****** पासवर्ड कसा पहायचा? भाग २
या लेखात लपलेला पासवर्ड पाहण्याकरीता मी जी क्लुप्ती सांगणार आहे, ती खरं तर मला पहिल्या भागातच सांगायची होती. पण नंतर तो लेख मोठा होऊ लागल्याने मी त्यासंदर्भात नंतर लिहिन असं त्यावेळी सांगितलं आणि त्याप्रमाणे आजचा हा लेख लिहित आहे. मागच्या लेखात आपण लपलेला पासवर्ड पाहण्याची सोपी पद्धत पाहिली. यावेळची पद्धतही फारशी अवघड नाहीये, पण एकदम वेगळी आहे. व्यवस्थित समजल्यास कदाचित हीच पद्धत आपल्याला अधिक सोपी वाटण्याची शक्यता आहे. मी आपल्याला हे सारं चित्रांच्या सहाय्याने व्यवस्थित समजावून सांगेन. या पद्धतीचा वापर करुन लपलेला पासवर्ड पाहण्याकरीता वेब ब्राऊजरच्या सेटिंग्जमध्ये अथवा पर्यायांत जाण्याची आवश्यकता नाही. कारण यावेळी आपले हे काम केवळ एका राईट क्लिकवर होणार आहे!
लपलेला पासवर्ड पाहण्याची ही पद्धत मी उदाहरणाने स्पष्ट करतो. समजा आपल्याला फेसबुकच्या लॉग-इन पेजवर लपलेला पासवर्ड पहायचा आहे. आता आपण पूर्वीपासूनच फेसबुकमध्ये लॉग-इन असाल, तर थेट फेसबुक उघडले जाईल. तेंव्हा लॉग-आऊट करा आणि पुन्हा फेसबुकवर या. फेसबुकचा युजरनेम, पासवर्ड जर आपण वेब ब्राऊजरमध्ये साठवलेला (Save) असेल, तर आपणास पूर्वीपासूनच युजरनेम आणि पासवर्डच्या जागा भरलेल्या दिसतील. पण जर त्या जागा भरलेल्या नसतील, तर त्या ठिकाणी युजरनेम (ईमेल), पासवर्ड टाका; पण इतक्यात लॉग-इन करु नका. आता या पानावर आपणास थेट आपला पासवर्ड न दिसता केवळ ****** असे दिसेल.
पासवर्डच्या चौकटीवर आपला माऊस नेऊन नेहमीप्रमाणे क्लिक करा. नेहमीप्रमाणे क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करा. आता आपल्यासमोर काही पर्याय येतील. त्यापैकी Inspect Element हा पर्याय निवडा, क्लिक करा. चित्र १ मध्ये दाखवल्याप्रमाणे (चित्र मोठ्या आकारात पाहण्याकरीता चित्रावर क्लिक करा) आपणास type=”password” असे दिसत असेल. तिथे आपला माऊस नेऊन password वर क्लिक करा आणि password हा शब्द खोडून काढा, डिलिट करा. आता त्या ठिकाणी show असं टाईप करा.
खाली दिलेले चित्र २ पहा. चित्रात दाखवल्याप्रमाणे type=”show” असे दिसायला हवे. show असं टाईप केल्यानंतर आपला माऊस स्क्रिनवर इतरत्र नेऊन क्लिक करा अथवा कीबोर्डवरील enter दाबा. झालं! आता फेसबुक पासवर्डच्या ठिकाणी आपल्याला ****** न दिसता आपण दिलेला पासवर्ड दिसेल. ही गोष्ट मी फेसबुकच्या उदाहरणाने स्पष्ट केली. पण अगदी हीच पद्धत आपण इतर कोणत्याही संकेतस्थळावरील पासवर्ड पाहण्याकरीता वापरु शकाल. या पद्धतीने पासवर्ड पाहण्यासाठी आपणास Administrator Password ची देखील गरज नाही.
आपल्याला हा लेख आवडला असेल, तर ‘मराठी इंटरनेट’बाबत आपल्या मित्रांना सांगायला विसरु नका! ‘मराठी इंटरनेट’ वर सध्या रोज एक लेख प्रकाशित होत नसला, तरी ‘मराठी इंटरनेट’चे फेसबुक पेज मात्र रोज अपडेट होत आहे! याच लेखाचा पहिला भाग आपणास या इथे वाचता येईल – ‘****** पासवर्ड कसा पहायचा?’.