स्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल?

पला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा? ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय? ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात वायरशिवाय हवेतून ब्रॉडबँड इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी आपल्याला वाय-फाय राऊटरची गरज भासते. हे वाय-फाय राऊटर बाजारात स्वस्तात विकत मिळतं. आपल्याला Flipkart वर ते कमीतकमी दरात घरपोच मिळून जाईल. आणि कोणतीही चिंता न करता ऑनलाईन खरेदी करा. मी माझा स्वतःचा मोबाईल ऑनलाईनच विकत घेतला आहे. पावती, वॉरंटी, वस्तू असं सगळं काही अगदी व्यवस्थित घरपोच मिळतं. शिवाय कुरीअरचा कोणताही खर्च आपल्याला ‘करावा लागत नाही’. याबाबत सांगण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे फार विषयांतर व्हायला नको म्हणून मी हे सर्वकाही पुढील लेखात अगदी विस्ताराने सांगेन. आपण आपल्या मूळ लेखाकडे वळूयात. तर वाय-फाय च्या माध्यमातून इंटरनेटच्या एकाच कनेक्शनचा अनेकजण एकाच वेळी आपापल्या संगणक, लॅपटॉप, मोबाईलवर लाभ घेऊ शकतात. पण आपल्याला हे माहित आहे का? की, आपला स्मार्टफोन देखील वाय-फाय राऊटरचं काम करु शकतो!
वाय-फाय
वाय-फाय चे चिन्ह

मला स्वतःला खरं तर काही दिवसांपूर्वी हे माहित नव्हतं की, माझा स्मार्टफोन एक चालताफिरता मोबाईल हॉटस्पॉट बनू शकतो. त्यानंत अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये फिरत असताना मला त्याबाबत माहिती समजली. तिथे त्यासंदर्भातील एक अ‍ॅप्लिकेशन होते. पण ते अ‍ॅप्लिकेशन वापरण्यासाठी Root केलेल्या अ‍ॅन्ड्रॉईड फोनची आवश्यकता होती. माझा मोबाईल मी Root केलेला नाहीये. तेंव्हा मी ते  अ‍ॅप्लिकेशन अन्‌इन्स्टॉल करुन टाकलं. त्यानंतर माझ्या फोनच्या सेंटिंग्ज पहात असताना, मला त्यासंदर्भातला आधिपासूनच त्यात असलेला (इनबिल्ट) पर्याय सापडला. खरं तर हा पर्याय मी आधी पाहिलाच नव्हता असं नाही, पण त्यावेळी मला त्यासंदर्भात काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्याचा उपयोग काय? तेच मला माहित नव्हतं. पण यावेळी मात्र जेंव्हा तो पर्याय माझ्या नजरेसमोरुन गेला, लगेच मला त्याची उपयुक्तता दिसून आली.

स्मार्टफोन आणि पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट

ब्लूटुथ किंवा युएसबी केबलच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईल फोनचे इंटरनेट (मोबाईल डाटा कनेक्शन) एका संगणकावर वापरु शकतो. याला ‘टेदरींग’ (Tethering) असं म्हणतात. याशिवाय आपला स्मार्टफोन ‘पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट’मध्ये रुपांतरीत करुन, आपण आपल्या मोबाईलवर असलेले इंटरनेट एकाच वेळी पाच डिव्हाईसवर (संगणक, मोबाईल, इ.) देखील वापरु शकतो. 
आपण पाहिलं की ‘वाय-फाय’च्या माध्यमातून आपण वायरशिवाय एकाच वेळी अनेक डिव्हाईसवर इंटरनेटचा आनंद घेऊ शकतो. आपल्या स्मार्टफोन मधील पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉटचा पर्याय वापरला गेल्यानंतरही अगदी हाच उद्देश साध्य होणार आहे. आपण आपल्या स्मार्टफोनवर 3G कनेक्शन वापरत असाल, तर या गोष्टीचा आपण अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेऊ शकाल. कारण एकाचवेळी अनेक डिव्हाईसवर एकच इंटरनेट कनेक्शन वापरायचे असेल, तर अशा इंटरनेट कनेक्शनची गती अधिक असणं आवश्यक आहे.
आपल्याकडे जर अ‍ॅन्ड्रॉईड फोन असेल, तर Settings – Wireless and networks मध्ये आपल्याला Tethering & portable hotspot हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा. Portable Wi-Fi hotspot हा पर्याय निवडा. आणि त्यानंतर लगेच आपला मोबाईल एक पोर्टेबल वाय-फाय हॉटसॉट म्हणून काम करु लागेल. याबाबत मी माझ्या लॅपटॉप वर चाचणी करुन पाहिली आहे. अशाप्रकारे निर्माण झालेल्या वाय-फाय हॉटस्पॉटची रेंजही चांगली आहे. साधरणतः तीन खोल्यांच्या अंतराइतके स्मार्टफोनचे हे पोर्टेबल वाय-फाय काम करते. 
आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वाय-फाय हॉटस्पॉटचा, रेंजमध्ये येणार्‍या इतर अनोळखी लोकांनी वापर करु नये, असं जर आपल्याला वाटत असेल, तर Portable Wi-Fi hotspot settings मध्ये जा आणि Configure Wi-Fi hotspot वर क्लिक करा. त्यानंतर Security मधून WPA/WPA2 PSK हा पर्याय निवडा. खाली Password च्या ठिकाणी आपल्याला हवा तो पासवर्ड देऊन Save वर क्लिक करा. त्यानंतर आपल्या स्मार्टफोनच्या वाय-फाय हॉटस्पॉट रेंजमध्ये इतर डिव्हाईस जरी आले, तरी त्यांना आपलं इंटरनेट वापरायचं असेल, तर त्यासाठी आपण आत्ता दिलेल्या पासवर्डची गरज भासेल. अशाप्रकारे आपला वाय-फाय हॉटस्पॉट सुरक्षित राहिल.
मला अशा आहे आपल्याला या माहितीचा उपयोग झाला असेल. 2know.in ही साईट जर आपल्याला आवडत असेल, तर 2know.in बाबत आपल्या मित्र-परिवाराला आवर्जून कळवा आणि 2know.in चे फेसबुक पेज जॉईन करा.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.