ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवा, शेड्यूल ब्लॉग पोस्ट
आजचा लेख हा 2know.in वरील १५० वा लेख आहे. ‘Blogger Stats’ अनुसार पर्वा दिवशी 2know.in चे २ लाख पेजव्हूज पूर्ण झाले. 2know.in सुरु होऊन आता दीड वर्षांचा कालावधी झाला आहे. आजचा आपला छोटासा, साधा-सोपा विषय आहे, ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ कशी ठरवायची? ..एकदा ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यानंतर आपण Publish वर क्लिक करतो आणि मग ब्लॉग पोस्ट लगेच आपल्या ब्लॉगवर दिसू लागते. पण आपल्याला जर ब्लॉग पोस्ट लगेच आपल्या ब्लॉगवर दिसावे असं वाटत नसेल, भविष्यात कधीतरी आपल्याला ती प्रकाशीत करायची असेल, तर ते कसं करता येईल? हे आज आपण पाहणार आहोत. यालाच ब्लॉग पोस्ट शेड्यूल (Schedule) करणे असं म्हणतात. याचा वापर करुन आपण पूर्वप्रकाशित ब्लॉगची तारीख आणि वेळ देखिल बदलू शकतो. यावरुन मला गुगलच्या जीमेल या ईमेल सेवेचा मेल शेड्यूल करण्याबाबतचा मी मागे लिहिलेला लेख आठवला. तो आपल्याला इथे वाचायला मिळेल.
ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ कशी ठरवता येईल?
ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवणं हे अगदी सोपं आहे. त्याबाबतची माहिती मी खाली देत आहे.
१. आपले गुगलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरुन blogger.com मध्ये प्रवेश करा.
नवीन ब्लॉग पोस्ट तयार करा |
२.चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या ब्लॉग अंतर्गत नवे ब्लॉग पोस्ट तयार करा अथवा ‘ड्राफ्ट’ म्हणून सेव्ह केलेले ब्लॉग पोस्ट उघडा.
३. ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी जी जागा दिलेली आहे, त्या जागेच्या उजव्या बाजूस आपल्याला Label च्या खाली Schedule (शेड्यूल) नावाचा पर्याय दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.
ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची तारीख आणि वेळ ठरवा |
४. Schedule अंतर्गत दोन पर्याय आहेत. Automatic आणि Set date and time. यापैकी Automatic हा पर्याय आधीपासूनच निवडला गेलेला असेल. याचा अर्थ असा आहे की, आपण ब्लॉग पोस्ट लिहून Publish वर क्लिक केल्यास, लगेच ब्लॉगर ब्लॉग पोस्ट प्रकाशित होईल, आणि आपल्या ब्लॉगवर दिसू लागेल.
५. पण आपल्याला ब्लॉग पोस्ट आत्ता लगेच प्रकाशित करायची नसून, ती भविष्यात कधीतरी प्रकाशित करायची आहे, तेंव्हा Set date and time हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल.
६. इथे ब्लॉग पोस्ट प्रकाशची आपल्याला हवी असलेली ‘तारीख’ निवडा आणि त्यानंतर त्याखाली त्या तारखेस प्रकाशनाची ‘वेळ’ ठरवा. आणि सरतेशेवटी Done वर क्लिक करा.
७. ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यानंतर आता आपण जेंव्हा Publish वर क्लिक कराल, तेंव्हा आपला ब्लॉग हा आता लगेच प्रकाशित होणार नसून, आपण ठरवून दिसलेल्या तारीख आणि वेळेसच तो प्राकाशित होईल.
८. एखाद्या आधीपासूनच लिहिलेल्या आणि पब्लिश झालेल्या ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची तारीख आणि वेळ बदलण्यासाठी देखिल आपण Schedule (शेड्यूल) हा विभाग वापरु शकतो, आणि हव्या त्या ब्लॉग पोस्टची तारीख आणि वेळ बदलू शकतो.
एखादा ब्लॉगवरील लेख हा काळावर अवलंबून असू शकतो. उदाहरणार्थ, आपण आठवड्यापूर्वीच ‘मदर्स डे’ निमित्त एक ब्लॉग पोस्ट लिहिला आहे आणि आता तो आपल्याला मदर्स डे दिवशीच आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करायचा आहे. अशावेळी आपण ब्लॉग पोस्ट शेड्यूल करुन, ब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवू शकतो, जेणेकरुन आपला लेख हा ‘मदर्स डे’ दिवशीच आपोआप प्रकाशित होईल. ब्लॉग पोस्ट शेड्यूल करण्याचा असा एक चांगला उपयोग होऊ शकतो.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.