फेसबुक वर्तमानपत्र
फेसबुकचे एका खाली एक येत जाणारे अपडेट्स पाहून जर आपल्याला कंटाळा आला असेल, तर आपल्यासाठी एक वर्तमानपत्र चांगली बातमी घेऊन आले आहे. या वर्तमानपत्राचे नाव आहे PostPost. या साईटच्या सहाय्याने फेसबुकचे अपडेट्स घेऊन येणारे मुख्य पान आपल्याला वर्तमानपत्राच्या स्वरुपात दिसू लागेल. मला स्वतःला ही कल्पना फारच आवडली. आणि फेसबुकला वर्तमानपत्राच्या स्वरुपात पाहणे हे दुसरे कोणतेही वर्तमापत्र वाचण्यापेक्षा अधिक आकर्षक आहे. कारण या वर्तमानपत्रातील बातम्या आपलं देणंघेणं नसलेल्या लोकांशी संबंधीत नसून, आपले मित्रच या वर्तमानपत्रातील बातम्यांचे मुख्य स्त्रोत आहेत. आपल्या आवडीच्या फेसबुक पानांचे अपडेट्सही बातम्यांच्या स्वरुपात आपल्याला या वर्तमानपत्रातून वाचता येतील. वेळोवेळी नवनवीन बातम्या घेऊन येणारे हे वर्तमानपत्र लावण्यास काही हरकत नाही.
फेसबुक वर्तमानपत्र |
PostPost या साईटवर जाऊन आपल्या फेसबुक खात्याच्या सहाय्याने लॉग इन व्हा. त्यासाठी त्या साईटच्या मुख्य पानावरील Connect with Facebook चा उपयोग करा. त्यानंतर आपल्या फेसबुक खात्याचे मुख्य पान आपल्याला वर्तमानपत्राच्या स्वरुपात दिसू लागेल. या वर्तमानपत्राचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वर्तमानपत्रातील बातम्यांवर आपण जागच्याजागी प्रतिक्रिया देऊ शकतो. याशिवाय या वर्तमानपत्रातील बातम्या आपण आपल्या मित्रांबरोबर शेअर करु शकतो. एका विशिष्ट प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी वरच्या बाजूस आपल्यासमोर all व्यतिरिक्त links, videos, photos असे पर्याय ठेवण्यात आले आहेत. यांवर क्लिक करुन आपण त्या त्या स्वरुपाच्या बातम्या पाहू, वाचू शकतो. नको असलेल्या फेसबुक पानांच्या आणि मित्रांच्या बातम्याही आपण या वर्तमानपत्रातून रद्दबातल करु शकतो. एकंदरीत PostPost हे आपल्यासाठी एक चांगलं सनसनीखेज फेसबुक वर्तमानपत्र ठरु शकेल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.