तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन

ज आपण तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स पाहणार आहोत, जे आपणाला वेळोवेळी उपयोगी पडतील. या एक्सटेन्शन्सच्या सहाय्याने आपणाला इंटरनेटवरील आवडलेली माहिती अथवा कोणतेही पान आपल्या  मित्रांबरोबर वाटता येईल, हव्या त्या शब्दाचा अर्थ अगदी सहजतेनं जाणुन घेता येईल आणि आपण पहात असलेली स्क्रिन कॅपचर करता येईल. याचा उपयोग खास करुन त्यांना होईल, जे आपला ब्लॉग प्रकाशित करतात किंवा एखाद्याला इंटरनेट वापरत असताना आलेली समस्या सांगत असताना देखिल स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. आपण पहात असलेली स्क्रिन जर आपल्याला इतरांना दाखवायची असेल, जी स्क्रिन ते पाहू शकत नाहीत, अशावेळी देखिल स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. उदा. फेसबुक मध्ये (किंवा इतरत्र कोठेही) लॉग इन झाल्यानंतर आपल्याच दिसणार आहे असा मजकूर. क्रोम वेब ब्राऊजर संबंधीत एक्सटेन्शन्स वापरण्यासाठी आपण क्रोम वेब ब्राऊजरचा इंटरनेटसाठी वापर करत असणं आवश्यक आहे.

या तीन क्रोम एक्सटेन्शन्स मधील दोन एक्सटेन्शन्स स्वतः गुगलने उपलब्ध करुन दिले आहेत आणि एक AddThis (अ‍ॅड धिस) या कंटेंट शेअरींग मधील आघाडीच्या वेबसाईटने आपल्यासाठी आणले आहे, त्यामुळे त्यांच्या विश्वसनियतेबद्दलही शंका घेण्याचे काही कारण नाही. खाली देत असलेल्या एक्सटेन्शन संबंधीत चित्रे आपल्याला त्या त्या दुव्यांवर (links) दिसून येतील.
‘अ‍ॅड धिस’ क्रोम एक्सटेन्शन:

अ‍ॅड धिस या क्रोम एक्सटेन्शनचा वापर करुन आपण इंटरनेटवरील आपल्याला आवडलेले कोणतेही पान आपल्या मित्रांबरोबर वाटू शकतो. एकदा हे एक्सटेन्शन इन्स्टॉल केले, की मग अ‍ॅड धिसचं बटण आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊजर मधील अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल. आपल्याला जर इंटरनेटवरील एखादं पान आवडलं, तर आपण केवळ अ‍ॅड धिसचं हे बटण क्लिक करायचं. त्यातून एक यादी उघडली जाईल, ज्यात नामांकित सोशल नेटवर्कींग वेबसाईट्सचा, सोशल बुकमार्कींग साईट्सचा आणि इतर अशाच काही सुविधा देणार्‍या साईट्सचा समावेश असेल. आपण त्यांपैकी कोणावरही क्लिक केल्यास, इंटरनेटवरील आपल्यला आवडलेले पान (ज्या पानावर आपण त्यावेळी असाल) त्या साईटवर शेअर केले जाईल, वाटले जाईल, त्या पानाचा पत्ता सांगितला जाईल. जेणेकरुन त्या विशिष्ट साईटचे (उदा. फेसबुक, ट्विटर, गुगल) सदस्य असलेल्या आपल्या इतर मित्रांना त्याबाबत माहिती होईल आणि मग तेही ते पान पाहतील.
गुगल डिक्शनरी एक्सटेन्शन: 

इंटरनेटच्या जाळ्यात फिरत असताना आपल्याला जर एखादा शब्द आडला, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा ‘गुगल सर्च’ मध्ये शोधण्याची गरज नाही. आता हे काम अगदी कमी वेळात, सहजगत्या होऊ शकतं. ही डिक्शनरी इंग्लिश टू इंग्लिश असून इंग्लिश टू मराठी साठीही एक्सटेन्सन्स आहेत, पण ते गुगल कडून अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने आणि त्यांची विश्वसनीयता माहित नसल्याने मी इथे देत नाहीये. गुगल डिक्शनरी एक्सटेन्शन इंन्स्टॉल केल्यानंतर आपण इंटरनेटवरील आपल्याला अडलेला शब्द सिलेक्ट करुन गुगल डिक्शनरी एक्सटेन्शनच्या बटणावर क्लिक केल्यास, एक खिडकी उघडली जाऊन त्यात आपल्याला त्या शब्दाचा विस्तृत अर्थ दिसून येईल. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना आता कंटाळा करायची गरज नाही. या एक्सटेन्शनचा आपल्याला इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल.
गुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शन:

गुगल स्क्रिन कॅपचरच्या सहाय्याने आपण आपल्या संगणक स्क्रिनचा जो भाग पहात आहात, किंवा त्या भागापैकी आवश्यक असा हवा तो काही भाग चित्र स्वरुपात आपल्या संगणकावर संग्रहीत करु शकाल आणि मग ते चित्र अपलोड करुन आपण ते आपल्या मित्रांना दाखवू शकाल अथवा आपला ब्लॉग असेल, तर आपण आपल्या वाचकांना ते चित्र आपल्या ब्लॉगवर दाखवू शकाल. हे एक असं एक्सटेन्शन आहे, जे प्रत्येकाजवळ असायलाच हवं. कारण स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा आपल्याला नेहमी उपयोग होऊ शकतो. ब्लॉग चालकांसाठी तरी हे आवश्यक आहेच!
गुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शनच्या सहाय्याने घेतलेले 2know.in चे छायाचित्र
गुगल क्रोम वेब ब्राऊजर वापरुन मी वर दिलेल्या दुव्यांवर गेल्यानंतर आपण Install वर क्लिक करा. काही क्षणांमध्येच ते एक्सटेन्शन आपल्या ब्राऊजरमध्ये इन्स्टॉल होईल. फायरफॉक्स अ‍ॅड ऑन प्रमाणे आपल्याला ब्राऊजर रिस्टार्ट करण्याची गरज नाही. इन्स्टॉल झाल्यानंतर लगेच आपल्याला ते एक्सटेन्शन अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल.

आपल्याला इंटरनेट संबंधित, ब्लॉगिंग बाबत खूप काही शिकायचं असेल, तर या दुव्यावर देण्यात आलेले संपूर्ण पान वाचा. इथे आपल्याला भरपूर पैसे कमवण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.