरशी कसं जोडता येईल? ते आज आपण पाहणार आहोत. खरं तर आपली फेसबुक प्रोफाईलही अशाप्रकारे ट्विटरशी जोडता येते. पण मी आज या इथे फेसबुक पेजच्या अनुषंगाने सर्व माहिती सांगत आहे. हा फरक या इथे लक्षात घ्यावा. उदाहरणार्थ, माझ्या 2know.in या ब्लॉगचे फेसबुक पेज या इथे आहे – facebook.com/2know.in. अनेक ब्लॉगर आपल्या ब्लॉगवरील लेखांचा प्रचार करण्यासाठी फेसबुक पेजचा वापर करता. याव्यतिरीक्त ट्विटर हे देखिल त्याचप्रकारचं एक माध्यम बनू शकतं. त्यामुळेच मी देखील माझ्या 2know.in या साईटचे ट्विटरवर पान उघडले आहे, ते या इथे आहे – twitter.com/2knowin.
ब्लॉगवर मोठ्या कष्टाने एखादा लेख लिहिणं, मग त्या लेखाची माहिती फेसबुकवर देणं, तिथून परत ट्विटरवर लॉग-इन होऊन त्या तिथे आपल्या ब्लॉगवरील नवीन लेखाबद्दल सांगणं, हे सारं काही करण्यात बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आपण जर आपल्या ब्लॉगचे फेसबुक पेज ट्विटरशी जोडले, तर आपला काही वेळ वाचण्यात नक्कीच मदत होऊ शकते. कारण त्यानंतर आपण जेंव्हा जेंव्हा फेसबुक पेजवर आपला स्टेटस अपडेट कराल, तो स्टेटस अपडेट ट्विटरवर आपोआप ट्विट होईल. त्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे ट्विटरवर जाऊन ट्विटरवरील आपले खाते सांभाळत बसण्याची गरज उरणार नाही. आपण आपल्या फेसबुक पेजवर लक्ष केंद्रित केलंत तरी चालेल.
तर आपले फेसबुक पेज ट्विटरशी कसे जोडता येईल? ते आता आपण पाहूयात. अर्थात आपल्या ब्लॉगचे फेसबुक पेज आणि ट्विटर खाते असणे त्यासाठी आवश्यक आहे. आपल्या ब्लॉगचेच ट्विटर खाते असावे असं काही नाही, आपले स्वतःचे वैयक्तिक ट्विटर खाते असेल तरी चालेल.
आपल्या फेसबुक पानाचा दुवा |
नेहमीप्रमाणे युजरनेम आणि पासवर्ड देऊन फेसबुकमध्ये लॉग इन करा. आता आपल्यासमोर फेसबुकचे मुख्य पान असेल. उजव्या बाजूला वरच्या कोपर्यात Home च्या शेजारी जो खालील दिशा दाखवणारा बाण (Downward Arrow) दिसतोय, त्यावर क्लिक करा. काही पर्याय घेऊन एक यादी (Drop Down Menu) आपल्यासमोर उघडली जाईल. इथे आपल्या ब्लॉगच्या फेसबुक पेजचे नाव असेल, त्यावर क्लिक करा. आता आपण आपल्या फेसबुक पेजच्या दृष्टिकोनातून फेसबुक वापरत आहात. जसं की, आत्ता आपले फेसबुक पेज हेच फेसबुकवरील आपली प्रोफाईल आहे.
आता जे लोक फेसबुक पेजची नवीन आवृत्ती वापरत आहेत, त्यांनी Manage वर क्लिक करावे. त्यानंतर एक यादी उघडली जाईल, त्यातून Edit Page वर क्लिक करावे. आणि जे लोक फेसबुक पेजची जुनी आवृत्ती वापरत आहेत, त्यांनी थेट आपल्या पेजच्या नावाच्या उजव्या बाजूला असलेला Edit Page हा पर्याय निवडावा. नव्याने उघडलेल्या पानावरील डाव्या बाजूच्या साईटबारमध्ये असलेल्या पर्यायांमधून Resources ची निवड करावी. इथे Connect with people मध्ये Link your Page to Twitter असा पर्याय आपल्याला दिसेल (खालील चित्र पहा). त्यावर क्लिक करा. आता आपल्याला ‘फेसबुक’ हे आपल्या पेजच्या नावाने न वापरता, आपल्या स्वतःच्या नावाने वापरण्याबाबत विचारणा होईल. ‘Continue as (इथे तुमचे नाव असेल)’ वर क्लिक करा. (थेट दुवा – facebook.com/twitter.)
आता आपण फेसबुक आणि ट्विटर जोडण्यासंदर्भातील पानावर आला आहात. इथे आपल्या फेसबुक प्रोफाईलसहीत आपण फेसबुकवर तयार केलेल्या सर्व पानांची यादी असेल. आपल्या ब्लॉगच्या फेसबुक पेजच्या नावासमोरील Link to Twitter या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Authorize Facebook to use your account? अशी विचारणा करणारे ट्विटरवरील पान आपल्या समोर आले असेल. त्या पानावर आपल्या ट्विटर खात्याचे युजरनेम आणि पासवर्ड देऊन Authorize app वर क्लिक करा. अशाप्रकारे आपले फेसबुक पेज आता ट्विटरशी जोडले गेले आहे.
यानंतर आपण जेंव्हा आपल्या फेसबुक पेजवर एखादा अपडेट टाकाल, तेंव्हा तो आपल्या ट्विटर खात्यावरदेखील आपोआप ट्विट होईल. अगदी अशाचप्रकारे आपण आपली फेसबुक प्रोफाईलदेखील ट्विटरशी जोडू शकाल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.