गुगलचा मोफत व्हिडिओ चॅट

दोन-तीन दिवसांपूर्वीच घरात वाय-फाय ची सुविधा सुरु केली. तेंव्हापासून घरातली इंटरनेटसाठी चालणारी वन वे ट्रॅफिक आता टु वे झाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच ‘नेटबुक’ घेतलेले, पण इंटरनेटशिवाय त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. मग यावर एक उत्तम उपाय म्हणून वाय-फाय सुरु केले!

तर अशाप्रकारे घरात वाय-फाय आल्यानंतर पर्वा दिवशी रात्री नेटबुकवर ऑर्कुट ओपन केले, तर त्या तिथे ‘चॅट विंडोत’ एक मित्र ऑनलाईन सापडला! त्याच्या स्टेटस पुढे हिरव्या रंगात व्हिडिओ कॅमेरा दिसत होता! मी त्याला विचारलं ‘व्हिडिओ चॅट करत आहेस का!?’ तो ‘नाही’ म्हणाला आणि मला व्हिडिओ चॅटचे invitation सेंड केले. ते मी accept करायला गेलो आणि मग एका वेगळ्याच पानावर जाऊन बसलो. त्या पानावरुन मला एक लहानसे प्लग इन इंन्स्टॉल करावे लागले! आणि मग आमचा व्हिडिओ चॅट सुरु झाला.

मला इतके दिवस वाटत होतं की, व्हिडिओ चॅट करणं आवघड आहे आणि त्यासाठी बरेच सेटिंग्ज करावे लागतात! पण तसं काहीही नाहीये. तुम्ही आपल्या मित्राशी ऑर्कुट वरुन, जीमेल वरुन अगदी सहज व्हिडिओ चॅट करु शकता.

१. तुमच्या संगणकाला ‘वेब कॅम’ जोडलेला असणं यासाठी आवश्यक आहे. लॅपटॉप असेल तर लॅपटॉपचा वापर करा. याशिवाय बोलण्यासाठी हेडफोन्स लागतील.
२. त्यानंतर या इथे एक छोटेसे प्लग इन मिळेल, ते आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन घ्या. जास्तितजास्त पाच मिनिटं लागतील. इंन्स्टॉलेशन पूर्ण होईपर्यंत धिर धरा. उगाच संगणकावर इकडेतिकडे टिचक्या मारत बसू नका.
३. इंन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ‘तुमचा वेब ब्राऊजर रिस्टार्ट करु का!?’ अशा अर्थाची विंडो ओपन होईल. तेंव्हा आपला वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा. किंवा ती विंडो घालवा आणि मग स्वतःच वेब ब्राऊजर बंद करुन पुन्हा सुरु करा.
४. आतापर्यंत ज्या पायर्‍या तुम्ही पूर्ण करत आला आहात, त्या सर्व पायर्‍या, ‘ज्या मित्राशी तुम्हाला व्हिडिओ चॅट करायचा आहे’, त्याने देखील पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
५. तुम्ही गुगल व्हिडिओ चॅट ‘ऑर्कुट’ किंवा ‘जीमेल’ मधून करु शकता. खाली दिलेला व्हिडिओ पहा, त्याची तुम्हाला थोडीफार मदत होईल.

गुगल व्हिडिओ चॅट

६. ज्या मित्राशी आपल्याला बोलायचं आहे, त्याच्या नावावर क्लिक करुन त्याला चॅटसाठी निवडा. (अशावेळी आपला मित्र ऑनलाईन असणं आवश्यक आहे!). आपल्या चॅट विंडोच्या खालच्या बाजूला असलेल्या video and more या  पर्यायावर जाऊन video chat वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मित्राला तुमचा ‘व्हिडिओ कॉल’ येत असल्याचे समजेल. नेहमीच्या फोनची रिंग वाजते तशी त्याच्या संगणकावर रिंग ऎकू येईल. आणि सरतेशेवटी त्याने Answer वर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ कॉल सुरु होईल.
७. व्हिडिओ चॅटची क्लिऍरिटी चांगली आहे. फुल स्क्रिन करुन पहा. उजव्या बाजूला खाली एका छोट्य़ाशा विंडोत तुम्ही स्वतःला पाहू शकाल. आणि बाकीच्या संपूर्ण संगणक स्क्रिनवर तुम्हाला तुमचा मित्र दिसेल!
८. आता यासाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे? कोणते वेब ब्राऊजर वापरणं आवश्यक आहे? त्याची माहिती तुम्हाला या इथे मिळेल. पण शक्यतो आजच्या आधुनिक संगणकावर व्हिडिओ चॅट लगेच सुरु करता येईल. त्यामुळे requirements पहात बसण्याची फारशी गरज नाही. पण काही समस्या येत असेल, तर एकदा तपासून पहा.
९. आणखी मदत हवी असल्यास या लिंकवर जा.
१०. या ऑर्कुटच्या ब्लॉगवरही तुम्ही एक नजर फिरवू शकता.

व्हिडिओ चॅट करणं हे पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही संगणकाला इंटरनेट कनेक्शन जोडण्यासाठी काय खर्च केला असेल तितकंच! गुगल तुमच्याकडून यासाठी पॆसे घेणार नाही! खूप वेळ व्हिडिओ चॅट करायचा असेल, तर मात्र इंटरनेटचा ‘अनलिमिटेड डाटा प्लॅन’ असणं आवश्यक आहे.

व्हिडीओ चॅटची मजा काही ऒरच आहे! ज्यादिवशी मी पहिल्यांदा व्हिडिओ चॅट केला, त्यादिवशी मी खूप खुष होतो! अजूनही आहे… काही का असेना! पण २०१० साल आल्यापासून खर्‍या अर्थाने आधुनिक युगात, भविष्यात प्रवेश करत असल्यासारखं वाटत आहे!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.