इंटरनेट वर लेख लिहिताना काय करावं लागतं?
इंटरनेट, मोबाईल, संगणक याबाबत शंभर लेख
मराठी वेबसाईट – इंटरनेट, मोबाईल, संगणक |
आज 2know.in वर हा १०० वा लेख लिहित असताना मला एक टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान लाभत आहे. 2know.in ही वेबसाईट सुरु होऊन आता १३८ दिवस होत आहेत आणि या १३८ दिवसात मी इंटरनेट, मोबाईल, संगणक याबाबत १०० मराठी लेख लिहू शकलो याचे मला स्वतःस कौतुक आणि समाधान वाटते. मला माझा ५० वा लेख आठवतो, आणि आज तर मी माझं शतक साजरं करत आहे!
इंटरनेटवर एक लेख लिहिताना काय काय करावं लागतं!? ते आपण पाहूयात… इंटरनेटवर लेख कसा लिहावा?, ब्लॉग कसा लिहावा? अशा अर्थानेही तुम्ही खालील माहिती वाचू शकता.
लेख लिहा |
१. लिहिण्यासाठी मनाची तयारी असणे, नसेल तर ती करणे आणि मग वेळ काढणे यांपासून खरं तर पहिली सुरुवात होते. पण यांचा विचार केला नाही तर…
२. सर्वप्रथम ‘विषय शोधण्यापासून’ सुरुवात होते. ‘आज कोणता लेख लिहायचा!?’ बर्याचदा हा एक मोठा प्रश्न असतो. असा विषय निवडावा लागतो जो फार मोठा होणार नाही किंवा फार लहान होणार नाही. इंटरनेट, मोबाईल, संगणक यांच्याशी संबंधीत एखादा विषय मला निवडायचा असतो. शिवाय सामान्य वाचकांना त्यातून काही मिळालं पाहिजे आणि याचबरोबर तो विषय रोचकही असावा.
३. एखादा विषय मिळाल्यानंतर त्याचा आभ्यास करावा लागतो. कारण मला एखादी गोष्ट समजली, तरच मी ती दुसर्यांना सांगू शकेन.
४. त्यानंतर ‘भाषा वापरण्याचा’ प्रश्न उरतो. अशी भाषा वापरावी लागते जी सर्च इंजिन आणि वाचक दोघांनाही आवडेल. आणि या दोघांसाठी भाषेत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करावा लागतो.
५. आवश्यकता असेल तेंव्हा स्क्रिनशॉट्स घ्यावे लागतात. एखादा मजकूर फक्त शब्दांच्या सहाय्याने समजत नसेल, तर अशावेळी हे स्क्रिनशॉट्स आपल्याला मदत करतात. हे स्क्रिनशॉट्स ब्लॉगपॅडवर अपलोड करुन योग्य त्या ठिकाणी ठेवले जातात.
६. प्रत्येक ब्लॉगबरोबर एखादी इमेज असेल तर तो ब्लॉग अधिक आकर्षक वाटतो. अशावेळी विषयाला अनुरुप इमेजचा शोध घेऊन ती ब्लॉगपॅडवर अपलोड केली जाते. बर्याचदा ही इमेज लेखादरम्यान कोणत्या भागाच्या शेजारी ठेवावी!? याचाही विचार करावा लागतो.
७. प्रत्येक विषयादरम्यान त्याबाबत अधिक माहितीसाठी काही दुव्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतं. अशावेळी लेखादरम्यान काही शब्दांना दुवा जोडण्याचे काम केले जाते. शिवाय हा दुवा नवीन विंडो, टॅब मध्ये उघडला जाईल याचीही काळजी घेतली जाते.
८. त्यानंतर शिर्षक, लेबल, तारिख या गोष्टी तर येतातच, शिवाय पोस्टच्या विषयानुसार पोल, कॅलक्युलेटर इ. चाही क्वचितप्रसंगी वापर केला जातो.
९. होमपेजवर प्रत्येक लेखाचा सुरुवातीचा निवडक भाग दाखवून एकाच पानावर अनेक लेख दिसतील याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी लेखादरम्यान योग्य त्या ठिकाणी ‘जंप ब्रेक’ घालावा लागतो.
१०. सरतेशेवटी लेख प्रकाशीत केल्यानंतर वाचकाच्या दृष्टिकोनातून त्याची पुनः चाचणी करावी लागते. शुद्ध लेखन तपासले जाते, दुवे तपासले जातात, चित्र व्यवस्थित बसले आहे का!? ते पाहिले जाते, जंप ब्रेक व्यवस्थीत काम करत असल्याची खात्री केली जाते.
एक लेख लिहिण्यासाठी काय काय करावं लागतं!? ते मी वर थोडक्यात सांगितलं आहे. पण लेख लिहिणं हे एक वेगळं काम आहे आणि संपूर्ण वेबसाईट संभाळणं वेगळं! वेबसाईटची डिझाईन, सेटिंग्ज, डोमेन नेम, टेंम्पलेट, गॅजेट्स इ.बर्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय जाहिराती मिळवणं आणि वेबसाईटचा प्रचार करणं अशा एक ना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सांभाळत सांभाळत वेबसाईटची गाडी सुरुळीत चालवली जाते. आणि यात अचानक येणार्या अनपेक्षीत, अनोळखी समस्या, तांत्रिक अडचणी तर असतातच! वेबसाईट ही जर एखादी गाडी असेल, तर ‘लेख’ हे त्या गाडीचे पेट्रोल आहे. आणि बाकी आतल्या तांत्रिक बाजूंना आपण त्या गाडीचे इंजिन आणि पार्टस् म्हणूयात. त्यांनाही मेंटेन करावं लागतं.
तर एक लिहिण्यासाठी आपला बराच वेळ आणि उर्जा खर्च होत असते. मराठीच्या बाबतीत सांगायलं गेलं तर, पैशांपेक्षा प्रतिसाद आणि वाचकसंख्या या माध्यमातूनच ही उर्जा पुन्हः प्राप्त होत राहते. आणि ही उर्जा आपण मला भरभरुन दिलीत, यातच माझ्या कार्याचं यश सामावलेलं आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.