सॉफ्टवेअरची निवड कशी करावी?

संगणकावर विविध प्रकारचे सॉफ्टवेअर घेतल्याने आपल्या संगणकाची उपयुक्तता वाढते. इंटरनेटवर निरनिराळ्या वैशिष्ट्यांची अनेकानेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्यातून दर्जेदार, विश्वासू आणि अधिक चागलं सॉफ्टवेअर निवडणं हे तसं अवघड काम आहे. त्यामुळे आज आपण अशा काही साध्या सोप्या गोष्टी पाहणार आहोत, ज्यांचा उपयोग करुन आपल्याला योग्य त्या सॉफ्टवेअरची निवड करणं सोपं जाईल.

आपल्या संगणकावर विविध प्रकारचे उपयोगी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी विश्वसनिय अशाच साईटची मदत घ्यायली हवी. त्यादृष्टीने मी CNET च्या डाऊनलोड.कॉम (download.com) या साईटची मदत घेतो. या साईटवर सर्व प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. Windows Software, Mac Software, Mobile Apps, Web Apps, अशी त्या साईटवर वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातून आपल्या आवश्यकतेनुसार आपण एखाद्या सॉफ्टवेअरचा शोध घेऊ शकतो.
या साईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला सर्वाधिक प्रसिद्ध सॉफ्टवेअर्सची यादी दिसून येईल. या यादीच्या शेवटी See all most popular software नावाचा एक दुवा असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथील प्रसिद्ध सॉफ्टवेअर्सची विस्तृत माहिती मिळेल. यापैकी जे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर नाहीये आणि ज्याची आपल्याला गरज आहे, अशा सॉफ्टवेअरची निवड करा आणि ते आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या.

एखादे सॉफ्टवेअर संगणकावर डाऊनलोड करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी
एखाद्या सॉफ्टवेअरची निवड करत असताना एडिटर्सनी दिलेल्या रेटिंगपेक्षा, ते सॉफ्टवेअर ज्यांनी प्रत्यक्ष वापरलं आहे, त्यांच्या रेटिंगला (User rating) अधिक महत्त्व देणं हे योग्य ठरतं. याशिवाय ते सॉफ्टवेअर आत्तापर्यंत किती लोकांनी डाऊनलोड केलं आहे, त्यावरुन त्या सॉफ्टवेअरची लोकप्रियता समजण्यास मदत होते. कारण जे सॉफ्टवेअर लोकांना भावतं तेच अधिक वेळा डाऊनलोड केलं जातं. त्यानंतर सांगायचं झालं तर, एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यापूर्वी त्या सॉफ्टवेअरबाबत वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हे अधिक उपयुक्त ठरतं. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ याप्रमाणे अनेकदा एखाद्या सॉफ्टवेअरमागे निरर्थक वेळ या प्रतिक्रिया वाचल्याने वाया जात नाही. 
डाऊनलोड.कॉम या साईटचा संदर्भ घेऊन जरी मी हे सारं काही सांगत असलो, तरी कोणत्याही सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशनशी निगडीत साईट्सबाबत आपण हेच सांगू शकतो. सॉफ्टोनिक.कॉम (en.softonic.com) ही देखील सॉफ्टवेअर मिळविण्यासाठी एक चांगली साईट आहे. या साईटवर सुद्धा वर सांगितलेल्या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी. अँड्रॉईड मार्केट मधून एखादे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर घेत असताना देखील या काही साध्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टींची मदत होते.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.