स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत
आज मी स्मार्टफोनवर ‘मराठी टाईप करण्याची’ नव्हे, तर प्रत्यक्ष ‘मराठी लिहिण्याची’ ‘प्रचंड’ सोपी पद्धत सांगणार आहे! स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या प्रगतीतला एक मोठा अडसर दूर झाला आहे. परिणामी यापुढील काळात इंटरनेटवरील मराठी भाषेचा वावर हा निश्चितपणे वाढणार आहे! आणि मराठी भाषेच्या विकासासाठी ही एक खूप ‘सकारात्मक’ गोष्ट आहे.
सहजतेने करता येऊ शकतील अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टींकडे गूगलचे अनेकदा दूर्लक्ष होते. पण इंटरनेट क्षेत्रातील गूगलचं योगदान मात्र निश्चितपणे अनन्यसाधारण असंच आहे! त्यामुळेच या लेखाची सुरवात करण्यापूर्वी मी गूगलचे मनःपूर्वक आभार मानतो! कारण आज स्मार्टफोनवरुन इतक्या सहजतेने मराठी लिहिणं हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे.
स्मार्टफोनवर मराठी कसे लिहाल?
स्मार्टफोनवर मराठी लिहिण्यासाठी आपणास गूगल प्ले स्टोअर मधून गूगलचे एक नवे अॅप इन्स्टॉल करावे लागेल. Google Handwriting Input (गूगल हँडरायटिंग इनपुट) असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप आत्तापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड केले असून जवळपास ३० हजार लोकांनी मिळून या अॅपला ५ पैकी ४.४ गुण दिले आहेत. आपल्याला या अॅपसाठी साधारण ५० एमबी इन्टरनल मेमरीची आवश्यकता भासेल.
Google Handwriting Input या अॅपबद्दल सर्वसाधारणपणे असे सांगता येईल की, हा एक कोणतीही ‘की’ नसलेला ‘कीबोर्ड’ आहे. हे अॅप एखाद्या कोर्या पाटीसारखे आहे, ज्यावर आपण बोटाने रेघोट्या ओढू शकतो, अक्षरे काढू शकतो. आणि सर्वांत विशेष म्हणजे हे अॅप चक्क आपले मराठी हस्ताक्षरही ओळखू शकते! Google Handwriting Input या अॅपला ‘कीबोर्ड’ म्हणनं हे तसं योग्य होणार नाही, पण या लेखात आपण आपल्या सोयीसाठी यास ‘कीबोर्ड’ असंच म्हणूयात.
Google Handwriting Input हे अॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर थेट आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये या. इथे Personal या विभागात Language & input नावाचा पर्याय असेल, त्यावर स्पर्श करा. आता KEYBOARD & INPUT METHODS विभागात आपल्याला Google Hangwriting Input नावाचा पर्याय दिसेल, तो पर्याय निवडा.
आपल्याला खाजगी माहितीच्या सुरेक्षेसंदर्भात (उदा. पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, इ.) एक सुचना येईल. प्रत्येक नव्या कीबोर्डच्या वापरापूर्वी येणारी ही एक नेहमीची सुचना आहे. आपण प्रत्यक्ष गूगलचा कीबोर्ड वापरत असल्याने गूगलवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. त्यामुळे OK वर स्पर्श करा.
आता आपल्याला या कीबोर्डचे पर्याय पहायचे आहेत. त्यामुळे या कीबोर्डच्या नावासमोरील सेटिंग्जच्या चिन्हावर स्पर्श करा. त्यानंतर Input Languages नावाच्या पहिल्या पर्यायावर स्पर्श करा. इथे Use system language नावाचा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, ती निवड रद्द करा. त्यानंतर खाली ACTIVE INPUT METHODS मध्ये आपल्या Marathi भाषेचा शोध घ्या आणि मराठी भाषेची निवड करा. वर English चा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, तो तसाच ठेवा! कारण लिहित असताना आपणास मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांची गरज पडू शकते.
या कीबोर्डच्या सेटिंग्जमध्ये Theme नावाचा देखील एक पर्याय आहे. त्यानुसार आपण आपला कीबोर्ड हा पांढर्या अथवा काळ्या रंगात वापरु शकतो. मला स्वतःला काळा कीबोर्ड आवडतो, तेंव्हा मी Theme मधून Material Dark या पर्यायाची निवड केली आहे. Auto Selection ४००ms. असेल. बाकी गोपनियतेची चिंता असल्यास Share usage statistics हा पर्याय OFF करता येईल.
आता प्रत्यक्ष आपला कीबोर्ड वापरण्याची वेळ आली आहे. वेब ब्राऊजर, नोटपॅड असे कोणतेही एखादे साधन निवडा ज्यावर आपणास मराठी लेखनाची चाचणी करता येईल. स्पष्टीकरणार्थ आपण ‘वेब ब्राऊजर’ उघडला आहे, असे मी गृहित धरतो. आता आपण जर वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये स्पर्श केला, तर आपला पूर्वीचाच कीबोर्ड अवतरेल. तेंव्हा आपणास ‘नोटिफिकेशन’ विभागातून Google Handwriting Input हा नवा कीबोर्ड निवडावा लागेल.
एखादा मेसेज आल्यानंतर आपण ज्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढतो, त्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढा. इथे आपणास Choose input method नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यात Marathi – Google Handwriting Input असा पर्याय असेल, तो पर्याय निवडा.
आपल्याला अशी सुचना मिळेल की, या भाषेसाठी ४.७ एमबी इतका डेटा डाऊनलोड करावा लागेल. OK वर स्पर्श करा. त्यानंतर आपल्याला गूगलच्या अटी स्विकारण्यासंदर्भात विचारले जाईल. हवं तर त्या अटी वाचून घ्या आणि OK वर स्पर्श करा. एव्हाना कदाचित ४.७ एमबी डेटा डाऊनलोड झाला असेल. हा डेटा डाऊनलोड झाल्यानंतर आपण ‘स्मार्टफोनवर मराठी लिहिण्यास’ सुरुवात करु शकाल
पहिला शब्द काय लिहिल? आपल्या हस्ताक्षरात ‘मराठी’ असंच लिहून पहा! याकरीता आपलं हस्ताक्षर फार चांगलं असण्याची आवश्यकता नाही. गूगलची स्मार्ट प्रणाली आपलं खराब हस्ताक्षर ओळखण्यास सक्षम आहे. मराठी अक्षरे लिहिताना वरची रेघ ओढण्याची गरज नाही. ते काम या अॅपद्वारे आपोआप केले जाईल.
मराठी लिहिता लिहिता जर एखादा इंग्लिश शब्द लिहायचा असेल, तर त्या कीबोर्डवर खाली डाव्या बाजूस एक गोलाकार चिन्ह दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यानंतर आपणास याच कीबोर्डच्या माध्यमातून इंग्लिश भाषेतून लिहिता येईल. पुन्हा त्याच चिन्हावर स्पर्श केला असता, परत पहिल्याप्रमाणे मराठीतून लिहिता येईल. # @ अशी चिन्हे अथवा 🙂 😀 अशा स्माईलीजचा वापर करायचा झाल्यास इंग्लिश कीबोर्डचा वापर करा.
अर्थात कोणतीही नवी गोष्ट शिकण्याकरीता थोड्याफार सरावाची आवश्यकता ही असतेच! तेंव्हा आता यापुढे आपण दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर कराल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही! स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची ही पद्धत आपल्या सर्व मित्रांना तर सांगाच! पण जास्तितजास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवा!