स्मार्ट SMS अनुप्रयोग
स्मार्टफोनच्या या युगात व्यक्तिगत SMS (एसएमएस) पाठवण्याचं तसं काही कारण उरलेलं नाही. परंतु आजही कामकाजासाठी SMS चा वापर हा मोलाचा ठरतो. मित्रांचे SMS येणं जरी आजकाल बंद झालेलं असलं, तरी अनेक कंपन्यांचे महत्त्वाचे SMS मात्र अधुनमधून आपल्या मोबाईलवर येतच असतात. अँड्रॉईड फोनचा विचार करायचा झाल्यास त्यावर SMSकरिता ‘Messaging’ हा अनुप्रयोग (App) अधिपासूनच देण्यात येतो. नवीन अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये पूर्वस्थापित SMS अनुप्रयोग (Pre-installed SMS App) हे तसे चांगले आहेत. पण जुन्या स्मार्टफोन्सधील SMS अनुप्रयोग मात्र हाताळायला तितकेसे सक्षम नाहीत. त्यामुळे SMS साठी आपण एखादा दुसरा अनुप्रयोग (App) वापरायला हवा. मला स्वतःला SMS साठी दोन चांगले अनुप्रयोग माहित आहेत. या लेखात आपण त्याच दोन अनुप्रयोगांची माहिती घेणार आहोत.
टेक्स्ट्रा – स्वस्त आणि मस्त SMS अनुप्रयोग
Textra (टेक्स्ट्रा) हा अनुप्रयोग Delicious Inc.ने निर्माण केलेला आहे. SMS साठी हा एक साधा, सोपा आणि सुंदर असा अनुप्रयोग आहे. तो जाहिरातीसह पूर्णतः मोफत आहे, पण जाहिराती नको असतील, तर तो केवळ ५०-६० रुपयांना कायमस्वरुपी विकत घेता येतो. एकदा विकत घेतलेला अनुप्रयोग (App) हा आपण आपल्या एकाहून अधिक अँड्रॉईड उपकरणांवर वापरु शकतो.
या अनुशंगाने कदाचित आपल्याला हे लेख वाचायला आवडतील –
१. अनुप्रयोग का विकत घ्यावा?, २. अनुप्रयोग कसा विकत घ्यावा?
Textra आत्तापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी स्थापित (Install) केले असून सुमारे पावणेदोन लाख लोकांनी मिळून याला ५ पैकी ४.४ गुण दिलेले आहेत. Textraचं वैशिष्ट्य असं आहे की, हा अनुप्रयोग पटकन उघडला जातो व आपल्या फोनवरील SMS ची संख्या जरी अधिक असली, तरी तो हँग होत नाही अथवा संथ पडत नाही.
पण आपल्याला जर मोफत अनुप्रयोग हवा असेल, तर Messenger (मेसेंजर) नावाचा गूगलचा स्वतःचा असा पूर्णतः मोफत SMS अनुप्रयोग आहे.
मेसेंजर – गूगलचा SMS अनुप्रयोग
गूगलचा SMS अनुप्रयोगही दिसण्यास अतिशय सुंदर व सुटसुटीत आहे. तो गतिमान असून आपल्या स्मार्टफोनवरील संदेशांची संख्या जरी अधिक असली, तरी अगदी पटकन उघडला जातो. शिवाय आलेले SMS पहात असताना Messenger हा अनुप्रयोग हॅंग होत नाही. मेसेंजर अनुप्रयोग प्रत्यक्ष गूगलने निर्माण केलेला असल्याने तो कायमस्वरुपी मोफत राहिल याची आपण खात्री बाळगू शकतो.
तेंव्हा माझं स्वतःचं असं मत आहे की, स्मार्टफोनवर पूर्वीपासून देण्यात आलेला Messaging अनुप्रयोग वापरण्याऐवजी गूगलचा Messenger वापरुन पहावा. गूगलचा Messenger हा Whatsapp सारखा नसून तो केवळ SMSकरिता बनवण्यात आला आहे.
मी SMSसाठी Textra चा वापर करतो. पण Textra व Messenger या दोन अनुप्रयोगांव्यतिरीक्त इतरही काही SMS अनुप्रयोग आहेत. Chomp SMS ही Textra चीच अधिक विस्तृत आणि महाग अशी आवृत्ती आहे. आपण स्वतः SMSकरिता कोणता अनुप्रयोग वापरता? आणि आपल्याला तो अनुप्रयोग का आवडतो?
बाकी 2know.in च्या फेसबुक पेजने नुकताच १५००० लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे! आणि आपण जर या पंधरा हजार लोकांत सहभागी नसाल, तर कमीतकमी पुढील २५००० लोकांत सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे.