सर्व सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स एकत्र करा
आजकाल इतक्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स निघाल्या आहेत की काही विचारु नका! कोणीही उठवं की ब्लॉग काढवा, तसं अगदी कोणीही उठावं नी सोशल नेटवर्किंग वेबसाईट काढावी, असे प्रकार आजकाल मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. कारण या सा-या गोष्टी आता १-२-३ म्हणण्याइतक्या सोप्या झाल्या आहेत. त्या दुस-या ‘कोणीही उठावं’ प्रकारात मीही मध्यंतरी उठलो होतो, पण त्यासाठी कराव्या लागणा-या ‘प्रमोशन’चं शिवधनुष्य काही माझ्याच्यानं पेलवलं नाही. त्यामुळे मी ऊठलो कधी!? आणि बसलो कधी!? हे बाकी कोणालाच कायऽ… स्वतः मला देखील समजलं नाही. आत्ता याच आठवड्यात मराठी ब्लॉगर वर्तूळात दोन नवीन नेटवर्किंग साईट्सची भर पडत आहे, आता बघुयात त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश प्राप्त होतं ते… पण एक गोष्ट मात्र नक्की! की अशा प्रकारच्या साईट्स सांभाळणं हे काही एकट्या माणसाचं काम नाही आणि कोणत्याही गोष्टीच्या चांगल्या प्रमोशनसाठी आपला खिसा मोकळा करणं हे देखील फार गरजेचं असतं.
आपल्या मराठी वेबसाईट्स जालावर म्हणजेच या इंटरनेटवर शोधणं हेदेखील एक महाकठिण काम आहे, असं प्रथमदर्शनी कोणालाही वाटू शकतं, पण आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही आरामात असंख्य मराठी वेबसाईट्स शोधू शकाल. त्यासाठी असं करा…
१. आपल्या टॅबच्या/विंडोच्या ऍड्रेस बारमध्ये marathi असं टाईप करा.
२. आता त्यापुढे mati (माती) पासून world (वल्ड) पर्यंत काहीही वाट्टेल ते टाईप करा आणि त्याला .com/.org/.net जोडा, तुम्हाला आपली मराठी वेबसाईट सापडलीच म्हणून समजा. (आत्ताच चेक केलं… मराठी लोक अजून ‘आकाशगंगेपर्यत’ पोहचलेले नाहीत. अरे होऽऽऽ पण त्यापलिकडे म्हणजे आपले ‘मराठीब्लॉगविश्व’ आहेच की! यात मराठी आणि विश्वाच्या मध्ये फक्त ब्लॉग आला इतकंच!)
बरं हे सगळं जाऊ दे! आपण बोलत होतो ते सोशल नेटवर्किंग साईट्सबद्दल… कदाचीत आपल्याला माहितच असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, power.com या इथे आपण जगात वापरले जाणारे काही प्रमुख सोशल नेटवर्कस् एकत्रितरित्या जोडून वापरु शकतो. त्यासाठी तुम्हाला power.com वर वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर गुगलचे, ऑरकुटचे सभासद असाल तर त्यांसाठी वापरला जाणारा ई-मेल आय.डी. (युजरनेम) आणि पासवर्ड तुम्ही power.com साठी देखील वापरु शकाल. याशिवाय hi5, twitter, linkedin, myspace यांसाठी वापरली जाणारी लॉगइन इंफॉरमेशन देखील तुम्ही power.com मध्ये शिरण्यासाठी वापरु शकाल.
पॉवर.कॉम वर आपण ऑर्कुट, हाय५, ट्विटर, लिंक्ड्इन, मायस्पेस असे सर्व प्रमुख सोशल नेटवर्कस् एकत्र जोडू शकता. यात प्रामुख्याने उणीव भासते ती फेसबुकची. मध्यंतरी फेसबुकच्या परवानगी शिवाय फेसबुक मधील माहिती पॉवर.कॉम ने वापरली, म्हणून त्यांच्यात काही न्यायालयीन वाद सुरु असल्याचे माझ्या ऎकिवात होते. पण आजच्या घडीला फेसबुकचा पॉवर.कॉम मध्ये समावेश होत नाही हे मात्र नक्की! बाकी या वेबसाईटची काय वॆशिष्ट्ये आहेत, ती तुम्ही स्वतःच आजमावून पहावीत, म्हणजे प्रत्यक्ष वापर करताना सारं काही नीट समजेल. शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे… जर तुमच्या कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये ऑरकुटवर किंवा दुस-या एखाद्या सोशल नेटवर्कवर बंदी असेल, तर ही चोरवाट तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.